उद्गम – हिमालयातील सतोपंथ आणि भगीरथ खडक नावाच्या दोन ग्लेशिअरांच्या संगमातून अलकनंदा नदीचा उगम होतो. आपल्या उगमापासून ती माना गावापर्यंत प्रवास करते. सरस्वती, धौलीगंगा, मंदाकिनी आणि पिंडर या तिच्या डाव्या तटावरील सहायक नद्या आहेत तर उजवीकडून हिमालयातील मंदाकिनी अलकनंदेला येऊन मिळते.
पुढे जोशीमठ शहराला पार करीत अलकनंदा हेलंगजवळ मुख्य केंद्रीय थ्रष्टमधून वाहत कर्णप्रयागमध्ये डावीकडून येणार्या पिंडर नदीला आपल्यात सामावून घेते. पुढे रुद्रप्रयागमध्ये उजव्या तटावरून वाहत आलेल्या मंदाकिनी नदीला ती आपल्या कवेत घेते. या आपल्या सार्या सखींना सोबत घेऊन अलकनंदा श्रीनगर गढवालजवळ एका विस्तृत घाटीत प्रवेश करते. पुढे देवप्रयाग येथे अलकनंदा भागीरथी नदीला येऊन मिळते आणि गंगेचे रूप घेऊन पुढील प्रवासास निघते.
धार्मिक महत्त्व- हिंदू धर्मग्रंथांमध्ये अलकनंदा नदीला गंगेसमान महत्त्वाचे स्थान आहे. विष्णूपुरानुसार ब्रम्हाच्या नगरीला घेरणार्या गंगेच्या ज्या चार वाहिन्या आहेत. त्यापैकी अलकनंदा एक आहे. याशिवाय अलकनंदेमध्ये संगम पावणार्या ज्या वरील पाच नद्या आहेत, त्यांच्या संगमांना प्रयाग या नावाने संबोधले जाते. हिंदू धर्मात पाच प्रयागांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
त्यामुळे विष्णूप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग हे पाच संगम होऊन जी गंगा नदी अवतीर्ण झाली आहे, ती हिंदू धर्माचा प्राण आहे. गंगेशिवाय भारतीय संस्कृतीची आपण कल्पना करू शकत नाही. यावरून अलकनंदा व गंगा नदीचे महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकते. अलकनंदा बद्रीनाथ आणि जोशीमठ यांसारख्या तीर्थस्थानांवरून वाहते. त्यामुळे धार्मिकदृष्ठ्या तिचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवप्रयागमध्ये भागीरथी आणि अलकनंदा नद्यांचा संगम अत्यंत पवित्र मानला जातो.
रूप बदलती अलकनंदा – अलकनंदा नदीच्या पाण्याची पातळी वर्षभर बदलत असते. हिवाळ्याच्या दिवसात अत्यंत कमी तापमानामुळे हिमालयातील सारे ग्लेसिअर बर्फाच्छादित असतात. बर्फ वितळण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे हिवाळ्यात अलकनंदेचा जलस्तर खूप कमी कमी होत जातो, उन्हाळ्यात मात्र याउलट परिस्थिती असते. जसजसे वातावरण गरम होते, ग्लेसिअर वितळू लागतात आणि नदीपात्रात पानाचे लोंढे वाढतच जातात.
कित्येक वेळेला पूरसदृश स्थिती निर्माण होते. मागील वर्षी उन्हाळ्यात तापमानामुळे कधी नव्हती एवढी पाण्याची वाढ झाली. मे महिन्यात तापमान ४० ते ४३ डिग्रीपर्यंत पोहोचले. उत्तराखंडच्या हिमालयीन जंगलात या वाढलेल्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात आगी लागण्याचे प्रमाण वाढले होते. सतत लागणार्या या आगीत अनेक जंगले होरपळून नष्ट झाली. पशुपक्षी आणि प्राण्यांचे मोठे नुकसान झाले.
पेटलेल्या जंगलांनी तापमानात अधिकच भर पडली आणि अलकनंदा उफाळून वाहू लागली. टीहरी, पौडी, गढवाल, देहरादून, नैनिताल जिल्ह्यातील अनेक जंगलात आगी भडकल्याने राख आणि कार्बनचे मोठे थर बर्फाच्छादित प्रदेश आणि ग्लेशिअर यांच्यावर जमा झाले. परिणामस्वरूप ग्लेशिअरवरील कवच वितळून मोठ्या प्रमाणात ग्लेसिअर वितळू लागले. वेळेआधीच अलकनंदाचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढला. विविध ठिकाणी चालू असलेली विकासकामे त्यामुळे थांबवावी लागली.
वातावरणीय उष्मा हा हिमनद्यांसाठी फार महत्त्वाचा घटक आहे. अलकनंदा आणि अन्य सर्व हिमालयीन नद्यांची जोपासना करायची असेल तर या दिवसेंदिवस वाढणार्या तापमानाला आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सतत वाढत चाललेला ग्रीन हाऊस इफेक्ट.
वाढत्या हरित गृह प्रभावामुळे वातावरणाचे वाढत चाललेले तापमान या हिमनद्यांच्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या काठावरील पर्वतीय जंगलांच्या, प्राण्यांच्या अस्तित्वासाठी मोठा चिंतेचा विषय होऊन बसला आहे. हिमालयीन नद्या आणि त्यांच्या जलवायूचे होणारे हे नुकसान वेळीच थांबवण्याची निकड निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
बाहेरच्या सार्या नद्या प्रचंड शहरी आणि औद्योगिक प्रदूषणाने ग्रस्त झालेल्या असताना आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असताना केवळ हिमालयातील नद्याच निर्मळ राहिल्या आहेत. आता त्यांच्यावरही तापमानवाढीची ही भीषण आपदा कोसळू लागली आहे. अशा परिस्थितीत वेळीच तापमानवाढीला पायबंद घातला गेला नाही तर सारे हिमनग नष्ट होतील. त्याचबरोबर पर्वतीय जंगले नष्ट होऊन सारी जीवसृष्टी नष्ट होऊ शकते.
