Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeसंपादकीयओपेडIndia Got Latent : रणबीर-रैनाच्या स्टँड अप कॉमेडीची गंदी बात!

India Got Latent : रणबीर-रैनाच्या स्टँड अप कॉमेडीची गंदी बात!

Subscribe

बियर बायसेपमध्ये समाजाच्या विविध गोष्टींवर प्रकाश पाडणारा रणबीर अलाहाबादिया जेव्हा पालकांवर आक्षेपार्ह टिप्पणी करत हसत सुटला ते त्याच्या चाहत्यांना रुचले नाही. त्यामुळे तो आणि समय रैना यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून त्यांची चौकसी सुरू आहे. रणबीरचा दुटप्पीपणाच त्याला लयास घेऊन गेला. रणबीर आणि रैना यांना मिळालेल्या धड्यामुळे गल्लीबोळातले डार्क कॉमेडियन्सही सावध झाले आहेत. यूट्यूबवरून पैसा मिळवण्यासाठी काहीही चाळे करण्याआधी ते शंभर वेळा विचार करतील, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

सध्या देशभरात प्रसिद्ध यूट्यूबर रणबीर अलाहाबादियाचे नाव चर्चेत आहे. पॉडकास्टच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती घेणार्‍या रणबीरने काही दिवसांपूर्वी ‘इंडिया गॉट लैटेंट’ या कॉमेडी शोमध्ये आई-वडिलांच्या शारीरिक संबंधावर आक्षेपार्ह विधान केले आणि काही सेकंदात पॉडकास्टच्या दुनियेत हिरो असलेला रणबीर झीरो ठरला, तर या शोचा कर्ताधर्ता समय रैनालाही जनतेने फैलावर घेतले.

अखेर सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत इंडिया गॉट लैटेंट चॅनेलच बंद केलं, जे कदाचित फार आधीच बंद करणं अपेक्षित होतं. असो विनोदाच्या नावाखाली सुरू असलेल्या या डार्क कॉमेडीच्या नंग्या नाचाची सरकार दरबारी घेण्यात आलेली नोंद ही थोडीथोडकी नाही.

याचप्रकरणी रणबीर आणि रैनावर देशाच्या कानाकोपर्‍यातून गुन्हे दाखल करण्यात आल्याने या दोघांना पळता भुई थोडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रणबीरने जनतेची जाहीर माफीही मागितली, तर रैनाने हे सगळं हाताळणं कठीण असल्याचे सांगितले, पण इंडिया गॉट लैटेंट या डार्क कॉमेडी शोच्या माध्यमातून आपण अश्लीलता पसरवली यावर माफी मागण्याचे औदार्यही त्याने दाखवलेले नाही.

असो, रैनाच्या या शोमध्ये याआधीही विविध प्रकारचे अश्लाघ्य जोक्स आणि विधानांचा वापर केला गेला आहे, पण या शोमध्ये रणबीरने आई-वडिलांच्या सेक्स संबंधावर टिपण्णी करून विनोदाची जी खालची पातळी गाठली ती सगळ्यांनाच धक्का देऊन गेली.

विशेष म्हणजे या शोमध्ये ‘द रिबेल किड’ नावाने ओळखली जाणारी मॉडेल, फॅशन यूट्यूबर आणि डार्क कॉमेडी करणारी अपूर्वा मखिजा ही तरुणीही होती. तिनेही विनोदाच्या नावाखाली जे काही अश्लाघ्य भाष्य केले तेही संतापजनक आहे. विनोदाच्या नावाखाली सर्वच मर्यादा ओलांडणार्‍या या विनोदवीरांना कायद्याचा बडगा दाखवणेही गरजेचे होते. ते रणबीरच्या विधानामुळे शक्य झाले.

खरंतर या घटनेनंतर अनेकांना कळाले की असे अश्लील विनोदाचेही शो आपल्याकडे होतात. कारण अशा थर्ड क्लास विनोदातून आनंद मिळवण्याचा प्रकार पाश्चात्य देशात मोठ्या प्रमाणावर आहे, पण पाश्चिमात्य राहणीमानाबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीच नाही तर त्यांच्या आवडीनिवडींचेही हुबेहूब अनुकरण करणारी पिढी आपल्या देशात केव्हाच तयार झाली आहे.

त्यामुळेच गेल्या काही वर्षांत यूट्यूबरचा एक मोठा वर्ग कॉमेडी शोच्या नावाखाली अश्लील कंटेट दाखवत व सांगत सुटला. २०१५ मध्ये – AIB नावाचा चार तरुणांच्या ग्रुपने कॉमेडी शो सुरू केला. तन्मय भट हा या ग्रुपचा फाऊंडर. या ग्रुपनेही अशाच प्रकारे अश्लील विनोदाचा वापर करत फॅन फॉलोईंग वाढवला. विशेष म्हणजे यात अर्जुन कपूर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांनीही भाग घेतला होता.

या कार्यक्रमात अर्जुन कपूर, रणवीर सिंग यांनी प्रायव्हेट पार्टवर अश्लाघ्य विनोद केल्याने त्यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. या शोमध्ये तन्मय भटने राजकारणी मंडळींवरही अश्लील विनोद करणं सुरू केलं होतं, पण त्यावेळी आजच्या एवढा सोशल मीडिया सक्रिय नव्हता. त्यामुळे फक्त हायफाय लोकांपर्यंतच अशा शोच्या बातम्या पोहचायच्या. कारण असे शोज बघणारा जो क्राऊड होता आणि आहे तो एका विशिष्ट गटातला असे.

