-प्रदीप जाधव
आजच्या आधुनिक युगात निस्वार्थी माणूस शोधून सापडणार नाही, हे सत्य असलं तरी मनुष्य स्वभावत:च स्वार्थी आहे. परंतु स्वार्थ किती? त्याला मर्यादा असावी. जगण्यापुरती आवश्यक असणारी स्वार्थी तडजोड समजू शकतो, परंतु आपल्यानंतर पुढच्या शंभर पिढ्यांसाठी अमर्याद माया जमा करून हे जग सोडून गेल्यानंतरसुद्धा लोकांच्या शिव्या शापांची लाखोली खाणं यात कोणती मर्दुमकी? जगातील सर्व सुख मलाच मिळावं यासाठीच सर्व आटापिटा करतात.
आपल्याकडे ग्रामपंचायत सदस्य झाला की, त्याला राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागतात. राजकीय वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आपली पात्रता आहे की नाही हे न तपासता आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा अवलंब करून मोहाच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कितीही मुडदे पाडले तरी चालतील, परंतु स्पर्धेच्या आड येणार्याला जिवंत ठेवणार नाही अशी प्रतिज्ञाच केली जाते.
स्पर्धा, दुसर्याला शह देण्यासाठी, भौतिक सुख उपभोगण्यासाठी आणि दिखाव्यासाठी केलेल्या कृत्यामुळे अनेक दुष्परिणाम भोगायला लागलेल्याची जगाच्या इतिहासात उदाहरणं आहेत. जाणिवा बोथट झालेल्या समाजात परिपूर्ण माणूस होण्यासाठी कुणीही अट्टाहास करीत नाही. एखादे दुष्कृत्य केल्यानंतरही माझी चूक झाली, मी माफी मागतो हा शहाणपणा कोणाला सुचत नाही. आपल्याविरुद्ध आक्रोश झाला तरच औपचारिकता म्हणून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं बोलून पुढच्या चुकीसाठी तयार होतात. शहाणी माणसं आपल्यातील चुका, दोष, उणिवा, कमीपणा कधीही शोधत नाही.
यावर संत कबीर म्हणतात, बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया आ कोय, जो दिल खोजा आपना मुजसे बुरा न कोय. मी सगळ्या दुनियेला वाईट समजतो पण मी स्वत:ला जेव्हा शोधतो तेव्हा माझ्यापेक्षा कोणी वाईटच नाही असं संत कबीर समजावून सांगतात. लोक मात्र कबिराचे दोहे पाठ करतात. स्वत:चं अंतर्मन कधीही तपासत नाहीत. स्वत:ला शोधण्याची प्रक्रिया प्रत्येकाच्या हृदयातून आली पाहिजे. ती लादून चालणार नाही. माझे आजोबा, वडील देशाच्या सीमेवर रक्षण करीत होते, त्यांनी देशसेवा केली आहे, मलाही त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालवायचा आहे ही जाणीव आता राहिली नाही. मात्र राजकीय वारसदारांचं पीक आलं आहे.
‘हे विश्वचि माझे घर’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘भूतलावरील सर्वांचे कल्याण होवो! या भावनेने सर्वांवर माया, ममता, दया, करूणा, प्रेम करून आणि स्वतःचे दोष, उणिवा समजून परिवर्तित करून घेऊ तेव्हाच पृथ्वीवरील विषमताही नष्ट होईल आणि माणसांचं राज्य येईल. ही संकल्पना अतिशय व्यापक असली तरी हे आभास नाही. माझ्या प्रतिस्पर्धी माणसाकडे प्रचंड संपत्ती आहे, मलाही तेवढीच जमवायची आहे, यासाठी स्पर्धा असते, परंतु एखाद्या माणसाकडे प्रचंड ज्ञान आहे ते प्राप्त करण्यासाठी स्पर्धा करण्याची आपली मानसिकता नाही.
जगा आणि जगू द्या हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे सजगदृष्टीने आपण जगताना इतरांना दुखावणार नाही याची काळजी घेत मानवी दृष्टिकोनही जपला पाहिजे. माझं जेवण झालं तू काही खाल्लंस का? ही खबरबात घेण्याची सवय आता राहिली नाही. समोरच्याचं दु:ख आपलं मानलं की आनंद द्विगुणित होतो हे सूत्र आत्मसात करायला हवं. दुसर्याला लागलेली ठेच, त्याची वेदना आपल्यालाही व्हायला हवी.
अर्थात दुसर्याचं दुःख कळण्यासाठी विशाल हृदय, आभाळाएवढं काळीज असणारा माणूस व्हायला हवं. माणूस होणे ही प्रक्रिया तितकी सोपी नसली तरी कठीण नाही. त्याकरिता आपल्यात असणारा राग, लोभ, द्वेष, इर्षा, मत्सर, मीपणा गळून पडायला हवा. मानव तितका एक समान हा धागा पडून आपल्याला जीवन जगता आलं तरच खर्या अर्थाने आपण सम्यक जीवन जगलो, असं समजायला हरकत नाही. असं म्हणतात, मीपण ज्याचे गळले, जीवन त्यालाच कळले.