अशा परिस्थितीत हरितगृह प्रभाव निर्माण करणारा मानव जाणार तो कुठे? अलकनंदा आणि इतर हिमालयीन नद्यांची दुसरी समस्या आहे ती माती वाहून नेण्याची. अधिकांश हिमालयातील नद्या तीव्र आवेगाने वाहणार्या नद्या आहेत. पाण्याचा प्रवाह वाढला की पर्वतांच्या मातीचा कटाव होऊन मोठ्या प्रमाणावर माती नदीपात्रात वाहून जाते. ठिकठिकाणी या मातीचे मोठमोठे थर निर्माण होतात.
उत्तराखंडमधील पौडी गाढवाल येथील शक्तीपीठ समजल्या जाणार्या प्रसिद्ध धारीदेवी मंदिरावर ओढवलेल्या संकटामुळे गाद भरण्याची ही समस्या किती हानिकारक आहे हे स्पष्ट होऊ शकते. धारीदेवी शक्तीपीठ मंदिर हे अलकनंदेच्या किनार्यावर वसलेले आहे. दिवसेंदिवस नदीची पातळी वाढत चालली असल्यामुळे मंदिर पाण्यात बुडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
२०१३ साली हे मंदिर चक्क पाण्याखाली बुडाले होते. पाण्याची पातळी वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे नदीच्या मुख्य पात्रात भरत जाणारा गाद. नदीच्या वरील भागातून येणार्या गादचे वर्षानुवर्षे थरावर थर जमत गेल्याने नदीचे पात्र उथळ बनले आहे. उथळ पात्रामुळे पाण्याचा प्रवाह वाढला की पाणी सरळ किनार्याकडे धाव घेते. परिणामी मंदिर आणि आसपासच्या भागात पाणी पसरते. पावसाळ्यात ही स्थिती अधिकच बिकट बनते.
एकंदरीत पाहता तापमानामुळे निर्माण झालेल्या समस्यांची मोठी शृंखला मूळ अस्तित्वालाच हादरे देऊ लागली आहे. अशा वेळेस कार्बन उत्सर्जन, हरित गृह प्रभाव आणि पर्यावरणीय प्रदूषण यांचा गांभीर्याने विचार करण्याची निकड निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे ह्या सार्या समस्या मानवनिर्मित समस्या आहेत आणि मानवालाच त्यावर काबू ठेवावा लागेल यासाठी योग्य दिशेने परिणामकारी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मानवनिर्मित प्रदूषण – गेल्या काही दशकांपासून अलकनंदाचा प्रवाह मानवनिर्मित ठोस कचरा, शहरांच्या गटारी आणि औद्योगिक अवशिष्ट मिसळल्याने कमालीचा प्रदूषित झाल्याचे निदर्शनास आले आहे. बद्रीनाथमध्ये जल-मल शोधन सयंत्र योग्य प्रकारे काम करीत नसल्याने गटारींचे पाणी सरळ अलकनंदामध्ये मिसळत आहे. त्याचप्रमाणे बद्रीनाथला होणार्या धार्मिक अनुष्ठानांचा ठोस कचरा, निर्माल्य सरळ नदीत सोडले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत आहे.
सौंदर्यशाली अलकनंदा – हिमालयातील गढवालमधून वाहणारी अलकनंदा सुंदर आणि मनोरम पर्वतीय प्रदेशातून प्रवास करते. अनेक सुंदर नागमोडी घाट, अल्पाईन गवताची हिरवीगार कुरणे, त्यातून वाहणारे अलाकनंदेचे निर्मळ पाणी आणि पर्वतांच्या किनार्यावर वसलेली नयनमनोहर खेडी या सर्वांमुळे अलकनंदा नदीला स्वर्गीय सौंदर्य लाभले आहे. तेथील नितांत सुंदर प्रकृती आणि हिमालयातून येणारे स्वच्छ पाणी प्रकृती प्रेमी पर्यटकांना नेहमीच मोहिनी घालते.
तिच्या वेगवान निर्मळ पाण्यात अनेक साहसिक जलक्रीडा करणारे पर्यटक आपल्याला जागोजागी दिसून येतात. हा सौंदर्यशाली जलौघ समृद्ध वनचरीमधून वाट काढत मार्गात अनेक तीर्थक्षेत्रांना गवसणी घालत शेवटी भागीरथीच्या प्रवाहात मिसळून गंगा बनतो. किती सौंदर्यशाली आणि मनमोहक प्रवास आहे अलकनंदेचा. ती केवळ सौंदर्यशालीच नाही तर आध्यात्मिक स्पंदनांनी, भावपूर्ण ऊर्जेने भारावलेली नदी आहे.
ती गंगेला गंगेच पूर्ण रूप प्रदान करणारी विशुद्ध सरिता आहे. या अलकनंदेच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने हिंदू परंपरा, संस्कृती आणि पावित्र्याला परिभाषित केले आहे. अनेक ऋषीमुनी, साधुसंत, तपस्वी यांची ती मोक्षदायिनी आहे. जोशीमठ, बद्रीनाथ आणि अनेक तीर्थांनी पुनीत झालेल्या या सौंदर्यशाली पुण्यसलीलेच्या वैभवाला आपण जपायलाच हवे.