सदाशिव आठवले हे मराठी भाषक संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान, भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे. सदाशिव आठवले यांनी अनेक ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे लिहिली आहेत. सदाशिव आठवले यांचा जन्म ३ मार्च १९२३ रोजी रायगड जिल्ह्यातील सातघर या लहान खेडेगावात झाला. त्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून १९४६ साली इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील मुंबई विद्यापीठाची एम. ए. ही पदवी मिळवली. १९६२ ते १९७० या कालावधीत मराठी विश्वकोशात वरिष्ठ संपादक म्हणून काम पाहिले. नंतरच्या काळात ते कुर्डुवाडी येथील महाविद्यालयाचे (१९७०-१९७४) तसेच अहमदनगरच्या सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
आठवले यांची अर्वाचीन युरोप, आधुनिक जग, इतिहासाचे तत्त्वज्ञान, जगद्गुरू इब्राहिम आदिलशहा, उमाजी राजे – मुक्काम डोंगर, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, केमाल पाशा, चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान, बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल, जॉर्ज वॉशिंग्टन अशी काही इतिहासविषयक पुस्तके आहेत. तर असे पुरुष अशा बायका, कसे जगावे कसे मरावे, खरंखोटं, तुझी लीला अगाध आहे, तू नाही, तुझा बाप!, नानाराव आणि मंडळी, नीट बोल राधे, पांढरा बाजार, पिशाच्चसुंदरी, बिझिनेस् इज् बिझिनेस् इत्यादी कथासंग्रह आहेत. याशिवाय अर्धपुतळा, ऐक माणसा तुझी कहाणी, रामायण : एक माणसांची कथा, महाभारत : ऐका भाऊबंदांनो तुमची कहाणी या लघुकादंबर्या आहेत. आठवले ह्यांनी दै. केसरी, चित्रमयजगत, नवभारत, भालचंद्र, युगवाणी, ललित, समाजप्रबोधनपत्रिका, सोबत, इत्यादी मराठी नियतकालिकांतून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. सदाशिव आठवले यांचे ८ डिसेंबर २००१ रोजी निधन झाले.
Sadashiv Athavale : इतिहासकार, लेखक सदाशिव आठवले
written By rohit patil
Mumbai

संबंधित लेख