Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयअग्रलेखIndian Immigrants in US : किमान माणुसकी बाळगा!

Indian Immigrants in US : किमान माणुसकी बाळगा!

Subscribe

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेने त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून राहात असलेल्या काही भारतीय नागरिकांची हकालपट्टी केली. अमेरिकन लष्कराचे ग्लोबमास्टर सी-17 नावाचे एक महाकाय विमान 104 भारतीयांच्या पहिल्या तुकडीला घेऊन पंजाबच्या अमृतसर विमानतळावर उतरले. हस्तांतरण प्रक्रियेतील गुपिते बाहेर पडू नयेत या उद्देशाने प्रशासनाने जाणीवपूर्वक या सर्व प्रक्रियेपासून प्रसार माध्यमांना दूर ठेवले होते.

मात्र, कोंबडे झाकले म्हणून उगवायचे राहात नाही, अगदी त्याचप्रमाणे हे विमान भारताच्या भूमीत लँड होण्याआधीच या विमानातील छायाचित्रे एक एक करत बाहेर पडायला लागली होती. या छायाचित्रात विमानाच्या सीटवर बसलेल्या भारतीयांना चक्क साखळदंडांनी बांधल्याचे दिसून आले. अनेकांच्या हातात आणि पायातही लोखंडी साखळ्या बांधलेल्या होत्या. सॅन अँटोनियो शहरातून भारताच्या दिशेने झेपावण्याआधी साखळदंड बांधूनच या भारतीयांना विमानात कोंबण्यात आले होते.

जागेवरून एक इंचही हालण्याची परवानगी त्यांना नव्हती. ना खाण्याची व्यवस्था, ना प्यायला पाणी… शिवाय विमानात शौचालयही एकच.. मोठ्या मुश्किलीने परवानगी मिळाली, तर साखळदंड ओढतच शौचालयात जायचे, अशा रितीने सुमारे ४० तासांच्या प्रवासात अक्षरश: नरकयातना भोगतच हे सर्व भारतीय मायदेशात उतरले, तेव्हा सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला असेल, या प्रवाशांमध्ये पुरुषांसोबत महिला आणि अल्पवयीन मुलेही होती.

महिला आणि मुलांना यातून वगळल्याचे म्हटले जात असले, तरी साखळदंडात बांधलेल्या या भारतीयांना पाहून संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांना तर ब्रिटिश राजवटीचा काळही आठवला. कारण त्याकाळात भारतीयांना अशी वागणूक दिली जात असे.

खरे तर अमेरिकेतून भारतात पाठवण्यात येणार्‍या भारतीयांची यादी खूपच मोठी आहे. एका आकडेवारीनुसार अमेरिकेत ७.२५ लाख भारतीय बेकायदेशीरपणे राहतात. मेक्सिको आणि साल्वाडोर या देशानंतर अमेरिकेतील भारतीय घुसखोरांची संख्या सर्वाधिक म्हणजे तिसर्‍या क्रमांकाची आहे. घुसखोरांमुळे स्थानिकांच्या नोकर्‍या, सोईसुविधा हिरावल्या जात असून अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसत असल्याने सर्व घुसखोरांची देशातून हाकालपट्टी करायचीच या मताशी ट्रम्प प्रशासन आले आहे.

म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच घुसखोरांच्या हकालपट्टीची मोहीम तीव्र केली. परप्रांतीयांमुळे स्थानिकांच्या संधी हिरावल्या जात असल्याच्या कारणावरून आपल्याच भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक पक्ष संघटना उभ्या राहिल्याचा इतिहास आहे. भाषा, प्रांत, राष्ट्रवाद हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतोच. महाराष्ट्रात दक्षिण भारत, उत्तर भारत, शेजारच्या गुजरात-राजस्थानमधून आलेल्यांविषयी आपल्या मनात हीच तर भावना असते. गुन्हेगारी कृत्यात अडकलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी तर आपल्याला सतावून सोडले आहे. त्यामुळे ट्रम्प यांची भूमिका आपण चूक तरी कशी म्हणावी.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर निमंत्रितांच्या पहिल्या रांगेत बसले होते. ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत सर्वात पहिल्यांदा द्विपक्षीय चर्चा करणारेही एस. जयशंकरच होते. त्यामुळेच बहुधा ट्रम्प प्रशासनाने देखील घुसखोरांच्या हाकालपट्टीसाठी भारताचीच सर्वात प्रथम निवड केली असावी. मेक्सिको, कॅनडाच्या सीमेला सीमा लागून असल्याने वर्षाकाठी हजारो लोक कॅनडा आणि मेक्सिकोच्या सीमेतून लपूनछपून महाकाय अमेरिकेत प्रवेश करतात.

काहीजण या प्रयत्नात यशस्वी होतात, तर काहीजण अलगदरित्या अमेरिकन सैन्याच्या तावडीत सापडतात. कॅनडा, मॅक्सिकोतील अत्यंत खडतर वातावरणातून प्रवास करताना दुर्दैवाने काहीजणांना प्राणालाही मुकावे लागते. तरी अमेरिकेत जाण्याची ओढ काही कमी होत नाही. कोलंबिया, ग्वाटेमाला, मेक्सिको असा प्रवास करून अमेरिकन सैन्याच्या तावडीत सापडलेले अनेकजण या १०४ जणांमध्ये आहेत. लाखो रुपयांचे कर्ज काढून, घरदार विकून एजंटला पैसे देऊन अमेरिकेत घुसणार्‍या भारतीयांच्या सुरस कथाही आता समोर येऊ लागल्या आहेत.

त्यातील बहुतांश नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचेच आहेत. एवढे विकसित राज्य सोडून अमेरिकेत घुसखोरी करण्याची त्यांना इतकी काय गरज पडली, हे त्यांना विचारायला हवे. भारतीयांना साखळदंडात बांधण्यावरून संसदेत गुरुवारी जोरदार राडा झाला. अखेर नाईलाजाने का होईना, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना उत्तर द्यावेच लागले. नियमानुसार विमानातून माघारी पाठवत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना बांधून ठेवल्याची कबुली जयशंकर यांनी दिली.

भारतात पाठवण्यात येणार्‍या नागरिकांसोबत दुर्व्यवहार होऊ नये यासाठी अमेरिकन सरकारसोबत चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितलेे. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचे अमेरिका नेहमीच सांगत असते. पण ट्रम्प प्रशासन आल्यापासून चित्र पालटले आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला अमेरिकेत जाणार आहेत.

याआधी स्थलांतरितांना परत घेण्यास सहकार्य करत नसलेल्या देशांच्या यादीत भारत होता. पण आता भारत अमेरिकेला पूर्ण सहकार्य करत आहे. त्यामुळे भारतीयांची पाठवणी करताना त्यांना कैद्यांप्रमाणे वागणूक न देता, साखळदंडात न बांधता किमान मानवता बाळगावी, अशी विनंती पंतप्रधान मोदींनी आगामी अमेरिका दौर्‍यात ट्रम्प यांना करायला काहीच हरकत नाही.