Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeसंपादकीयओपेडInternational Women's Day : महिला दिनाचा केवळ कॉर्पोरेट इव्हेंट नको...

International Women’s Day : महिला दिनाचा केवळ कॉर्पोरेट इव्हेंट नको…

Subscribe

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो. महिलांना स्वत:च्या हक्कांची जाणीव करून देण्याबरोबरच महिला सक्षमीकरणावर भर देणे आणि स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक खोलवर रुजवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पण, गंमतीची गोष्ट म्हणजे ज्या कारणासाठी महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली, जवळपास त्याच कारणांसाठी आपण आजही हा दिन साजरा करतो आहोत. या दिवसाला केवळ कॉर्पोरेट लूक न देता त्या मागची भावना प्रत्यक्षात उतरायला हवी.

स्त्री म्हणजे घर, समाज आणि परिवाराच्या आयुष्याचा केंद्रबिंदू. मात्र, याच स्त्रियांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, शिवाय आपलेच हक्क मिळावेत यासाठी 1911 पासून महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. महिलांना असे हक्क द्यायला हवेत, तसेच महिलांचा महिलांसाठी असा विशेष दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यासाठी देखील त्यांना खूप संघर्ष करावा लागला आहे. मुळातच याची सुरुवात आपल्या हक्कांसाठी झाली. 1908 मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात नोकरी करणार्‍या जवळपास 15 हजार महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

कामाच्या वेळा कमी करण्याबरोबरच आपण करत असलेल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी महिलांनी हा लढा दिला. क्लेरा झेटकीन या सामाजिक कार्यकर्तीने हा लढा सुरू केला. 1910 मध्ये कोपनहेगनमध्ये नोकरदार महिलांच्या प्रश्नावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेत क्लेराने हा मुद्दा मांडला आणि तिथे उपस्थित 17 देशातील 100 महिलांनी त्याला पाठिंबा दिला. कारण या सगळ्या महिलांचे प्रश्न सारखेच होते. जगभरात महिलांना सारख्याच समस्यांचा सामना करावा लागत होता. यामुळेच 8 मार्च या महिला दिनाला जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पूर्वीच्या काळात महिलांना मोकळेपणाने बोलून स्वत:चे मत मांडायची मुभा किंवा कोणत्याही गोष्टीत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. कायम कोणाच्या ना कोणाच्या दडपणाखाली वावरणे, कोणाच्या तरी विशेषत: आधी वडील, मग नवरा आणि नंतर मुलगा यांच्या आधाराने जगणे हे आणि असेच त्यांचे जगणे होते. यात त्यांनादेखील काही चूक वाटत नव्हते आणि समाजालादेखील.

कारण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून महिलांचा विचार कधीच केला गेला नव्हता आणि कोणी केलाच तर त्याच्या अशा मानसिकतेला हिणवण्याचेच काम केले गेले. त्यामुळेच पूर्वीच्या काळी सण-सणवार हेच महिलांसाठी विचारांच्या देवाणघेवाणीचे साधन होते. त्यावेळी स्वत:ची मते मोकळेपणाने एकमेकांसमोर मांडली जायची. आपापल्या भावना व्यक्त करायची संधी मिळायची. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायची आणि यामुळे मन मोकळे होऊन, नवीन दिशा मिळायची. तसेच येणार्‍या नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती मिळायची.

महिला दिनासाठीच्या या लढ्यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे, महिला संघटित होऊ शकतात, अन्यायाविरोधात आवाज उठवू शकतात, हक्कांसाठी लढू शकतात हे जगाला कळलं. त्यानंतर काही प्रमाणात का असेना, पण महिलांसाठी वेगळे स्थान निर्माण झाले. काही वैचारिक देवाणघेवाण सुरू झाली. खरे तर 8 मार्च हा महिला दिन दरवर्षी येतो आणि जातो. या दिवशी आपण खूपच औपचारिक वागतो. महिलांना तर त्यादिवशी कुठे ठेवू नी कुठे नको असे आपल्याला होऊन जाते.

शुभेच्छांचा पाऊस पाडतो, तिचा प्रत्येक शब्द झेलतो. अलीकडे ऑफिसमध्ये देखील हा दिवस साजरा होतो. शॉपिंग मॉल, दुकाने, रेस्टॉरंट अशा सगळ्याच ठिकाणी महिलांना सूट दिली जाते. परंतु, एक दिवस महिलांना अगदी रॉयल ट्रीटमेंट देणारे वर्षभर तिच्याशी याच पद्धतीने वागतात का, हा खरा चिंतनाचा विषय आहे. आपली प्रत्येक कृती खरेच तिच्या आदराची असते का? यावरही चिंतन करण्याची गरज आहे. एक स्त्री म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून आपण तिला सन्मान देतो का, हा प्रश्न आपल्या अंतर्मनाला विचारला पाहिजे.

महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांना आत्मभान आले. त्यांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. काळानुसार, महिला आपल्या आनंदाला प्राधान्य देऊ लागल्या. कुटुंबाचेही त्यात बर्‍यापैकी योगदान असते. ऐकायला आणि वाचायला हे सगळे अगदी छान वाटले तरी आपल्याकडे सर्रास असे होताना दिसत नाही. कारण महिलांशी संबंधित विषय हे अनेकदा आमच्यासाठी दुर्लक्षित असतात. या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. महिला दिन ही केवळ एका दिवसाची औपचारिकता होता कामा नये. महिलांविषयी, मग त्या घरातल्या असोत वा बाहेरच्या, आदर आणि त्यांना आपल्यासोबत सामावून घेण्याची मानसिकता पुरुषांनी दाखवायला हवी.

याचा अर्थ असा नाही की, सगळ्याच पुरुषांची मानसिकता अशी आहे किंवा महिलांना कायमच असे वागवले जाते. तिला पुढे जाऊ दिले जात नाही, पण एकंदरच महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा दुय्यम असाच असतो. किंबहुना, काळानुरूप त्यात बर्‍यापैकी स्वागतार्ह बदल झालेला दिसतो. तरीही आपल्याला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण, महिला पुढे गेलेल्या किंवा बॉस असलेल्या आजही आपल्याला फार खपत नाही. मग ती कितीही कर्तबगार असली तरीही. यामुळे अनेकदा सोयीचा मार्ग स्वीकारला जातो, तो म्हणजे तिच्यावर शिंतोडे उडवण्याचा. कारण, स्त्रीचे स्वांतत्र्य आपल्या समाजाला रुचत नाही आणि पचतही नाही.

चूल आणि मूल या संकल्पनेपलीकडे गेलेल्या, स्वत:ची मते मांडणार्‍या महिलांचे अस्तित्व स्वीकारणे समाजाला जड जाते. त्यातूनच तिच्या स्त्रीत्वावर घाला घालण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. दुर्दैव आहे, पण एखाद्या स्त्रीची बदनामी करण्यासाठी अनेकदा महिलाच आघाडीवर असलेल्या दिसतात. ‘गॉसिप’ या गोंडस नावाखाली आपण या गोष्टी खपवत असलो तरी मूळ उद्देश एखादीबद्दल चर्चा करणे, हाच असतो. आणि या सगळ्यात आपण महिला असूनही कळत-नकळत एखाद्या महिलेच्याच क्षमतांबद्दल शंका घेत असल्याचे भानही आपल्याला नसते.

जो प्रकार बाहेरच्या जगात तोच बव्हंशी घरातही दिसतो. एक महिला म्हणून दुसर्‍या महिलेला सांभाळून घेणे, तिची परिस्थिती समजून घेणे अपेक्षित असते, पण प्रत्यक्षात तसे घडते का, तर सामान्यपणे याचे उत्तर नाही असेच असेल. मुळात आजकाल कोणी एकत्र राहात नाही. पण जिथे एकत्र कुटुंब असते तिथे तरी घरातील स्त्रीला सांभाळून घेण्याची वृत्ती दिसते का, हा खरा प्रश्न आहे. नाहीतर मी हे सगळं सहन केलं ना मग माझ्या सुनेने देखील हे केलंच पाहिजे, अशी अनेकदा मानसिकता दिसते.

यात बदल होण्याची गरज निश्चितच आहे. घरातील पुरुषांनीही महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. काळ बदलतोय, मानसिकतेतही बदल होत आहेत. तसेच विचारही बदलायला हवेत. नाहीतर दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्ताने आपण महिलांना फक्त त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतो. आज जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. पण तरीही जर महिलांना घराच्या आणि बाहेरच्या आघाडीवरही जर लढावे लागत असेल, तर ही काही फार गौरवाची बाब नाही.

आज स्त्री पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात उभी आहे. पण तरीही स्त्री म्हणून तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. पुरुषांप्रमाणेच ती ही काळवेळ न पाहता, ऊन-पाऊस न पाहता काम करते, तरी तिला सन्मानाची वागणूक अपवादाने मिळते. ज्या कारणांमुळे म्हणून महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली, तो तिचा लढा आजही संपूर्णपणे संपलेला दिसत नाही. काळानुसार, या परिस्थितीत बदल निश्चित झाला असला तरी ती फार सुधारलेलीदेखील दिसत नाही. आजही समाजात महिलांचं आर्थिक शोषण, लैंगिक शोषण, हुंडाबळी, हत्या हे प्रकार सुरूच आहेत. ते केव्हा थांबणार याची उत्तरे अनुत्तरित आहेत.

अनेकदा आपण गंमती गंमतीत किंवा स्त्री दाक्षिण्य म्हणूनही लेडीज फर्स्ट असे म्हणतो, पण असे म्हणताना, खरेच तिच्यासाठी आदराची भावना आहे, की ती अबला आहे, आपल्यावर अवलंबून आहे, हा भाव जपणे आहे, याचाही विचार या निमित्ताने होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा दिवस साजरा करताना केवळ योजना, डिस्काऊंट असा त्याला कॉर्पोरेट लूक न देता त्या पलीकडे जाऊन त्याचा मूळ हेतू, त्यामागची भावना प्रत्यक्षात कशी उतरेल, याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तर आणि तरच हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू, त्यासाठी देण्यात आलेला लढा सार्थकी लागला असे म्हणता येईल.