HomeसंपादकीयओपेडGold Investment : सोन्याच्या साठवणूक-गुंतवणुकीचा ‘सुवर्ण’मध्य!

Gold Investment : सोन्याच्या साठवणूक-गुंतवणुकीचा ‘सुवर्ण’मध्य!

Subscribe

सोन्याच्या वापराची हौस करणार्‍या स्त्रियांनी सोन्यात गुंतवणूक करताना डोळसपणे करायला हवी. अर्थात, हे सरसकट विधान नाही. अनेकजणी फार सजगपणे हे करतात आणि गुंतवणुकीचा अभ्यास करणार्‍या महिलादेखील याबाबत योग्य मार्गदर्शन करत असतात. सोन्याची पूर्वापार चालत आलेली आवड सांभाळताना सरकारच्या सोनेवापरावरील मर्यादांचा डोळस अभ्यास, सोन्यातील गुंतवणुकीतला लाभ तसेच स्त्रीधनाचा योग्य विचार, वापर हा निश्चितच साठवणूक आणि गुंतवणूक याचा ‘सुवर्ण’मध्य ठरेल.

भारतीयांना शेकडो वर्षांपासून सोन्याचे आकर्षण आहे. त्यामुळेच सोने हा भारतीयांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. घरात सोन्याचा दागिना नाही, असे मध्यमवर्गीय कुटुंब मिळणे हे तसे अवघडच आहे. सोने हे केवळ श्रीमंतीचे प्रतीक नाही, तर भारतीय परंपरा, सांस्कृतिक मूल्यांमध्ये त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सोन्याबद्दलची ही भारतीय आस्था येथील महिलांना त्याच्या साठवणुकीसाठी प्रवृत्त करते. याच कारणामुळे आज जगातील कोणत्याही देशापेक्षा जास्त सोने साठा भारतीय महिलांकडे आहे. याचीच एक आकडेवारी नुकतीच जाहीर झाली. त्यानुसार सोन्याच्या मालकीत भारत जगात आघाडीवर आहे.

स्त्री मग ती कोणतीही असो…तिचं दागिन्यांबद्दलचं प्रेम हे बाय डिफॉल्ट असतं. अगदी आम्हाला काहीच आवड नाही असं म्हणणार्‍या महिलांकडेदेखील एखादी साधी चेन किंवा ब्रेसलेट हमखास असतेच. यामुळेच सोनं, सोन्याचे दागिने हा महिलांसाठी अत्यंत प्रेम, जिव्हाळ्याचा विषय असतो. लग्न, सणांच्या वेळी सोने हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मग ते वधूचे दागिने असोत किंवा सोन्याची नाणी असोत.

इमिटेशन ज्वेलरी म्हणून कितीही महागातले दागिने आपण घेतले तरी त्याला सोन्याची सर कधीच येणार नाही. सोन्याचे दागिने किंवा सोन्याच्या भेटीशिवाय भारतातील लग्ने पूर्ण होतच नाहीत. याच कारणामुळे आज जगातील कोणत्याही देशापेक्षा जास्त सोने साठा भारतीय महिलांकडे आहे. सोन्याच्या मालकीत भारत जागतिक आघाडीवर आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल अर्थात जागतिक सोने परिषदेने अलीकडेच आपला अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार, भारतीय महिलांकडे कमीत कमी 24 हजार टन सोने आहे असा अंदाज आहे.

भारताकडे दागिन्यांच्या स्वरूपात असलेले हे सोने जगाच्या 11 टक्के असल्याचे डब्ल्यूजीसीने म्हटले आहे. भारतीय महिलांकडे असलेल्या या सोन्याबाबत कौन्सिलनेही आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, भारतीय महिलांकडे असलेले एकूण सोने हे सध्या पाच देशांमधील सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. ऑक्सफर्ड गोल्ड ग्रुपनुसार, भारतातील घरांमध्ये असलेले सोने हे जगाच्या 11 टक्के आहे. अमेरिका, आंतरराष्ट्रीय चलन निधी, स्वित्झर्लंड तसेच जर्मनीकडे असलेल्या सोन्यापेक्षा याचे प्रमाण जास्त आहे.