या तन्मय भटने लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यावरही खालच्या दर्जाचे विनोद करत वाद ओढवून घेतला होता. हा सगळा प्रयत्न प्रसिद्धीसाठी सुरू होता, पण नंतर त्याच्यावरही रैना आणि रणबीर अलाहाबादियाप्रमाणे नामुष्कीची वेळ आली आणि तो हिरोचा झीरो झाला. इंडिया गॉट लेैटंटनेही त्याचीच पुनरावृती केली आहे.

ज्या रणबीर अलाहाबादियाने वयाच्या २२ व्या वर्षीच लोकप्रियता मिळवून १ कोटीहून अधिक सबस्क्रायबर मिळवले, इन्स्टावर ४५ लाख फॉलोअर जमा करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली, ७ यूट्यूब चॅनेल काढले तसेच Monk Entertainment चा तो सहसंस्थापकही झाला. महिन्याला ३५ लाख रुपये आणि इतर कंपन्यांच्या ब्रँडिंगमधून पैसा कमावत तो याच सोशल मीडियामुळे ६० कोटींचा मालक झाला. हे सगळे त्याने त्याच्या टॅलेंटवरच केले हेदेखील खरे आहे. आज भारताचा तो सर्वाधिक लोकप्रिय यूट्यूबर, पॉडकास्टर आहे.

रणबीरने बियर बायसेप या शोमध्ये अनेक दिग्गजांना आणले. हा शो इतका लोकप्रिय झाला की नंतर तर लोक पैसे घेऊन आमचा इंटरव्यू घे यासाठी त्याच्या ऑफिसबाहेर रांगाही लावू लागले, पण समय रैनाच्या शोमध्ये गेस्ट म्हणून गेलेल्या रणबीरने अश्लाघ्य टिप्पणी केली आणि तो आता एकाकी पडला आहे. शोमध्ये अध्यात्माच्या बाता मारणारा, संस्कारी असल्याचा आव आणणारा रणबीर प्रत्यक्षात गुड बॉय नसून बॅड बॉय असल्याचा टॅग त्याला लावण्यात आला आहे. कारण त्याने केलेली अश्लील विधानं त्याची मानसिकता दर्शवणारी आहेत.

विशेष म्हणजे रणबीरने केलेले ते विधान त्याचे नसून ते एका इंग्रजी मुलाखतकाराच्या तोंडातले आहे. ते त्याने कॉपी केले, पण ते बोलण्यासाठी जे धारिष्ठ्य लागते ते रणबीरमध्ये आहे किंवा तो त्याच भाषेत बोलत असावा, असे शोज तोही आवडीने बघत असावा, म्हणूनच तर तो बोलू शकला असा कयास लावला जात आहे. समय रैनाला समन्स पाठवण्यात आले आहे, तर इंडिया गॉट लैटेंट या यूट्यूब चॅनेलच्या शोमध्ये सहभागी झालेल्यांचीही चौकशी होत आहे. आयोजकांवर गुन्हे दाखल झाल्याने येणारे दिवस रैना आणि रणबीर यांच्यासाठी कोर्टाच्या पायर्‍या झिजवणारे आहेतच.

तर दुसरीकडे या सगळ्या प्रकारावर बोलायचे झाले तर मागणी तसा पुरवठा असे काहीसे आपल्याकडे या डार्क कॉमेडी शोचे झाले आहे. सेक्सवर विधाने, अश्लील शेरेबाजी करणे आपल्याकडे असभ्यपणाचे लक्षण आहे. यामुळे अशी भाषा वापरण्यास आपल्याकडे अलिखित मनाई आहे. त्यामुळे अशी भाषा फक्त भांडण, वादविवादात शिव्यांच्या माध्यमातून आपल्या कानावर कधी ना कधी पडते.

यामुळे या अश्लील भाषांमधूनही आनंद घेणारा जो गट आहे तो या डार्क कॉमेडीचा मोठा चाहता आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये सामील होणारे जरी हायफाय असले तरी त्यांचेच अनुकरण त्यांचे चाहते करत असल्याने असे शोज समाजासाठी धोकादायकच आहेत. यामुळेच बियर बायसेपमध्ये समाजाच्या विविध गोष्टींवर प्रकाश पाडणारा रणबीर अलाहाबादिया जेव्हा पालकांवर आक्षेपार्ह टिप्पणी करत हसत सुटला ते त्याच्या चाहत्यांना रुचले नाही. रणबीरचा दुटप्पीपणाच त्याला लयास घेऊन गेला.

रणबीर आणि रैना यांना मिळालेल्या धड्यामुळे गल्लीबोळातले डार्क कॉमेडियन्सही सावध झाले असून यूट्यूबवरून पैसा मिळवण्यासाठी काहीही चाळे करण्याआधी शंभर वेळा विचार करतील अशी आशा बाळगण्यास हरकत नाही, पण ही अश्लील विनोदाची कीड फक्त इंग्रजी किंवा हिंदी भाषांपुरतीच मर्यादित नसून आपल्या मराठीतही तिने एण्ट्री केली आहे. डबल मिनिंगमध्ये जोक करून प्रेक्षकांना हसवून टीआरपीच्या जोरावर पैसा कमावणारे अनेक प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर बोकाळले आहेत.

आज अनेक मराठी हास्य मालिकांमध्येही अशा डबल मिनिंगचा सर्रास वापर होताना दिसतो, पण त्यावरही बोलणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक पवित्रा घेत भाडीपाला अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले. मनसे चित्रपट सेना पुणे शहराध्यक्ष चेतन धोत्रे यांनी तर यावर थेट पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये त्यांनी भाडीपा या मराठी यूट्यूब चॅनेलला लक्ष्य केले. त्यामुळे पुढील धोका ओळखून शहाणपणा दाखवत भाडीपा टीमने शोच रद्द केला. पुढच्याला ठेच मागचा शहाणा असाच काहीसा हा प्रकार आहे.