विद्यावाचस्पती विद्यानंद यांची आतापर्यंत विविध विषयांवरची ४५ पुस्तकं प्रकाशित असून ५ पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. दोन विषयांवर त्यांनी पीएचडी संपादन केली असून सतत लेखन आणि दिवसातील १७ तास मौन पाळतात ही त्यांची खासियत आहे. अध्यात्माकडे वळलेले विद्यानंद बहुआयामी व्यक्तिमत्व असून मानसशास्त्रीय समुपदेशक आध्यात्मिक मार्गदर्शक ही त्यांची खास ओळख आहे.
विद्यावाचस्पती विद्यानंद मनोगतात लिहितात, आपल्या स्वप्नातल्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण अनुभवताना, जीवनशैली निवडताना आपल्या आशा, अपेक्षा यांच्या परिपूर्ततेसाठी प्रत्येक बाबींचा विचार करणं आवश्यक आहे. आपली सजगता, सतर्कता आणि सौंदर्यदृष्टी यांचा मिलाफ आपण आपल्या जीवनात घडवून आणू शकतो. आपल्या सभोवतालच्या वातावरणातील नकारात्मकता दिवसेंदिवस आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहार ह्यावर थेट विपरीत परिणाम करू लागली आहे.
त्याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे. तो टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीला सकारात्मकतेची जोड देणे जरुरीचे झाले आहे. त्यातही विचार, वर्तन आणि व्यवहार हा क्रमदेखील टिकवून ठेवणे आवश्यक आहे. हा क्रम टिकवला तर कोणीही विक्रम, पराक्रम करू शकतो. परंतु क्रम चुकला तर मात्र तोच चक्रम होऊ शकतो. चक्रावून जाऊ शकतो.
मानवी जीवनाची पहाट सकारात्मकरित्या होण्यासाठीच त्यांनी सर्व लेख लिहिले आहेत. या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरचे एकूण २५ लेख असून अव्यक्त व्यक्तिमत्व या लेखात ते लिहितात, मनाला रमवण्यासाठी आणि नवं आजमावण्यासाठी आपल्या अंतर्मनाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो, आपल्या मनाला नीट समजून घ्यावं लागतं. आपल्याच मनाचा अनेकदा आपल्याला अंदाज येत नाही. आपलं मन वर वर कितीही शांत वाटत असलं तरीही, काही वादळे आतल्या आत चालूच असतात, काही वेळा अंतर्मनाला उद्ध्वस्त करत असतात.
विचारांचं थैमान सदोदित चालूच असतं, परंतु त्या विचारांना किनारा सापडत नसतो, वाट सापडत नसते. हे आपल्याला अनेकदा कळत असतं; पण वळत नसतं, हीच तर उणीव असते. अज्ञावंत नव्हे प्रज्ञावंत व्हावं या लेखात ते म्हणतात, आपण अनेक सुज्ञांनादेखील काही वेळा अज्ञानी ठरवत असतो. त्यांच्या उणिवा शोधण्यात आपण स्वत:ला धन्य समजत असतो. आपल्या कर्तृत्वाच्या, वक्तृत्वाच्या आणि नेतृत्वाच्या माध्यमातून आपण सुज्ञ, सज्ञानी आहोत म्हणून काही वेळा टेंभा मिरवत असतो. हीच उणीव म्हणावी लागेल.
दिवसाची सुरुवातच सकारात्मक विचारांनी झाली, तर नंतरचा दिवस उजाडेपर्यंत आपण आनंदी, सुखी, समाधानी तर राहू शकतोच, शिवाय मन:शांती अधिक प्राप्त होत राहते. आपण स्वत: प्रसिद्ध होण्याची इर्षा असते आणि ती असलीच पाहिजे, पण प्रसिद्ध होण्यासाठी अगोदर स्वत:ला सिद्ध करण्याची जरुरी असते, हे मात्र आपण विसरतो. केवळ विचारात, स्वप्नात, भ्रमात आणि संभ्रमात अडकून न पडता कार्यकक्षांच्या मर्यादा ओलांडाव्या लागतात, स्वत:ला झोकून देऊन प्रत्यक्ष कार्यकृती करावी लागते, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे.
आपल्यापैकी प्रत्येकात काही उणिवा असतातच, उणिवा नसणारी व्यक्ती सापडणे सद्य:स्थितीत विरळच; कालच्या काही उणिवा कुरवाळत बसण्यात आपण धन्यता मानतो, सतत उणिवांचीच, समस्यांचीच, दु:खाचीच सर्वत्र आणि सातत्यानं आपण चर्चा करत राहतो. आजच्या आपल्या आणि इतरांच्या जाणिवा जपण्याच्या दृष्टिकोनातून आपण खरंच गांभीर्यानं विचार करतो का? आपल्या बुद्धिवादी जीवाला कालच्या उणिवा दूर करून, आजच्या जाणिवा जपून त्यांना नेणिवेपर्यंत नेण्याची आज खरी गरज आहे. असाही मोलाचा सल्ला त्यांनी या पुस्तकातून दिला आहे. डॉ. गौतम बेंगाळे यांची प्रस्तावना लेखसंग्रहाचं महत्त्व अधोरेखित करते.
=लेखक -विद्यावाचस्पती विद्यानंद
=प्रकाशक -प्रेरणाभूमी प्रकाशन
=पृष्ठे -१०१, मूल्य-१५० रुपये