प्राचीन काळातील भारताचा उल्लेख हा नेहमीच ‘सोने की चिडिया’ असा केला जात असे. मोगल राजवटीपासून ते संस्थानांपर्यंतच्या राज्यकर्त्यांचे दागिने अत्यंत मौल्यवान असत. काळानुसार अनेक गोष्टींमध्ये बदल होत जातो. पण, सोने याला अपवाद ठरते. कारण, यानंतरच्या काळात देखील सोन्याचे महत्त्व काही कमी होताना दिसत नाही. प्रतिष्ठित भारतीय अर्थशास्त्रज्ञ आय.जी. पटेल यांच्या निरीक्षणानुसार, गरजेच्या वेळी किंवा संपन्नतेचा विचार केला तर बहुतेक भारतीय हे सोन्यालाच प्राधान्य देतात.

यासाठी समृद्धी, आवड, हौस हा जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे, तेवढाच याला एक सामाजिक दृष्टिकोनदेखील आहे. लग्नात वधूला सोन्याचे दागिने दिल्याशिवाय लग्न होत नाही. अगदी गरीब भारतीय कुटुंबातील मुलीही काही न काही दागिना लेवूनच लग्नाला उभ्या राहतात. पूर्वीच्या काळी महिलांच्या शिक्षणाला सामाजिक मान्यता नव्हती. त्यामुळे मुलींना लग्नात सोने भेट देणे ही त्यांची सामाजिक सुरक्षा होती, असे निरीक्षण मानववंशशास्त्रज्ञ नीलिका मेहरोत्रा नोंदवतात.

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘रिटेल गोल्ड इनसाइट्स : इंडिया ज्वेलरी’ नामक एका अहवालात म्हटल्याप्रमाणे, 60 टक्के भारतीय महिलांकडे आधीपासूनच सोन्याचे दागिने आहेत. 52 टक्के भारतीय गुंतवणूकदारांकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सोने आहे. याहीपेक्षा गंमत म्हणजे, फॅशन आणि लाईफस्टाईलसाठी ट्रेंडी शॉपिंग करणार्‍यांमध्येही सोने लोकप्रिय आहे. त्यामुळे या यादीत सोने दुसर्‍या क्रमांकावर आहे. डिझायनर कपडे आणि सिल्क साडीच यात पहिल्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल (भारत) चे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी.आर. यांच्या मते, भारताची सराफा बाजारपेठ ही येथील उत्कृष्ट कारागिरांमुळे जगभरात पुढे आहे.

थोडक्यात, सोने म्हटले की महिलांसाठी ही नटण्याथटण्याची, मिरवण्याची गोष्टच असते. आज जरी परिस्थिती बदलत असली तरी आर्थिक गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा त्यांचा फारसा कल नाही. स्त्रियांच्या दृष्टीने सोन्याला आर्थिक संदर्भापेक्षाही जास्त सामाजिक आणि भावनिक संदर्भ जास्त आहेत. नटणं हा महिलांचा अधिकार आहेच, पण त्यासाठी सोन्यासारखा उत्तम पर्यायही नाही, हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्त्रियांना सातत्याने सांगितले जात असते. त्यामुळेच सोन्यात महिलांचा जीव गुंतलेला असतो.

सोन्यात गुंतवणूक करण्याचा महिलांचा वाढता कल हा सरळ सोप्या पद्धतीने न होता अधिक गुंतागुंतीने होताना दिसत आहे. काही स्त्रियांसाठी सोन्यातील गुंतवणूक ही कौटुंबिक परंपरा टिकवून ठेवण्याचे माध्यम आणि भावी पिढीसाठी मौल्यवान संपत्ती हस्तांतरित (त्यांच्याकडे सोपवणे) करण्याचे एक साधन आहे, तर इतर महिलांसाठी त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा एक मूलभूत घटक म्हणून पाहिले जात आहे.

