अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नव्याने आकाराला येणार्या मोदीविरोधी इंडिया आघाडीला धक्का बसला. कारण या आघाडीचा मुख्य चेहरा हा सध्या शरद पवार मानले जात आहेत. त्यामुळे अलीकडे जेव्हा त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असे जाहीर केलेे तेव्हाही मोदीविरोधी पक्षांमध्ये चलबिचल झाली होती. जेव्हा शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला, तेव्हा विरोधी पक्षातील मुख्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावरून देशात मोदीविरोधी फळी उभी करायची असेल, तर विरोधी बाजूला शरद पवारांची किती गरज आहे ते दिसून येते. पण शरद पवार यांचे पुतणे आणि शरद पवारांचे महाराष्ट्रातील राजकीय उत्तराधिकारी मानले जाणारे अजित पवार यांनीच पक्षातून बंडखोरी केल्यामुळे विरोधकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे. त्याच वेळी पक्षात बंड झाल्यावरही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष उफाळून आलेला नाही. जसे ठाकरे आणि शिंदे यांच्या गटांमध्ये दिसत आहे. तसेच अजित पवार यांचा गट शरद पवारांना जाऊन भेटतो, तसेच नुकतीच शरद पवार आणि अजित पवार यांची उद्योगपती चोरडिया यांच्या घरी भेट झाली. तेव्हा तर सगळेच विरोधक हादरले. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर भिष्माचार्यांकडून ही अपेक्षा नाही, त्यामुळे गैरसमज पसरत आहेत, असे वक्तव्य करून पक्षाच्या वतीने नाराजी व्यक्त केली. पवारांच्या या भूमिकेवरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांनी गंभीर विधाने केली. त्यामुळे शरद पवारांविषयी संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर शरद पवारांना स्वत: पत्रकार परिषद घेऊन आपण भाजपसोबत जाणार नाही, असे स्पष्ट केले.
शरद पवार यांनी आपण इंडिया आघाडीसोबतच राहणार असे स्पष्ट केल्यामुळे आता त्यांना नव्या दमाने पुन्हा पक्षाची उभारणी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात सभा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांची येवला आणि बीडमध्ये जाहीर सभा झाली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघावर त्यांचे विशेष लक्ष असेल. त्याआधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. येत्या काळात होणार्या सर्व निवडणुकांच्या दृष्टिकोणातून, राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक या सर्वांचा आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एकनिष्ठतेची मोहीम राबवण्याचे ठरले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आजच एकनिष्ठतेचे कार्ड डाऊनलोड करून घ्या, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली टीम भाजपकडे गेली आहे, आता पुढे पाहत रहा, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी चर्चा सुरू झाली. जयंत पाटील हे भाजपसोबत जाणार का, अशी विचारणा केली जाऊ लागली. त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देताना आपण शरद पवार साहेबांसोबत आहोत, असे सांगितले. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपण शरद पवारसाहेबांसोबत आहोत, हे दाखवून देण्यासाठी विशिष्ट क्रमांकावर मिस कॉल द्या, असे आवाहन केलेे आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये उभी फूट पडल्यामुळे त्या दोन्ही पक्षांमध्ये खरे तर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेते मंडळीच गोंधळात पडली आहेत, तर कार्यकर्त्यांची त्याहीपेक्षा अवघड परिस्थिती होऊन बसली आहे. त्यामुळे कुठला झेंडा हाती घ्यायचा, अशी त्यांची पंचाईत झालेली आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार, नगरसेवक आल्यामुळे आता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची पंचाईत झाली आहे. मागे जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडून पक्षामध्ये उभी फूट पडली, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्यांनी हातात शिवबंधन बांधणे बंधनकारक केले होते. आपण शिवसेनेशी एकनिष्ठ राहू अशी शपथही शिवसैनिकांना देण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात बंड झाले, मग त्या शिवबंधनाचा काय उपयोग झाला असा प्रश्न पडतो. आता शरद पवार यांच्या पुतण्याने बंड केल्यानंतर शरद पवारांशी एकनिष्ठ असलेल्यांसाठी मिस कॉल करून एकनिष्ठतेचे कार्ड डाऊनलोड करून घ्या, असे सांगितले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकनिष्ठ राहण्यासाठी आवाहन केले जात आहे, पण नेत्यांच्या एकनिष्ठतेचे काय, याचे उत्तर कार्यकर्त्यांना मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मिस कॉल कुणाला द्यायचा असा प्रश्न त्यांच्याही मनात असेल. कारण आपापल्या महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी नेते आपल्या पक्षातून बंडखोरी करत आहेत. पूर्वी नेते पक्षातून बाहेर पडून आपल्या समर्थकांसह वेगळा पक्ष काढत किंवा वेगळ्या पक्षामध्ये सामील होत. पण आता त्याच पक्षांमध्ये राहून पक्षाध्यक्षावर कुरघोडी करत खरा पक्ष आपलाच असल्याचा दावा करण्याची नवी पद्धत महाराष्ट्रात अंमलात आली आहे. त्यामुळे कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊन वाद न्यायालयापर्यंत जात आहेत, पण त्याचसोबत कार्यकर्त्यांचेही प्रचंड वांदे होत आहेत.