भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी पत्रकाराला उत्तर देताना पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, असे ठणकावून सांगितले. पाकिस्तानने चोरलेला तो भाग भारतात आला की तिथे शांतता नांदेल, असे सांगितले. त्यावर पाकिस्तानने उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या प्रश्नावर ज्या आक्रमकपणे हे विधान केले, ते ऐकून पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे.
जयशंकर यांचे म्हणणे पूर्णपणे निराधार असल्याचे म्हणत पाकिस्तानने पुन्हा गळा काढायला सुरुवात केली. त्यामुळे जागतिक पातळीवर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील वादग्रस्त काश्मीरचा मुद्दा चर्चेत आला. 2019 पासून एस. जयशंकर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची धुरा वाहत आहेत.
अत्यंत हुशार, चाणाक्ष आणि अभ्यासू पण तेवढेच आक्रमक परराष्ट्रमंत्री म्हणून एस. जयशंकर यांनी मागच्या 6 वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. परराष्ट्रमंत्री होण्याआधी ते भारताचे परराष्ट्र सचिव होते. एवढेच नाही तर अमेरिका, चीनसारख्या राजनैतिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि तितक्याच महत्त्वाच्या देशांत भारताचे राजदूत म्हणून काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या जबाबदार्या त्यांनी आतापर्यंत चोख बजावल्या आहेत. अगदी अटीतटीच्या काळातही त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू समर्थपणे लढवली आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे संपूर्ण जगाने रशियावर आर्थिक निर्बंध लादलेले असताना भारताने रशियासोबतच्या व्यापारात खंड पडू दिला नाही. यावरून युरोपियन देश, अमेरिका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न करीत होते.
तेव्हा एस. जयशंकर यांनी रशियाकडून आलेले कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू वापरूनच युरोपच्या घरात दिवाबत्ती पेटत असल्याचे म्हणत खडे बोल सुनावले होते. एवढ्यावरच न थांबता अमेरिकेच्या इशार्यानंतरही भारताने रशियासोबत एस 400 एअर डिफेन्स सिस्टम खरेदीचा करार तर केलाच, पण सोबतीलाच तेजस एमकेआय फायटर जेटसाठी अमेरिकेच्याच जीई कंपनीबरोबर इंजिन खरेदीचा करारही बायडेन सरकारच्या नाकावर टिच्चून करून दाखवला.
मालदिवसारखा इवलासा देश सत्तापालटानंतर चीनच्या प्रभावाखाली येऊन भारतासोबतचे संबंध बिघडवू पाहत होता. तेव्हा एस. जयशंकर यांनीच डोके शांत ठेवून मालदिवचेही डोके ठिकाणावर आणले. याचप्रकारे आधी श्रीलंका आणि आता बांगलादेशला त्यांची जागा दाखवताना ते दिसतात. खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडोने आरोप करीत भारताला भंडावून सोडले होते. तत्कालीन बायडेन सरकारनेही ट्रूडो यांची साथ दिल्यामुळे भारत अडचणीत आला होता.
देशांतर्गत राजकीय स्वार्थासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचे ट्रूडो यांचे प्रयत्न सुरू असताना त्यांच्याच साम्राज्याला अलगद सुरूंग लागला. कॅनडा सरकारच्या एका संस्थेने एक अहवाल जारी करीत ट्रूडोंचे आरोप निराधार ठरवले आणि भारतालाही क्लीन चिट देऊन टाकली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ही जोडगोळी पडद्यामागे हालचाली करण्यात माहीर आहे.
अगदी याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला हलकेच टाचणी टोचली. एस जयशंकर हे सध्या ब्रिटन आणि आयर्लंड दौर्यावर आहेत. येथे ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. त्यातच जयशंकर लंडनच्या थिंक टँक चॅथम हाऊस येथे आयोजित एका चर्चासत्रात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांना काश्मीरमध्ये शांतता केव्हा नांदेल, असा प्रश्न विचारण्यात आला.
अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर काही अजेंडे ठरवून असे प्रश्न विचारले जातात. राजनैतिक अधिकार्याला अडचणीत आणणे किंवा त्याला एखाद्या विषयावर भूमिका घेण्यास भाग पाडणे हा त्यामागचा उद्देश असतो. त्याचप्रमाणे काश्मीरच्या प्रश्नावर एस. जयशंकर यांनी अत्यंत तिखट शब्दांत उत्तर दिले. त्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट तर झालाच पण संपूर्ण जगाच्याही भुवया उंचावल्या. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही तीन टप्प्यांचा कार्यक्रम आखला आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
पहिल्या टप्प्यात आम्ही कलम ३७० हटवले. दुसर्या टप्प्यात काश्मीरमध्ये विकास व आर्थिक उलाढाल वाढवण्यासह सामाजिक न्याय बहाल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तिसर्या टप्प्यात काश्मीरमध्ये मतदानाचे प्रमाण वाढवून लोकशाही अधिक बळकट करण्याचे काम केले जात आहे. आता पाकिस्तानने चोरलेला भारताचा भाग अर्थात पाकव्याप्त काश्मीर भारताला परत दिल्यानंतरच जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल, असे जयशंकर सर्व नेत्यांसमोर अगदी रोखठोकपणे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सर्वसाधारणपणे डिप्लोमॅटीक उत्तर दिले जाते, पण यावेळी जयशंकर यांची देहबोली करारा जबाब मिलेगा अशीच होती. या कार्यक्रमानंतर काही खलिस्तान समर्थकांनी लंडनमध्ये जयशंकर यांची कार अडवून घोषणाबाजी केली. जयशंकर यांच्यासाठी अर्थातच हे नवीन नाही.
भारतातही विरोधकांकडून केंद्र सरकार पाकव्याप्त काश्मीर परत कधी आणणार, चीनने बळकावलेल्या लडाखमधील भागाचे काय, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावताना केलेल्या वक्तव्यामुळे कुणाला मिरच्या झोंबल्या असतील तर त्यावर ज्याने त्यानेच इलाज करावा.