– अविनाश चंदने –
नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि टोरेस ज्वेलरी नावाचा मोठा घोटाळा उघडकीस आला. या कंपनीने पॉन्झी स्कीमच्या नावाने हजारो लोकांची आर्थिक फसवणूक केली. 6 जानेवारीला हा घोटाळा उघडकीस आला आणि मुंबईसह राज्यात खळबळ उडाली. या कंपनीने मुंबईसह मीरा-भाईंदर, नवी मुंबई परिसरात टोरेस ज्वेलरी नावाने ऑफिस उघडले आणि आर्थिक प्रलोभने दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली. आता या प्रकरणात ईडीने उडी घेतली आहे. आतापर्यंत आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला तर 2 हजारांहून अधिक लोकांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत तर 37 कोटींची फसवणूक झाली आहे.
गंभीर बाब म्हणजे फसवणूक करणार्या आरोपींनी 200 कोटींहून अधिक रक्कम विदेशात वळवल्याची माहिती समोर येत आहे. हा आर्थिक घोटाळा शेकडो कोटींचा असल्याचे बोलले जाते. हे कमी म्हणून की काय टोरेस घोटाळ्यानंतर लगेचच आणखी एक फसवणुकीचे प्रकरण समोर आले. मनीएज या कंपनीनेही हजारो गुंतवणूकदारांची 100 कोटींहून अधिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक होण्याची ही काही पहिली किंवा दुसरी वेळ नाही. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, अशा घटना वारंवार उघडकीस येतात तरीही गुंतवणूकदारांचे डोळे का उघडत नाहीत?
राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक किंवा खासगी बँकेत एक वर्षाच्या मुदतीसाठी सरासरी 7 ते 8.50 टक्के व्याज मिळते, हे सर्वांनाच ठावूक आहे. म्हणजेच रक्कम दुप्पट होण्यासाठी किमान 10 वर्षे लागतात. असे असताना जर कुणी वर्ष किंवा दीड वर्षात रक्कम दुप्पट करून देत असेल, सोबत महागडे गिफ्ट देत असेल, मोठमोठ्या बक्षिसांचे आमिष दाखवत असेल तर लगेचच सावध व्हायला हवे. लोकांच्या डोक्यात लगेचच धोक्याची घंटी वाजायला हवी. प्रत्यक्षात वेगळेच घडताना दिसते. अशी एखादी कंपनी कुठेतरी चकाचक कार्यालय थाटते आणि त्यांच्या आमिषाला लोक बळी पडतात, त्यांच्याकडे आयुष्याची पुंजी सुपूर्द करतात. नंतर ही मंडळी पैसा घेऊन पळून गेली की फसवणूक झालेले गुंतवणूकदार सरकार, पोलिसांना दोष देत पैसा परत मिळवून देण्यासाठी दबाव टाकतात. पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांना कामाला लावले जाते. मात्र, गुंतवणूक करताना किंवा अशी फसवी स्कीम कुणी राबवत असेल तर त्याविरोधात कुणी पोलिसांकडे तक्रार करायला येत नाही. अशा घटना महाराष्ट्रात ठराविक काळानंतर कुठे तरी घडत असतात. यातून कुणी काहीच धडा का घेत नाही, हा सर्वांना सतावणारा प्रश्न आहे.
मुळात वर्षाला 40 ते 50 टक्के व्याज देणे कुणाला शक्य आहे का? एक ते दीड वर्षात पैसे खरंच दुप्पट होऊ शकतात का? आपल्याला अल्पावधीत रक्कम दुप्पट करून देणारी कंपनी आपले पैसे कुठे गुंतवणूक करत असेल? असे प्रश्न या मंडळींना का पडत नाहीत, हाच खरा गहन प्रश्न आहे. गंमत अशी आहे की, या स्कीम अशा असतात की, सुरुवातीला या कंपन्या काही लोकांना रक्कम दुप्पट करून देतात. मग फायदा मिळालेली मंडळी स्वत: जास्त रक्कम गुंतवतात आणि मित्रमंडळी, नातेवाईकांनाही या योजनेची महती सांगतात. समोर पुरावा असताना शंका कशाला घ्या, असा विचार करत एकाकडून महती ऐकून 10 लोक गुंतवणूक करतात आणि त्यानंतर गुंतवणूकदारांची मोठी चेन तयार होते. त्यानंतर प्रचंड मोठी रक्कम जमा झाली की कंपनी एक दिवस कार्यालयाला टाळा लावून निघून जाते आणि मग लोकांची फसवणूक झाल्याची ओरड सुरू होते.
खरेतर याला फसवणूक म्हणायची की लोभाचे बळी म्हणायचे, हा मूळ प्रश्न आहे. ही फसवणूक आहेच मात्र, अल्पावधीत जास्त पैसे मिळवण्याच्या सामान्य गुंतवणूकदारांच्या लोभाकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. अशा घटना सतत घडत असतील तर गुंतवणूकदारांनी बळी पडता कामा नये. मात्र, हा लोभ त्यांना आवरता येत नाही, हेही वास्तव आहे. वास्तविक 1997 मध्ये अशोक शेरेकर या बेस्ट कर्मचार्याने फसवणुकीचा असाच ‘बेस्ट’ मार्ग निवडला होता. त्याने बेस्टमधील कर्मचारी तसेच पोलीस आदी 50 ते 60 हजार लोकांच्या खिशातून जवळपास 80 कोटी काढले होते. पैशाचा परतावा बंद झाल्यानंतर बोंब सुरू झाली. त्यानंतर शेरेकरला अटक झाली. मात्र, पैसे गेले ते परत मिळाले नाहीत.
