महायुतीत असलेल्या भाजपचे विधानसभा निवडणुकीत संख्याबळ वाढल्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा करणे स्वाभाविक होते, पण मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेले शिंदे त्या पदावरून खाली उतरायला तयार नव्हते. त्यामुळे भाजपसाठी मोठी कोंडी निर्माण झाली होती. विधानसभेची निवडणूक झाल्यावर महायुतीला अनपेक्षित यश मिळाले. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाला होता. भाजपसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट होती. कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठबळ देऊन त्यांना आपल्यासोबत घेतले, त्यावेळीही भाजपचे संख्याबळ शिंदेंपेक्षा जास्त होते. तरीही त्यांना अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यावेळी इतकी मेहनत करून भाजपला सत्तापदी आणणार्या देवेंद्र फडणवीस यांचा मोठा अपेक्षाभंग झाला होता.
मुख्यमंत्रीपदाचा त्यांच्या तोंडचा घास काढून घेण्यात आला होता, पण जेव्हा निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून आला हे कळल्यावर त्यांचे काही चालले नाही. त्यावेळी फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून पक्षाचे काम करू, असे म्हटले होेते, पण तसेही त्यांना त्यांच्या श्रेष्ठींनी करू दिले नाही. त्यामुळे फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून दुय्यम स्थानावर समाधान मानण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मी पुन्हा येईन, ही त्यांची मनीषा पूर्ण करता आली नव्हती, पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र ती संधी फडणवीसांसाठी चालून आली होती, पण एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर चांगलाच जम बसवला होता. इतकेच नव्हे तर खरी शिवसेना म्हणून त्यांच्याच शिवसेनेला भाजपच्या आशीर्वादाने कायदेशीर मान्यता मिळाली होती. त्यामुळे पुढे जर आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढवायची असेल तर आपल्याकडे मुख्यमंत्रीपद हवे असाच विचार शिंदे करू लागले.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून ठाण्यातील मंदिरांमध्ये आरत्या आणि अभिषेक सुरू केले. त्यानंतर मुंबईत फडणवीसांच्या समर्थकांनी ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तेच सुरू केले. त्यामुळे महायुतीला सुपरडुपर बहुमत मिळाले असले तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून ताणाताण सुरू होती. त्यामुळे सत्तास्थापनेस उशीर होत होता. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या शपथविधीला एकनाथ शिंदे येणार की नाही याविषयी शंका उपस्थित केली जात होती. कारण आपण आता राज्यातील महिलांचे लाडके भाऊ आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील राजकारणाचे पारडे फिरले. त्यामुळे महायुतीला सुपरडुपर बहुमत मिळाले. ही योजना आपल्या नेतृत्वाखाली राज्यात राबवली गेली. त्यामुळे मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळावे, असे शिंदेंना वाटत होते, पण जेव्हा ते पद यावेळी आपल्याला मिळणार नाही असे एकनाथ शिंदे यांना कळले तेव्हा त्यांनी विविध प्रकारे आपली नाराजी व्यक्त करून दाखवली.
नेहमीप्रमाणे ते शेतीच्या कामासाठी गावी गेले, पण यावेळी काहीही झाले तरी भाजपने आपला मुख्यमंत्री बसवायचा असा निर्धार केला होता. त्यामुळे शिंदे यांचे काही चालेले नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. जेव्हापासून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे तेव्हापासून ते तसे शांत आहेत. पालकमंत्रीपदावरून सुरुवातीला निर्णय होत नव्हता, पण तो झाल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करून रस्त्यावर टायर जाळले. सत्तेतील लोकांनी असे करणे योग्य नाही, पण त्यातून शिंदे यांनी स्वत:ची नाराजी तर व्यक्त करून दाखवली नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतो.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाले खरे, पण मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर मुख्यमंत्री राहायला का जात नाहीत, तिथे कुणी काही पुरून ठेवले आहे, तिथे काही काळ्या जादूचा प्रकार आहे का, त्यामुळे आता वर्षा बंगला पाडून त्या ठिकाणी नवीन बंगला बांधण्याचे घाटत आहे, असा बॉम्ब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांनी टाकला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस आतुर होते, तर मग वर्षा बंगल्यावर जायला ते उत्साही का नाहीत. उलट वर्षा बंगल्यावर जायला अनेक जण आतुर असतात.
आपल्या मुख्यमंत्रीपदाला बाधा येऊ नये म्हणून अलीकडच्या काही वर्षांमध्ये जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळात काही विधी करण्यात आले, अशा बातम्या बाहेर आल्या होत्या. हे विधी काळ्या जादूच्या सदरात मोडत होते. इतकेच नव्हे तर वर्षा बंगल्यावर लिंबू-मिरच्या सापडल्या होत्या. यावरून पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हे काय चालले आहे, अशी जोरदार टीका प्रसारमाध्यमांमधून झाली होती. राजकारण हे नेहमीच अस्थिर असते, पण अलीकडच्या काळात ते अधिकच अस्थिर झाले आहे. जेव्हा आपल्याला अगदी जवळच्या लोकांवरही विश्वास ठेवणे अवघड होते, तेव्हा अशा काल्पनिक गोष्टींवर माणसाचा विश्वास बसू लागतो. अनिश्चिततेतून मानवी मनात भीती निर्माण होते. त्यातून मग एखादी वास्तूही सुटत नाही.