Homeसंपादकीयदिन विशेषDr. Shivram Karanth : प्रसिद्ध लेखक डॉ. शिवराम कारंथ

Dr. Shivram Karanth : प्रसिद्ध लेखक डॉ. शिवराम कारंथ

Subscribe

सुप्रसिद्ध कन्नड लेखक, तत्त्वचिंतक, विचारवंत, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते, समाजसुधारक डॉ. शिवराम कारंथ हे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व होते. ते भारतीय साहित्यविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०२ रोजी कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यातील कोट या गावी झाला. त्यांचे वडील शेष कारंथ शिक्षक होते. कुंदापूर येथे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. मंगलोर येथे महाविद्यालयात इंटरच्या वर्गात शिकत असतानाच महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात ते सहभागी झाले आणि शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात उतरले. समाजसुधारणेचा एक भाग म्हणून याच काळात त्यांनी नाटके लिहायला आणि नाटके बसवायला सुरुवात केली. त्यासाठी लेखन केलं आणि इतर भाषांतील नाटकांचे अनुवादही केले.

शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना आस्था होती. शाळांचे ‘कोंडवाडा’ हे स्वरूप त्यांना मुळीच मान्य नव्हते. त्यांनी वर्तमान शिक्षण प्रणालीतील दोष लक्षात घेऊन स्वत: पाठ्यपुस्तके लिहिली. शब्दकोश, विश्वकोशाची निर्मिती केली. त्यांनी तयार केलेली शालेय पाठ्यपुस्तके आजही कर्नाटकात वापरली जातात. मुलांसाठी बालप्रपंच हा ज्ञानकोश, तसंच प्राणी प्रपंच, पक्षी प्रपंच कोश, विज्ञान कोश तयार केले. ‘दी व्हिस्परिंग अर्थ’ हा त्यांच्याच कादंबरीचा इंग्रजी अनुवाद. ‘चोमन दुडी’ या त्यांच्या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘चोमा महार’ या नावाने श्यामलता काकडे यांनी केला आहे. १९७७ साली त्यांना कन्नड कादंबरी ‘मूकज्जिय कनसुगलु’साठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही कादंबरी १९६१ ते १९७० या कालावधीत प्रकाशित भारतीय भाषेतील सृजनात्मक साहित्यात सर्वश्रेष्ठ म्हणून निवडण्यात आली. शिवराम कारंथ यांचे ९ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.