Homeसंपादकीयअग्रलेखAI Chatbot : स्वदेशी चॅटबॉटपुढील आव्हाने

AI Chatbot : स्वदेशी चॅटबॉटपुढील आव्हाने

Subscribe

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे आधुनिक जगाच्या प्रगतीचे अधिष्ठान बनले आहे. चीन व अमेरिका या तंत्रज्ञान क्षेत्रातील महाशक्तींशी स्पर्धा करण्यासाठी भारताने स्वत:चा एआय चॅटबॉट विकसित करण्याची घोषणा केली आहे. भारतातील लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) पुढील दहा महिन्यांत तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हे मॉडेल संपूर्ण भारतीय भाषांमध्ये कार्यक्षम असून, तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वदेशी आणि जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल ठरणार आहे.

एआय चॅटबॉट म्हणजे तंत्रज्ञान आणि मानवी संवाद यांचा संगम आहे. मानवी संवादाचे अनुकरण करणे आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, माहिती देण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी तयार केलेली ही एक प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता असते. एखाद्या हुशार आणि कल्पक मित्राप्रमाणे, हा चॅटबॉट आपल्यासोबत संवाद साधतो, आपल्या गरजेनुसार अचूक माहिती पुरवतो आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जीवन सुलभ करतो. भारताचा हा स्वदेशी एआय चॅटबॉट देशासाठी तंत्रज्ञानाचा एक नवा अध्याय आहे.

शिवाय तो आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊलदेखील आहे. देशातील भाषा, संस्कृती आणि लोकांच्या गरजांसाठी तंत्रज्ञानाचा वापर हा या प्रकल्पाचा मुख्य गाभा आहे. भारताच्या एआय क्षमतेच्या वाढीसाठी हा चॅटबॉट केवळ यशाचे प्रतीक ठरेल असे नाही, तर जागतिक स्तरावर भारताला स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठीदेखील मदत करेल. भविष्यातील तंत्रज्ञान युगात भारत एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी सज्ज होत असल्याचे हे द्योतक आहे.

भारताने 10 हजार जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स) क्षमतेच्या आधारे या प्रकल्पाची सुरुवात केली असून, ती क्षमता 18,600 जीपीयूपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जीपीयू ही कोणत्याही एआय चॅटबॉटसाठी आधारस्तंभ ठरतात. चीनच्या डीपसीक चॅटबॉटने 2 हजार जीपीयूंचा वापर केला आहे, तर अमेरिकन ओपन एआयच्या चॅट जीपीटीसाठी तब्बल 25 हजार जीपीयू क्षमतेचा आधार घेतला जातो.

त्यामुळे भारतासाठी ही वाढ आवश्यक ठरते. भारताचा या प्रकल्पावर 10 हजार 750 कोटी रुपयांचा मोठा खर्च होणार आहे. अर्थात भारताचा चॅटबॉट चॅट जीपीटी आणि डीपसीक यांच्यापेक्षा वेगळा असेल. त्यात 22 हून अधिक भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्याची क्षमता असेल. रिलायन्स, टाटा कम्युनिकेशन आणि नेक्स्टजेन डेटा सेंटर अशा प्रमुख कंपन्यांनी या प्रकल्पासाठी महत्त्वाची भूमिका घेतली आहे.

चॅटबॉटसाठी वापरला जाणारा डेटा भारतीय सर्व्हरवर संग्रहित केला जाईल. यामुळे डेटा गोपनीयतेच्या बाबतीत मोठा विश्वास निर्माण होईल. एआय तंत्रज्ञानासोबतच जीपीयू क्षमतेसाठी सामायिक संगणकीय सुविधा स्टार्टअप्स, संशोधक आणि विकासकांसाठी उपयुक्त ठरेल. भारतातील सेमीकंडक्टर बाजार 2030 पर्यंत 8.85 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळेल.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासोबत काही आव्हानेही आहेत. जागतिक स्तरावर एआयच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली असताना भारत अद्याप या क्षेत्रात सुरुवातीच्या टप्प्यावर आहे, हे वास्तव आहे. एआय चॅटबॉट तयार करण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर उच्च दर्जाच्या संगणकीय सुविधांची आवश्यकता असते. अशा पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक, वेळ आणि कुशल मनुष्यबळ लागते, जे अद्याप भारताच्या अनेक क्षेत्रांमध्ये अपुरे आहे.

स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करताना जागतिक दर्जाशी स्पर्धा करण्यासाठी सतत अद्ययावत राहणे महत्त्वाचे असते. चीन आणि अमेरिकेने यापूर्वीच या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून त्यांच्या मॉडेल्सनी जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी भारताला खूप मोठी तयारी करावी लागेल. भारताच्या बहुभाषिक संरचनेमुळे संवाद अचूकतेचा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती भावनांचे, संस्कृतीचे आणि समाजाच्या गाभ्याचे प्रतिबिंब आहे. त्यात जर त्रुटी राहिल्या तर वापरकर्त्यांना अडचणी येऊ शकतात.

शिवाय, एआयमध्ये वापरल्या जाणार्‍या डेटाच्या गोपनीयतेचा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. भारतातील डेटा भारतीय सर्व्हरवर संग्रहित करण्याचे आश्वासन दिले गेले आहे, पण ही प्रणाली खरोखर किती सुरक्षित असेल, यावर शंका उपस्थित होऊ शकते. जागतिक स्तरावर डेटा गोपनीयतेच्या बाबतीत भारताची विश्वासार्हता सिद्ध करणे हे मोठे आव्हान आहे.

स्वदेशी पातळीवर विकसित होत असलेले तंत्रज्ञान जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी व्यापक संशोधन, भांडवलाची मोठी गुंतवणूक आणि कौशल्यपूर्ण नेतृत्वाची गरज भासेल. तांत्रिक प्रगतीचे ध्येय ठेऊन काम करताना भारताला स्वत:च्या मर्यादांची जाणीव ठेवावी लागेल. घोषणांची भव्यता जितकी मोठी असते, तितकीच अपेक्षांची पूर्तता आव्हानात्मक असते.

त्यामुळे भारताच्या एआय चॅटबॉट प्रकल्पाकडून असलेल्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात मिळणारे परिणाम यांच्यातील अंतर कमी करणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फक्त कल्पनाविलास पुरेसा ठरत नाही, तर ठोस कृती आणि सातत्यपूर्ण प्रगतीची आवश्यकता असते. भाषिक गोंधळ, तांत्रिक त्रुटी आणि आर्थिक मर्यादा यांच्यावर मात करता आली तरच हा प्रकल्प यशस्वी होईल.