Homeसंपादकीयदिन विशेषHasmukh Sankalia : भारतीय पुरातत्त्ववेत्ते हसमुख सांकलिया

Hasmukh Sankalia : भारतीय पुरातत्त्ववेत्ते हसमुख सांकलिया

Subscribe

हसमुख धीरजलाल सांकलिया हे भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे एक पुरातत्त्ववेत्ते होते. त्यांचा जन्म १० डिसेंबर १९०८रोजी मुंबई येथे एका गुजराती कुटुंबात झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी प्रथमश्रेणीत बी.ए. (१९३०) आणि एम. ए. (१९३२) या पदव्या संपादन केल्या. पुढे ते एलएलबी झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी लंडन विद्यापीठामधून ‘गुजरातेतील पुरातत्त्व’ या विषयावर डॉक्टरेट पदवी मिळवली (१९३७).

ते संस्कृतचे अभ्यासक होते. संस्कृतची त्यांची ही पार्श्वभूमी त्यांना प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व यांच्या सखोल अभ्यासात उपयोगी पडली. प्रागैतिहास, पुराभिलेख, पुरातत्त्वविद्या, शिल्प, मूर्तिशास्त्र, नाणकशास्त्र, धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र, संस्कृत वाङ्मय- विशेषत: रामायण, महाभारत आणि पुराणे-तसेच ज्योतिष आणि अध्यात्म इ. विविध विषयांत त्यांना रस होता आणि त्यावर त्यांनी लेखन केले.

सांकलिया यांनी भारतात ठिकठिकाणी उत्खनने घडवून आणली. पेहेलगाम, नाशिक, अहमदाबादजवळ लांघणज, जोर्वे, नेवासे, पुण्याजवळील इनामगाव, कोल्हापूरजवळ ब्रह्मपूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनने केली. त्यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांनी अनेक संस्कृती प्रकाशात आणल्या. सांकलियांचे लेखन विपुल आहे.

यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती आदी भाषांतील ३५ ग्रंथ, विविध सर्वेक्षण व उत्खननवृत्तांत, संशोधनपर नियतकालिकांमधील शोधनिबंध, वृत्तपत्रीय लेख यांचा समावेश होतो. ‘बॉर्न फॉर आर्किऑलॉजी : अ‍ॅन ऑटोबायोग्राफी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पुरातत्त्वशास्त्रातल्या मौलिक योगदानाबद्दल सांकलियांना भारत सरकारने इ.स. १९७४ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. हसमुख सांकलिया यांचे २८ जानेवारी १९८९रोजी पुणे येथे निधन झाले.