रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रीपदाचा वाद चांगलाच चिघळला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी गिरीश महाजन आणि रायगडमध्ये अदिती तटकरे यांची १८ जानेवारीला पालकमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली. त्यानंतर त्याच रात्री कॅबिनेटमंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले समर्थक थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरले.
त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, टायर जाळून रस्ता अडवला. यात काही तास रस्ता बंद होता, वाहनांच्या काही किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. भरत गोगावले यांना पालकमंत्री केले नाही यात प्रवाशांची काही चूक होती का, मग त्यांना नाहक त्रास का सहन करावा लागला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये रस्त्यावर झालेला राडा, लोकांना वेठीस धरणे ही बाब लोकप्रतिनिधी म्हणवून घेणार्यांसाठी भूषणावह नव्हती.
‘जनतेच्या सेवेसाठी’ असा जप दिवसातून शेकडो वेळा करणार्या लोकप्रतिनिधींचे हे वागणे अयोग्यच होते. गोगावलेंची नाराजी आणि एकनाथ शिंदे यांचे दरे गावाला जाणे हे नाराजीचे दुसरे लक्षण असल्याने अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली, याचा अर्थ मुख्यमंत्री बॅकफूटवर आले असेही होते. या निमित्ताने महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील रायगडमधील संघर्ष किती टोकाला गेला आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊ नये, अशी थेट आणि जाहीर भूमिका मांडली होती. रायगडमधील सातपैकी तीन आमदार शिवसेनेचे, तीन आमदार भाजपचे असताना राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्री का दिले, असा खडा सवाल भरत गोगावले तसेच त्यांचे आणखी दोन सहकारी आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी केला आहे. पालकमंत्री होणे ही भरत गोगावले यांची पहिल्यापासून इच्छा होती आणि त्यांनी ही इच्छा अनेकदा बोलून दाखवली होती.
मात्र, याआधीही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे जमत नसल्याने अदिती तटकरे महिला व बाल कल्याण मंत्री असूनही उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरीसह रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील रायगडमधील वाद तसा जुना आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यातील वाद जास्त चिघळला. हा वाद शिवसेना विरुद्ध सुनील तटकरे असा आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर यापूर्वी अनेकदा कठोर टीका केली आहे. थोरवे विरुद्ध तटकरे वाद कायम राहिला आहे.
गोगावले विरुद्ध तटकरे यांच्यातही वाद होताच. मात्र, महायुती म्हणून निवडणूक लढवल्याने गोगावले यांनी थेट तटकरेंवर टीका केली नव्हती. मात्र, अदिती तटकरे यांना पालकमंत्री करताच गोगावलेंनी तटकरेंवर जोरदार टीका केली. ज्या तटकरेंना आम्ही खासदार होण्यासाठी मदत केली त्या तटकरेंनी गोगावले यांच्यासह महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांना पाडण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप गोगावले यांनी केल्यामुळे पालकमंत्रीपदाचा वाद किती प्रतिष्ठेचा झाला आहे, हे लक्षात येते.
विशेष म्हणजे या सर्व वादात अजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे टाळले आहे. एवढेच नाही तर अदिती तटकरे यांनीही सामंजस्याची भूमिका घेत वादावर बोलणे टाळले आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असताना अदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद खेचून आणणे हा तटकरे यांच्या मुत्सद्दीपणाचा विजय होता.
विशेष म्हणजे पालकमंत्रीपदाचा निर्णय फडणवीस-शिंदे-पवार यांच्या बैठकीत झाला असल्यामुळे आता नाराजी जाहीर का केली, हा प्रश्न आहे. तरीही नाराजी असेल तर ती महायुतीमध्ये सोडवणे आवश्यक होते. त्यासाठी गोगावले समर्थकांनी रस्त्यावर उतरणे, प्रवाशांची गैरसोय करणे किती योग्य होते, याचा शिवसेनेने विचार करायला हवा. आता पालकमंत्रीपद पुन्हा अदिती तटकरे यांना मिळाले तरी शिवसेनेत नाराजीचा बॉम्ब फुटणार, शिवसेनेकडे पालकमंत्रीपद गेले तर तटकरे नाराज होणार.
त्यामुळे यातून कसा मार्ग काढायचा, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चातुर्याचा कस लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. त्यानंतर मंत्रिमंडळ जाहीर व्हायला १५ डिसेंबर उजाडले. पुढे अधिवेशन संपेपर्यंत सर्व बिनखात्याचे मंत्री होते. २१ डिसेंबरला खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर व्हायला १८ जानेवारीचा दिवस उजाडावा लागला.
यातून महायुतीने कितीही दावे केले तरी त्यांच्यात ऑल इज वेल नसल्याचे स्पष्ट होते. एक मात्र खरं ज्या लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकार सत्तेत आले, ज्या लाडक्या बहिणींचे वारंवार जाहीर कौतुक महायुतीचे नेते करत होते त्यातीलच एक बहीण जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा तिला कडाडून विरोध केला जातो. वास्तविक सध्या एकही महिला पालकमंत्री नाही. यातूनच लाडक्या बहिणांबद्दल सरकारमध्ये किती प्रेम आहे, हे दिसून येते.