Eco friendly bappa Competition
घर संपादकीय अग्रलेख तेल लावलेला पैलवान..!

तेल लावलेला पैलवान..!

Subscribe

2014 नंतर देशात मोदी पर्व सुरू झाले आणि या मोदीपर्वात जे पावन झाले ते भाग्यवंत ठरले आणि जे मोदी पर्वात सामील झाले नाहीत ते मात्र कपाळ करंटे ठरले असेच एकूण देशातील राजकीय चित्र आहे. देशातील हाताच्या बोटावरदेखील कमी असावेत एवढेच मोदी विरोधक नेते आजच्या घडीला मोदीविरोध अंगावर घेऊन कसंबसं स्वतःचं संस्थान टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि त्या अत्यंत मोजक्या विरोधकांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषीमंत्री, माजी संरक्षण मंत्री तसेच महाराष्ट्राचे तब्बल चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांचा समावेश होतो. देशातील सर्वात कमी खासदार असलेल्या राष्ट्रवादीचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत. मात्र असे असले तरी देखील 2014 ते 2019 या पहिल्या मोदी पर्वामध्ये हेच शरद पवार देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू होते.

मोदींनी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात ही कबुली दिली होती की, मी शरद पवारांचे बोट पकडून राजकारणात आलो. इतकेच नव्हे तर मी महिन्यांतून निदान दोनदा तरी पवारांना फोन करून त्यांचा सल्ला घेत असतो. अर्थात, मोदी म्हणतात, त्यात काही तथ्य नाही, कारण त्यांची आणि माझी राजकीय विचारसरणी वेगळी असल्याने त्यांनी माझे बोट पकडून राजकारणात येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे पवारांनी नंतर स्पष्ट केले होते. पण मोदींनी जाहीरपणे पवारांना गुरुपद देऊन त्यांना आपलेसे करून घेतले होते. कारण काहीही झाले तरी पवारांशिवाय महाराष्ट्रातील पान हलत नाही, याची मोदींना कल्पना आहे. त्यामुळे बरेचदा मोदी शरद पवारांना तोंडावर गोड बोलून खूश ठेवत असतात. कारण पवारांशी थेट पंगा घेणे आपल्याला परवडणारे नाही हे त्यांना माहीत आहे. २०१९ साली भाजपच्या हातातोंडाशी आलेली राज्यातील सत्ता काढून घेऊन पवारांनी ते सिद्ध करून दाखवले आहे. पावसात भिजून त्यांनी पाण्यालाही कशी आग लावता येते हेही दाखवून दिले आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनी दिलेल्या बारामती भेटीचे आमंत्रण स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे बारामती मॉडेल पाहायला त्यावेळी बारामतीमध्ये आले होते आणि याच वेळी त्यांनी जाहीर सभेत बोलताना शरद पवार हे आपले राजकीय गुरु आहेत त्यांचे बोट धरूनच आपण राजकारण शिकलो असे जाहीर विधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानावरून त्यावेळी भल्या भल्यांच्या पोटात गोळा आला होता. शरद पवार हे कधी काय करतात याचा कोणताही भरोसा नसल्यामुळे ज्यावेळी 2014 मध्ये राज्यात भाजपाला स्वबळावर 122 जागा मिळाल्या आणि बहुमतासाठी फारच थोड्या मतांची आवश्यकता होती. त्यावेळी शरद पवार हे एकमेव असे नेते होते की त्यांनी देशाच्या राजकारणाचे बदललेले वारे पाहून महाराष्ट्रातील भाजप सरकारला बिनशर्त बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला होता. शरद पवार यांच्या या बिनशर्त एकतर्फी बाहेरून पाठिंबा जाहीर करण्याच्या घोषणेमुळे 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात भाजपबरोबर राज्यात सत्तेत असूनदेखील शिवसेनेची स्थिती पूर्णतः खिळखिळी झाली होती. हे सांगण्यामागचे प्रयोजन म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्रातील तसेच देशातील एक अजब रसायन आहे. 1990-95 च्या काळामध्ये मुंबई महापालिकेत तत्कालीन उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी शरद पवार यांच्या विरोधात मोठी आघाडीच उघडली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे बेलगाम आणि बेछूट आरोप करत ट्रकभर पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात जेव्हा वेळ आली तेव्हा ते साधा कागदाचा एक चिटोरादेखील शरद पवार यांच्या विरोधात पुरावा म्हणून सादर करू शकले नाहीत. हे सर्व सांगण्यामागे भाजपचे मुंबईतील आमदार आणि प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर सध्या गाजत असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी केलेला आरोप हा निश्चितच गंभीर आहे.

गोरेगाव येथील या पत्राचाळ घोटाळ्यातच शिवसेनेचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे गेले दीड महिने ईडीच्या कोठडीत आहेत. पत्राचाळ घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या ईडीने यामध्ये शरद पवार यांच्याही नावाचा उल्लेख केल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. अर्थात याबाबत बुधवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. तसेच जर या प्रकरणात माझा कुठलाही संबंध आढळून आला नाही तर माझ्यावर आरोप करणार्‍यांवर राज्य सरकार कोणती कारवाई करणार आहे, अशी विचारणादेखील त्यांनी या निमित्ताने केली आहे. अर्थात, भारतीय राजकारण हे आरोप प्रत्यारोपांभोवती फिरत असते. प्रत्यक्षात किती आरोप सिद्ध होतात हा एक संशोधनाचा विषय आहे. तथापि राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना मीडियामधील प्रसिद्धीचा खटाटोप यामध्ये अधिक असतो. मोठ्या नेत्यांवर आरोप केले की, प्रसार माध्यमेदेखील त्याची तातडीने दखल घेतात आणि मग आरोप करणारा हा लहान नेता असेल अथवा मोठा नेता असेल त्याची खातरजमा न करता सर्व आरोप त्यांच्या तोंडी घालून प्रसार माध्यमे मोकळी होत असतात.

- Advertisement -

पत्राचाळ घोटाळ्यामध्ये शरद पवार यांचा सहभाग आहे की नाही याची शहानिशा करणार्‍या विविध सरकारी संस्था आहेत. त्यांना गरज वाटल्यास त्या चौकशी करतीलच. मात्र त्याचबरोबर शरद पवार हे तेल लावलेले पैलवान आहेत, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गमतीने म्हणायचे हे भाजप नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. यापूर्वीदेखील राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी ईडीमार्फत शरद पवार यांना त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तेव्हा शरद पवार यांनी त्यांचा हिसका दाखवला होता. त्यामुळे शरद पवार हे वयाने वृद्धत्वाकडे जरूर झुकले असले तरी राजकीय कुस्त्यांच्या मैदानात ते अद्यापही तेल लावलेले रांगडे पैलवान आहेत हे त्यांच्यावर आरोप करणार्‍या नेत्यांनी कायम स्मरणात ठेवले पाहिजे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत अटकेत असल्यामुळे त्याचा आधार घेत शरद पवार यांनाही जर भाजपचा हा कोंडीत पकडण्याचा डाव असेल तर तो मात्र भाजपवर उलटल्याशिवाय राहणार नाही. कारण ग्रामीण महाराष्ट्र हा आजही शरद पवार यांच्या पाठीशी आहे. आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील ताकद दाखवून दिली आहे हेही भाजपवाल्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisment -