पॅकेज्ड ड्रिंकिंग मिनरल वॉटर अर्थात बाटलीबंद पाणी हे आता पिण्यासाठी सुरक्षित आहे की आरोग्यासाठी घातक आहे, हेच आता अनेकांसाठी समजेनासे झाले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) बाटलीबंद पाण्याचा उच्च जोखमीच्या अन्न श्रेणीमध्ये नुकताच समावेश करण्याचा निर्णय घेतला. बाटलीबंद पाण्यातून अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण अनेकांच्या शरीरात प्रवेश करत असल्याचे अनेक संशोधनांतून आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून पिण्यासाठी सर्वात सुरक्षित पाणी म्हणून मानले जाणारे पाणी हे पिण्यासाठी आरोग्यदायी नसल्याचे समोर येताच अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले. बाटलीबंद पाणी आरोग्यदायी नसले, तरी यावर पूर्णपणे बंदी आणण्याचा निर्णय काही अद्याप घेण्यात आलेला नाही. आरोग्यासाठी काही घातक रसायने तसेच अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण या पाण्यातून मानवी शरीरात जातात.
त्यामुळे कर्करोगासारख्या काही मोठ्या आजारांना निमंत्रण मिळते, असे लक्षात आल्यानंतर एफएसएसएआयने बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणार्या कंपन्यांवर काही कडक निर्बंध जरूर लागू केले आहेत, परंतु या निर्बंधांनंतर तरी बाटलीबंद पाणी हे पूर्णपणे आरोग्यदायी असेल का, हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात कायम घर करून आहे. कारण, इतक्या वर्षांपासून सर्वात सुरक्षित पाणी म्हणून ज्या बाटलीबंद पाण्याचा वापर जगभरातील नागरिकांकडून सर्रासपणे होत आहे, तेच पाणी आरोग्यासाठी धोकादायक आहे, हे जेव्हा अचानक कळते तेव्हा अनेकांच्या मनात नाना शंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत.
आतापर्यंत आपण आरोग्यदायी पाणी म्हणून चक्क धोकादायक पाण्याचे सेवन केले. आता पुढे काय? सुरक्षित पाणी म्हणून आपल्याकडे आता दुसरा पर्याय काय, असे नानाविध प्रश्न उभे राहले आहेत. याची उत्तरे सध्याच्या घडीला तरी मिळेनाशी झाली आहेत. बाटलीबंद पाणी धोकादायक असल्याचे समोर आल्यानंतर याजागी सुरक्षित आणि आरोग्यदायी पाणी म्हणून आणखी एखादा पर्याय अद्याप तरी समोर आलेला नाही.
धोकादायक बाटलीबंद पाण्याला लवकरच पर्याय जरूर शोधले जातील, परंतु सध्या तरी बाटलीबंद पाणी अधिकाधिक आरोग्यदायी आणि सुरक्षित कसे होईल, यासाठीच्या उपाययोजना करण्यावरच भर देण्यात आला आहे. एफएसएसएआयने सध्या तरी बाटलीबंद पाणी उत्पादक कंपन्यांवर काही प्रमाणात निर्बंध घालून पाणी आरोग्यदायी आणि सुरक्षित करण्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. या निर्बंधांनुसार बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणार्या कंपन्यांची आता किमान वर्षातून एकदा तरी एफएसएसएआयकडून तपासणी होणार आहे.
बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केल्यानंतरच उत्पादक कंपन्यांना पाणी विक्रीसाठीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. एफएसएसएआय विविध निर्बंधांद्वारे बाटलीबंद पाणी आरोग्यदायी आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्वागतार्ह आहेच, परंतु बाटलीबंद पाणी उत्पादक कंपन्या या निर्बंधांतून अन्य काही पळवाट शोधणार नाहीत, याकडेही तितकेच डोळकसपणे लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण, आपल्याकडे बाटलीबंद पाण्याच्या सुरक्षिततेबाबत अजिबात गांभीर्य असल्याचे जाणवत नाही.
नामवंत कंपन्यांच्या नावाने बनावट बाटलीबंद पाण्याच्या विक्रीचे प्रकार आपल्याकडे काही नवीन नाहीत. अशा कंपन्यांना बनावट बाटलीबंद पाणी विक्रीची परवानगीच कशी मिळते, हा मुळात प्रश्न आहे. अशा कंपन्यांवर बनावट बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करतानाच त्यांच्यावर का कारवाई होत नाही? त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने अशा एक दोन नव्हे, तर अनेक कंपन्या या बाजारात बनावट बाटलीबंद पाण्याची विक्री करून नागरिकांची दिशाभूल करत असतात.
केवळ बनावट कंपन्यांच्या माध्यमातूनच नागरिकांची दिशाभूल होते असे नाही. अनेकदा तर रेल्वे किंवा बस प्रवासादरम्यान चक्क वापरलेल्या बाटल्यांमध्येच पुन्हा साधे पाणी भरून झाकणाच्या ठिकाणी फक्त चिकटपट्टी लावून सुरक्षित बाटलीबंद पाण्याच्या नावाने ते खपवले जाते. म्हणूनच असे गैरप्रकार रोखण्यासाठीही कठोरात कठोर कारवाईची गरज आहे. अन्यथा बाटलीबंद पाण्याला आरोग्यदायी आणि सुरक्षित बनविण्यासाठी निर्बंध घालून उपाययोजना केल्यातरी बनावट उत्पादकांमुळे नागरिकांची होणारी फसवणूक टळणार नाही.
बाटलीबंद पाण्याद्वारे मानवी शरीरात अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण तसेच अन्य काही घातक रसायने जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचा धोकादायक आणि अतिजोखमीच्या श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय एफएसएसएआयने घेतला, परंतु बाटलीबंद शीतपेयांसह इतर पेयांबाबतचे काय? त्यावर कोणतेही निर्बंध का नाहीत? प्लास्टिकच्या बाटल्यांच्या वापरातून पाणी पिताना जर अतिसूक्ष्म कण आणि काही घातक रसायने जर मानवी शरीरात प्रवेश करत असतील तर ती शीतपेये किंवा अन्य प्रकारच्या पेयांमधून जाणार नाहीत का, याचाही विचार होणे महत्वाचे आहे.
आपल्याकडे केवळ पाणीच नाही, तर शीतपेये, दूध, दही, तूप, तेल आदींपासून अनेक पदार्थ हे प्लास्टिकच्या पिशव्या, डब्यांतून अथवा बाटल्यांमधूनच विक्रीसाठी उपलब्ध असतात. या पदार्थांच्या सुरक्षिततेचे काय? प्लास्टिकच्या वापरामुळे हे सर्व पदार्थ खरेच आपल्यासाठी आता खरेच आरोग्यदायी आहेत की नाही, याची उत्तरे कोण देणार? पूर्वी प्लास्टिकचा पर्याय उपलब्ध नसताना दूध काचेच्या बाटल्यांमधून उपलब्ध व्हायचे.
शीतपेयेसुद्धा काच अथवा स्टीलच्या बाटल्यांमध्येच विकली जायची, परंतु प्लास्टिकचा पर्याय उपलब्ध झाल्यापासून दूध पिशव्यांमधूनच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागले. काचेच्या शीतपेयांच्या बाटल्या घटत जात असून शीतपेयांसाठीही आता अधिकाधिक प्लास्टिकच्याच बाटल्या सर्रासपणे वापरल्या जात आहेत.
केवळ शीतपेयेच नाही, तर विविध प्रकारच्या मिल्कशेकपासून कोल्ड कॉफी, लस्सी, ताक, गोड दूध, विविध फळांच्या रसांपर्यंतची पेये ही प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोणत्याही फळांचा रस हा काढल्यानंतर अधिक काळ ठेवणे, हे आरोग्याच्यादृष्टीने धोकादायक मानले जायचे, परंतु विविध फळांच्या रसांवर अशी काही रासायनिक प्रक्रिया करण्यात येते की, काही वेळात धोकादायक ठरणारा फळांचा रस जवळपास ६ महिने किंवा वर्षभर प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ठेवला तरी विक्रीसाठी तो घराब होत नाही. तो खरेच आरोग्यदायी आहे का, याचा काही एक विचार न करता नागरिकांकडून त्याची सर्रासपणे खरेदीही केली जाते.
अगदी नारळ पाणीही सध्याच्या घडीला प्लास्टिक बाटल्यांमधून विक्रीसाठी उपलब्ध आहे. एकदा का नारळ फोडला, तर नारळाचे पाणी फार काळ ताजे राहत नाही, असाच अनुभव आतापर्यंत आपल्या सर्वांच्या गाठिशी आहे, परंतु असे असले तरी गेल्या काही काळापासून नारळाचे पाणीही प्लास्टिकच्या बंद बाटल्यांद्वारे विकले जाते.
इतके दिवस बंद असले तरी ते प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ताजे कसे राहते, यामध्ये अशा कोणत्या प्रकारची रासायनिक प्रक्रिया करण्यात येते, जेणेकरून हे पाणी दीर्घकाळ ताजे असल्याचा दावा करण्यात येतो, रासायनिक प्रक्रियेनंतर हे पाणी खरेच आरोग्यदायी आहे का, प्लास्टिक बाटल्यांच्या वापरामुळे ते कितपत सुरक्षित, अशा बाटल्यांच्या वापरातून मानवी शरीरात प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण जाणार नाहीत, याची हमी कोण देणार, असे नानाविध प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
बाटलीबंद पाणी असो वा शीतयपेये किंवा अन्य काही त्याच्या सुरक्षेची हमी ग्राहकांना मिळालीच पाहिजे. याबदल्यात ते पुरेसे पैसेही मोजतात. त्यामुळे आरोग्यदायीतेची आणि सुरक्षिततेची हमी ग्राहकांना मिळालीच पाहिजे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर उद्योगासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडून (बीआयएस) दिले जाणारे प्रमाणपत्र मिळवण्याची अनिवार्य अट रद्द केली होती. त्यानंतर एफएसएसएआयने नवा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाअंतर्गत सर्व बाटलीबंद पाणी व मिनरल वॉटर उत्पादकांना एफएसएसएआयच्या वार्षिक तपासण्यांना (ऑडिट) सामोरे जावे लागणार आहे. कोणत्याही कंपनीला परवाना मिळवण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी ही तपासणी करून घ्यावी लागेल. त्याचबरोबर थर्ड पार्टी अन्न सुरक्षा संस्थांकडून वार्षिक ऑडिट करून घ्यावे लागेल.
प्रशासनाचे हे प्रयत्न उत्तमच आहेत, परंतु कालांतराने ती सरकारी बाबूंच्या खाबुगिरीची सोय बनू नये म्हणजे मिळवले. अन्यथा आपल्याकडे शासकीय निर्बंध लागताच ज्या पद्धतीने वसुली सुरू होते, ते पाहता नियम म्हणजे पैसे काढण्याचे साधन असे जणू काही समीकरणच बनून गेले आहे. त्यामुळे पाण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीत तरी हे होऊ नये, ही अपेक्षा आहे.