विजय तेंडुलकर यांचा जन्म 6 जानेवारी 1928 रोजी मुंबईत गिरगाव येथे झाला. घरातील साहित्यिक वातावरणाने तरुण विजयला लेखनास प्रवृत्त केले. वयाच्या 6 व्या वर्षी त्यांनी पहिली कथा लिहिली. पाश्चिमात्य नाटकं पाहून ते मोठे झाले आणि स्वत: नाटकं लिहिण्याची प्रेरणा मिळाली. 11 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या पहिल्या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला. 14 व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडून 1942 च्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. तेंडुलकरांनी वृत्तपत्रांसाठी लेखनाने करिअरची सुरुवात केली. ‘गृहस्थ’ हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, विकारांचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.
शांतता! कोर्ट चालू आहे… यासारख्या नाटकातून बंडखोर वाटणार्या विषयांनाही त्यांनी हात घातला. ‘सखाराम बाईंडर’मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि ‘घाशीराम कोतवाल’मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.
१९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये ‘आक्रोश’ चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार, १९८३ मध्ये ‘अर्धसत्य’साठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरव पदक आदी पुरस्कारही त्यांना मिळाले. मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मीळ रोगाशी लढताना १९ मे २००८ रोजी विजय तेंडुलकर यांचे पुण्यात निधन झाले.