हौसेने सोनं वापरणार्‍या महिलांमध्ये सोन्याच्या गुंतवणुकीची साक्षरता मात्र अभावानेच दिसते, असं खेदाने म्हणावं लागतं. म्हणूनच किती सोनं विकत घ्यायचं, त्यातलं किती गुंतवायचं, याचा अभ्यासपूर्ण विचार ना के बराबर असतो. अगदी हौसेने एखादा दागिना करतील, सोन्याच्या भिशीत पैसा गुंतवतील पण हे सगळं दागिने घडवण्याच्या उद्देशानेच केलं जातं. कारण, सोन्याचे दागिने पुढील पिढीला देणे हे कौटुंबिक परंपरा जपण्याचे तसेच भावी पिढ्यांना मौल्यवान संपत्ती देण्याचे साधन आहे.

आता परिस्थिती हळूहळू बदलते आहे. सोन्यातील गुंतवणुकीबाबत महिला हळूहळू अधिक जागरूक होत आहेत. संपत्ती वाढवणे, सेवानिवृत्ती, आर्थिक स्थिरता यासाठी महिला सोन्यामधील गुंतवणुकीला अधिक प्राधान्य देताना दिसतात. कारण, सोन्याबद्दलची त्यांची ओढ कायम आहे. म्हणूनच, आता त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे स्थान कायम आहे.

एका अभ्यासानुसार, देशात दरवर्षी आठशे टनांपेक्षा जास्त सोन्याची उलाढाल होते. हे प्रमाण कमी-अधिक असू शकते. त्यापैकी सुमारे सत्तर टक्के सोने दागिन्यांसाठी वापरले जाते. तर उर्वरित सोने हे नाणी किंवा डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून खरेदी केले जाते. या ग्राहकांत केवळ गुंतवणुकीच्या हेतूने व्यवहार करणारेही असंख्य आहेत. अलीकडे स्त्रियादेखील चांगल्या शिकतात, कमावतात. त्यामुळे स्वत:ला हवे ते स्वत:च घेणे, हे त्यांच्यासाठी सोयीचे झाले आहे. यातूनच आता त्या त्यांची आई किंवा आजी खरेदी करायच्या तेवढं सोनं खरेदी करतात.

आजच्या महिलांची सोन्यातली गुंतवणूक ही बिस्कीटं, नाणी, गोल्ड बॉण्डसोबतच दागिन्यांमध्येदेखील असते. सार्वभौम सुवर्ण रोखे तसेच डिजिटल सोने अशा आधुनिक पर्यायांचा वापरदेखील यासाठी केला जातो आहे, हे विशेष. हे पर्याय अधिक लोकप्रिय होत आहेत. हे पर्याय भौतिक सोन्याच्या तुलनेत सुविधा, खर्चात कपात करतात, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता देतात. आजवरचा इतिहास पाहिला तर असे दिसेल की, सोन्याची किंमत ही कधीच कमी होत नाही, तर वाढतच जाते, आणि ते सोने आर्थिक कठीण काळात माणसाला उपयोगी पडते.

सोन्याच्या वापराची हौस करणार्‍या स्त्रियांनी सोन्यात गुंतवणूक करताना डोळसपणे करायला हवी. अर्थात, हे सरसकट विधान नाही. अनेकजणी फार सजगपणे हे करतात आणि गुंतवणुकीचा अभ्यास करणार्‍या महिलादेखील याबाबत योग्य मार्गदर्शन करत असतात. यामुळे काही प्रमाणात तरी याचा आता अभ्यासपूर्ण विचार होताना दिसतो. सोन्याची आवड तीच असली तरी त्यातल्या व्यवहार्य बाजूंचा विचार अलीकडे होताना दिसतो आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे.

सोन्याचा सोस असणारा, कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेंडी सुवर्णअलंकाराची मागणी असणारा, बदलत्या फॅशनप्रमाणे दागिन्याचे ‘मोल्ड’ बदलणारा हा नवा स्त्रीग्राहकवर्ग आहे. सोन्याची पूर्वापार चालत आलेली ही आवड सांभाळताना सरकारच्या सोनेवापरावरील मर्यादांचा डोळस अभ्यास, सोन्यातील गुंतवणुकीतला लाभ तसेच स्त्रीधनाचा योग्य विचार, वापर हा निश्चितच साठवणूक आणि गुंतवणूक याचा ‘सुवर्ण’मध्य ठरेल.