Homeसंपादकीयअग्रलेखDispute In Mahayuti : नांदा सौख्य भरे...

Dispute In Mahayuti : नांदा सौख्य भरे…

Subscribe

आझाद मैदानावरील भव्यदिव्य सोहळ्यात गुरुवारी सायंकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात राज्यातील जनतेने २८८ पैकी २३२ जागा निवडून देत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीच्या पारड्यात भरभरून दान टाकले. दणदणीत मताधिक्याने विजय मिळाल्याने निकालानंतर पुढच्या दोन-चार दिवसांतच महायुतीचे सरकार स्थापन होईल, अशा अटकळी बांधल्या जात होत्या.

प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदावरून झालेली खेचाखेच आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे महायुतीचे सरकार अस्तित्वात यायला १० दिवसांहून अधिकचा वेळ लागला. आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसोबत केंद्रातील सर्वच प्रमुख खात्याचे मंत्री, भाजपशासित राज्यातील आणि मित्र पक्षाचे मुख्यमंत्री, देशातील नामांकीत उद्योजक, सिने कलाकार, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींचा मेळा जमला होता. भाजपने या शपथविधी सोहळ्यासाठी अतिशय नियोजनबद्ध तयारी केली होती.

राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या लाडक्या बहिणींनी या शपथविधी सोहळ्याला चार चाँद लावले. आपापल्या भागातला कोण कोण आमदार मंत्री होणार याची महायुतीच्या घटकपक्षातील सर्व कार्यकर्त्यांना आधीपासूनच उत्सुकता लागलेली होती. परंतु, गुरुवारी सायंकाळी ५.३५ ते ५.४५ या वेळेत मुख्य व्यासपीठावर उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अवघ्या १० मिनिटांतच हा ग्रॅण्ड मेळा पांगला आणि राज्यातील जनतेनेही सुटकेचा नि:श्वास सोडला.

अखेर महायुती सरकारचं घोडं गंगेत न्हालं, अशीच बोलकी प्रतिक्रियादेखील अनेकांनी नोंदवली. रेकॉर्डब्रेक यशानंतर १० दिवसांचा वेळ घेऊन शपथविधी सोहळ्याचे फूलप्रूफ प्लानिंग करूनही केवळ तिघांचाच शपथविधी होतो, यावरून महायुतीत मंत्रिमंडळातील खातेवाटपाचा पेच न सुटल्याचे संकेत मिळतात. निवडणुकीत भाजपला १३२ जागा, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा जिंकण्यात यश आले आणि सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप महायुतीतला मोठा भाऊ ठरला. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्रीपदही भाजपच्याच हाती राहणार हे उघड सत्य होते.

मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांच्या हाती सोपवायचे की नवा चेहरा आणायचा एवढाच प्रश्न भाजपपुढे होता. तरीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरून ताणून धरत, फडणवीसांची कधी थेट तर कधी अप्रत्यक्षरित्या कोंडी करत भाजपश्रेष्ठींची नाराजी ओढावून घेतली. खरे तर शिवसेनेतील फुटीनंतर भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांना मागच्या महायुती सरकारमध्ये भाजपश्रेष्ठींच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली होती.

एवढेच नाही, तर भाजपश्रेष्ठींनी मोठी जोखीम पत्करत मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्रीपदी अर्थात दुय्यम स्थानावर बसवले होते. अजित पवारांच्या समावेशानंतर प्रत्येक पक्षाकडे समसमान मंत्रीपदे दिली. शेवटपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराला बगल देत भाजपश्रेष्ठींनी महायुतीतील समतोल कायम ठेवला. या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या जोरावर तुफान बॅटिंग केली.

कधीकाळी केवळ ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित प्रतिमा असलेल्या एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात जनाधार मिळवला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्येक जिल्ह्यात खिंडार पाडले. जुन्या जाणत्या नेत्यांपासून ते तळागाळातील पदाधिकार्‍यांचे जाळे नव्याने विणले. प्रत्येक व्यासपीठावरील दणकेबाज भाषणांसोबत मुख्यमंत्री या नात्याने जनतेसाठी आणलेल्या योजनांमुळे एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय नेते म्हणून लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.

जो बोएगा, वो पाएगा या हिंदीतील म्हणीनुसार निकालानंतर अपेक्षेनुसार मोठा भाऊ असलेल्या भाजपने सर्व सूत्रे हाती घेतली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले. परंतु या बैठकीत फॉर्म्युला फायनल होऊ शकला नाही. दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रातात परतलेल्या एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीत कमालीचा बदल जाणवू लागला.

मुख्यमंत्रीपद हातचे गेल्यामुळे असेल वा मंत्रिपदाच्या वाटाघाटीत यश न आल्यामुळे असू शकेल, परंतु हा बदल सर्वांनाच जाणवला. मुख्यमंत्रीपद नाही तर गृहमंत्रीपद द्या, गृहमंत्रीपद नाही तर नगरविकास, अर्थखाते आणि इतर महत्त्वाची खाती द्या, असा लकडा एकनाथ शिंदेंनी भाजपश्रेष्ठींपुढे लावल्याच्या चर्चांनी उधाण आले. मंत्रिमंडळ फॉर्म्युल्याचे आकडे समोर येऊ लागले. यात नेमके तथ्य किती वा अफवा किती हे तेच जाणोत.

अगदी शपथविधी तोंडावर आलेला असताना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील की नाही याचा सस्पेन्स कायम होता. याउलट दिलखुलास अजित पवार यांनी, शिंदेंचे माहीत नाही, पण मी तर शपथ घेणार, असे म्हणत सर्वांनाच पत्रकार परिषदेत खळखळून हसवले. शपथविधी सोहळ्यात एकमेकांशी गुजगोष्टीत रंगलेले फडणवीस आणि अजितदादा एका बाजूला तर एकनाथ शिंदे दुसर्‍या बाजूला असे चित्र होते.

शपथविधीनंतरही एकत्रित पत्रकार परिषद न घेता एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब भवनात पत्रकार परिषद घेणे पसंत केले. शपथविधीनंतर सर्वांचे लक्ष लागलेय ते खाते वाटपाकडे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही महत्त्वाच्या खात्यांवर दावेदारी असेल. एकनाथ शिंदे नाराज असले तरी यांनी सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता पुढे जनहितासाठी नांदा सौख्य भरे हीच तिघांकडून लोकांची अपेक्षा आहे.