अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणार्याला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. हा हल्लेखोर बांगलादेशी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाला सांप्रदायिक असे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणातील इतर ‘राजकीय’ शक्यता प्राथमिक तपासात निकालात निघाल्याने तसा प्रयत्न करणारे राजकारणी तोंडघशी पडले आहेत. या मुद्यावर होणार्या राजकारणापेक्षा इतर देशातील लोकांचे आपल्या देशातील विविध भागात होणारे बेकायदा वास्तव्य ही खूप मोठी चिंतेची बाब आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मुंबई आणि महाराष्ट्राला हा धोका मोठा आहे. बांगलादेशातील एखादा व्यक्ती भारतात सहज दाखल होतो, त्याला आंतरराष्ट्रीय यंत्रणा अडवत नाहीत. त्यानंतर तो महाराष्ट्रासारख्या राज्यात येऊन राहतो, त्याही वेळेस कोणाला याबाबत शंका येत नाही. या ठिकाणी तो नोकरी मिळवतो. पुढे मुंबईतल्या प्रतिष्ठित अशा उच्चभ्रूंच्या वस्तीत बाराव्या मजल्यापर्यंत अगदी सेलिब्रिटी आणि नवाब असलेल्या अभिनेत्याच्या घरातील बेडरूमपर्यंत चाकू घेऊन जाऊन पोहचतो आणि हल्ला करतो. हे सगळंच अनाकलनीय आहे. भारतातील घुसखोरीपासून ते प्रतिष्ठित अभिनेत्याच्या घरापर्यंत पोहचलेल्या या हल्लेखोराने आपल्या देशाच्या सीमा सुरक्षेपासून ते स्थानिक सुरक्षा यंत्रणांतील ढिसाळ कारभार आणि फोलपणा समोर आणला आहे.
आपल्या देशात कोणीही कधीही कुठूनही घुसखोरी करू शकते, या ठिकाणी त्याला आधार किंवा पॅन कार्ड सहज मिळू शकते, ते बनावट जरी असले तरी त्याचा रहिवासी पुराव्यापुरता उपयोग करता येऊ शकतो. आपल्या देशात कुणीही गुन्हे करणार्यासाठी दाखल होऊ शकतो आणि गुन्हे करून परदेशात सहज पळून जाऊ शकतो. त्यामुळे परदेशातल्या गुन्हेगारांसाठी आपला देश एखाद्या उद्ध्वस्त धर्मशाळेसारखा झाला आहे. कोणीही येतो कुठेही राहतो, काहीही करतो, चाकू घेऊन हल्ले करतो, अगदी इथल्या प्रतिष्ठित अभिनेत्यावरही हल्ला करू शकतो, ‘आओ जावो घर तुम्हारा’ असा सगळा मामला आहे. अशा वेळी आपल्या सीमेवरील आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणा, गुप्तहेर यंत्रणा काय करतात, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण बाहेरून येणारे असेच लोक त्यांच्या सूत्रधारांसाठी स्लिपर सेल्स म्हणून काम करत असतात.
भारताची भूमी नेपाळमधील रहिवासी, रोहिंगे, बांगलादेशांसाठी नंदनवन ठरते आहे का? इथं आपण दुसर्याच्या घरात, केबिनमध्येही दाखल होतानाही परवानगीशिवाय उंबरठा ओलांडत नाही. परवानगीशिवाय आत येऊ नये, हे वाक्य दरवाजावर लिहिणे आपल्यासाठी भूषणावह असते, मात्र देश नावाच्या आपल्या घरात कोणीही, कसाही कुठूनही बिनदिक्कत शिरकाव करू शकतो. आपल्या राज्यात दाखल झालेल्या याच देशाचे नागरिक असलेल्या परप्रांतीयांच्या विरोधात आपल्याकडे राजकीय आंदोलने होतात, मात्र थेट परदेशातील बेकायदा घुसखोरी करणार्यांचा प्रश्न आपल्यासाठी दुय्यम असतो. निव्वळ धार्मिक मुद्यावरून राजकारण केले जाते.
घुसखोरी करणार्याने बेकायदा घुसखोरी करण्यातील गांभीर्यापेक्षा त्याचे नाव काय असते? यात इथल्या राजकीय नेत्यांना रस असतो. आपल्या राज्यातल्या दाटीवाटींच्या वस्त्यांमध्ये असे किती बेकायदा घुसखोर राहत असतील? हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय असतो. त्यामुळे न्यायालयात याविषयी चिंता व्यक्त केली जाणे हे इथल्या सगळ्याच सुरक्षा यंत्रणांचे थेट अपयशच मानावे लागेल. कोट्यवधींचा घोटाळा करून, इथल्या नागरिकांना लुबाडून, आर्थिक यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन आपल्या देशातून कोणीही परदेशात पळून जाऊ शकतो. कोणीही गुन्हे करण्यासाठी परदेशातून आपल्या देशात दाखल होऊ शकतो, ही अवस्था भयंकर आहे.
महाराष्ट्रात कोकणपर्यंत परदेशी घुसखोरांनी शिरकाव केला आहे. रत्नागिरीतल्या ग्रामपंचायतीने एका बांगलादेशी घुसखोराला जन्मदाखला दिल्याचे प्रकरण उघड झाले. दुसर्या एका प्रकरणात ५ वर्षांची व्हिसाची मुदत संपल्यानंतरही एक बांगलादेशी महिला चिपळूणमध्ये बिनदिक्कतपणे राहात असल्याचे उघड झाले. या महिलेने आधार, पॅनकार्ड असे नागरिकत्वाचे पुरावे बनवून घेतले होते. बेकायदा वास्तव्य करणारे बांगलादेशी किंवा इतर घुसखोर पडेल ती मजुरीची कामे करतात. भिवंडीतून शनिवारी एका बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेतले. त्याआधी उल्हासनगरातून बेकायदा वास्तव्य करणार्या १० बांगलादेशींंना पकडण्यात आले.
भिवंडी, उल्हासनगर, मुंब्रा तसेच इतर भागातही अनेकदा ठिकठिकाणी बेकायदा वास्तव्य करणार्या बांगलादेशी, रोहिंग्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे तसेच राज्याच्या विविध भागात नेपाळमधून आलेल्या नागरिकांनाही कुठलीही चौकशी न करता सहज काम दिले जाते. इमारत बांधकामे, विटभट्टी, किरकोळ वस्तू उत्पादनांच्या ठिकाणी अतिशय स्वस्तात असे परदेशातले मजूर कामाला लावले जातात. स्वस्तात मनुष्यबळ मिळत असल्याने संबंधित मालकही त्यांची चौकशी न करता त्यांना आश्रय देतात. राज्यात बेकायदा वास्तव्य करणारे नायजेरियन, बांगलादेशी, रोहिंग्यांचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि या देशातील नागरिकांच्या जीविताशी संबंधित आहे. एवढे तरी इथल्या जबाबदार यंत्रणांनी ध्यानात घ्यायला हवे. त्यासाठी इथल्या एका अभिनेत्यावर जीवघेणा हल्ल्या होण्याची वाट पहावी लागते, हा विषय आपल्याकडील यंत्रणांचा ढिसाळपणा उघड करणारा आहे.