शेरेकरच्या फसवणुकीने राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. 1997 सालातील 80 कोटींची फसवणूक म्हणजे आताच्या काळात अंदाजे दीड हजार कोटींचा घोटाळा म्हणता येईल. मात्र, यातून काही धडा घेण्याऐवजी सीयू मार्केटिंगमध्ये लोकांनी पुन्हा गुंतवणूक केली. सीयू मार्केटिंगच्या उदय आणि अमोल आचार्य या बापलेकांनी सामान्य गुंतवणूकदारांचा खिसा साडेचारशे कोटींनी हलका केला. त्यानंतर आर्थिक फसवणूक होऊ नये, म्हणून सरकारने सूचना केल्या, बँकांनी आवाहने केली. पण पालथ्या घडावर पाणी पडल्यासारखे झाले. ट्री प्लांटेशन कंपन्यांच्या माध्यमातून घोटाळा सुरू झाला. त्यांनी गुंतवणूकदारांच्या नावे सागाची झाडे लावण्याचे आणि त्यानंतर त्यातून उत्पन्न देण्याचे आमिष दाखवले. अशा जवळपास 600 हून अधिक कंपन्यांनी लाखो सामान्य गुंतवणूकदारांना ३ हजारांहून अधिक कोटींचा झटका दिला.
गंभीर बाब म्हणजे अशा स्कीममध्ये बहुतांश गुंतवणूकदार शिक्षित होते. काही निवृत्त कर्मचारी होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याची कमाई लोभापोटी पॉन्झी कंपन्यांच्या हवाली केली आणि कंगाल झाले. माध्यमांतून याच्या बातम्या, लोकांची कशी फसवणूक झाली याच्या सूरस कथा बाहेर येतात. तेवढ्यापुरती चर्चा होते त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होते. तुम्हाला सिटी लिमोझिन घोटाळा आठवतोय का? या घोटाळेबाजांनी नरिमन पॉईंटमध्ये ऑफिस थाटले होते. कर्जावर गाडी घ्या, गाडीचे मालक व्हा आणि गाडी भाड्याने देऊन महिन्याला हजारो रुपये कमवा, अशी त्यांची जाहिरात होती. या जाहिरातीला लाखो लोक भुलले. त्यांनी आयुष्याची कमाई यात गुंतवली आणि कंगाल झाल्यानंतर त्यांचे खायचे वांदे झाले. कारण कंपनीने सुरुवातीला काही लोकांना फायदा करून देत लाखो लोकांचा विश्वास कमावला आणि नंतर सर्वांना चुना लावला. हे प्रकरण खूप गाजले.
पुढे कंपनीचा मालक असलेल्या सय्यद मसूदला अटक झाली. मात्र, एवढे पैसे त्यांच्याकडून वसूल करणे शक्य न झाल्याने लाखो लोकांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी कायमची गमावली होती. इनफ्लेअर मार्केटिंग, गुरुदेव ट्रॅव्हल्स, अलअमीन प्रा. लि., डिव्हाईन लाईफ केअर आदी कंपन्यांनीही दीड-दोनशे कोटींची माया गोळा करून अंदाजे 30 हजार गुंतवणूकदारांची लूट केली होती. मध्यंतरी शेअर बाजारातून पैसे कमावण्याची टूम सुरू झाली. त्यात स्टॉक गुरु इंडिया या कंपनीने ६ महिन्यांत पैसे दुप्पट करून देतो असे सांगून लाखो गुंतवणूकदारांना 11 हजार कोटींचा गंडा घातला होता. तरीही अशा फसवणुकीच्या योजना येत होत्या, लोक जुने विसरून नव्या कंपनीवर, त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत नव्याने गुंतवणूक करत पायावर कुर्हाड मारत नव्हते तर कुर्हाडीवर पाय मारत होते.
गंमत म्हणजे 2011 मध्ये स्पिक एशिया कंपनीने गाशा गुंडाळला. त्यावेळी या कंपनीने 24 लाख गुंतवणूकदारांचे 2 हजार 276 कोटी हडप केले होते. यातील बहुतांश गुंतवणूकदार उच्चशिक्षित आणि चांगल्या उत्पन्न गटातील होते. तरीही त्यांना थोड्या दिवसांत जास्त पैसे कमावण्याचा मोह झाला आणि स्पिक एशिया कंपनीने त्याचा बरोबर फायदा उचलला. रस्त्यावर भाजी घेताना विक्रेत्याशी रुपया-दोन रुपयांसाठी घासाघीस करणारे लाखोंची गुंतवणूक करताना मात्र, निमूट असतात. हे चित्र बदलणे गरजेेचे आहे.