नागनाथ संतराम इनामदार हे मराठीतील श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२३ रोजी गोमेवाडी (जि. सांगली) येथे झाला. इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी कसून संशोधन, इतिहासाचे सजर्नशील आकलन आणि प्रसंगातील नाट्यमयता व चित्रदर्शी शैली, यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनाला महाराष्ट्रात तोड नाही.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर लिहिलेली ‘बंड’ ही त्यांची पहिली कादंबरी. झेप ही त्यांची प्रथम प्रसिद्ध झालेली, दुसरी ऐतिहासिक कादंबरी १९६३ सालामध्येे प्रकाशित झाली. भूमापनाचे शासकीय खात्यातील त्यांचे कामदेखील त्यांना संशोधनाच्या दृष्टीने पूरक ठरले. ‘भूमीतरंग’ या नियतकालिकाचे ते संपादक होते. कथा लेखनाने त्यांच्या लेखनाची सुरूवात झाली. इनामदारांनी आपले वाङ्मयीन लेखन १९४५ मध्ये ‘अनिल’ साप्ताहिकातून सुरू केले. १९५८ पर्यंत त्यांनी ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘किर्लोस्कर’, ‘साप्ताहिक स्वराज्य’ वगैरे नियतकालिकांतून लेखन केले.
झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री अशा त्यांच्या कादंबर्यांनी तो काळ भारून टाकला होता. ही सारी निर्मिती १९६२ ते १९८६ या दोन तपांत झाली. त्यांची ‘घातचक्र’ ही कादंबरीदेखील प्रकाशित झाली आहे. ‘मंत्रावेगळा’, ‘झुंज’(१९६८) आणि ‘झेप’(१९६४) या तिन्ही कादंबर्यांना राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. ‘झुंज’ला मराठी साहित्य परिषदेचा ‘हरिभाऊ आपटे कादंबरी पुरस्कार’ही मिळाला. १९९७ येथे झालेल्या नगर येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे ते तीन वर्षे उपाध्यक्ष होते. इनामदार यांचे 16 ऑक्टोबर 2002 रोजी पुण्यात निधन झाले.