भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने गुरुवारी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पृथ्वीपासून तब्बल ४७५ किलोमीटर उंचीवर अंतराळात दोन भारतीय उपग्रह एकमेकांना जोडण्यात (डॉक) इस्रोला यश मिळाले.
दोन उपग्रहांचे अंतराळात यशस्वीरित्या डॉकिंग करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतर चौथा देश बनला आहे. इस्रोची ही कामगिरी अभूतपूर्व असून या कामगिरीची इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद होणार आहे. केवळ भारतच नाही, तर जगभरातील अंतराळ संशोधन क्षेत्रातून इस्रोच्या या अद्वितीय कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
अंतराळात भारताचे स्पेस स्टेशन स्थापन करणे आणि चांद्रयान-४ यासारख्या मानवी अंतराळ मोहिमांसाठी डॉकिंग तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणे ही पहिली पायरी म्हणता येईल. ही पायरी इस्रोने अनेक खडतर आव्हानांवर मात करत गाठली आहे. इस्रोने गेल्या वर्षी स्पेस डॉकिंग प्रयोगाला सुरूवात केली होती.
या मोहिमेला स्पेडेक्स असे नाव देण्यात आले होते. या मोहिमेंतर्गत ३० डिसेंबर २०२४ रोजी इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी ६० रॉकेटचा वापर करून २२० किलो वजनाचे चेसर आणि लक्ष्य असे दोन उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले होते.
२ जानेवारीला इस्रोने डॉकिंग चाचणीदरम्यान, दोन्ही उपग्रहांना ३ मीटरपेक्षाही कमी अंतरावर आणले होते. मधल्या काही दिवसांमध्ये दोन्ही उपग्रहातील अंतर कमी-जास्त ठेवण्यात इस्रोला अपयश येत होते, त्यामुळे सातत्याने डॉकिंगची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती. अखेर गुरुवारी सकाळी दोन्ही उपग्रहांना एकमेकांशी जोडण्यात अर्थात डॉकिंग करण्यात इस्रोला यश आले.
इस्रोच्या या मोहिमेचा उद्देश अंतराळात डॉकिंग-अनडॉकिंग तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक करणे हा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, एका विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे दोन्ही उपग्रह अंतराळात एकमेकांशी जोडणे याला डॉकिंग तर दोन्ही उपग्रह अंतराळात विलग करणे याला अनडॉकिंग म्हणतात. पृथ्वीवरील कमांड सेंटरमध्ये बसून अंतराळात कित्येक किमी उंचीवर स्थापित उपग्रहांची एकमेकांशी टक्कर होऊ न देता उपग्रहाचे वेगवेगळे भाग एकमेकांच्या दिशेने आणणे आणि त्यांना अलगदरित्या जोडणे ही प्रक्रिया अत्यंत जटील आणि किचकट असते.
हे तंत्रज्ञान सर्वात पहिल्यांदा विकसित करून अमेरिकेने १९६६ रोजी स्पेस डॉकिंग केले होते. त्यानंतर वर्षभरातच १९६७ साली सोव्हियत रशियाने स्पेस डॉकिंग करून दाखवले होते. पुढच्या काळात अंतराळात स्पेस स्टेशन बनवून या दोन्ही देशांनी अंतराळात अनेकदा मानवी मोहिमा केल्या. पुढे अंतराळवीरांचा सहभाग असलेल्या चांद्रमोहिमांनी मानवजातीचे चंद्राबाबतचे कुतूहल शमवण्यात मोठी भूमिका बजावली.
२००० सालात नवीन आर्थिक शक्ती म्हणून उदयास आलेल्या चीननेही २०११ मध्ये स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान मिळवले. यापैकी एकाही देशाने हे तंत्रज्ञान एकमेकांशी शेअर केलेले नव्हते. त्या तुलनेत भारताला हा टप्पा गाठण्यासाठी बरीच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. हे जरी खरे असले, तरी हे तंत्रज्ञान भारताने प्रयोग करत करत स्वत:च विकसित केलेले आहे, हे विशेष.
२०४७ पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे भारताचे लक्ष्य आहे. त्याआधी अंतराळात स्पेस स्टेशन उभारणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. स्पेस स्टेशन उभारण्यात भारत यशस्वी ठरल्यास अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे, यानांची दुरुस्ती करणे, यानांमध्ये इंधन भरणे आदींसाठी भारताला इतर देशांच्या स्पेस स्टेशनवर अवलंबून राहावे लागणार नाही. पृथ्वी आणि चंद्रामधील हे डेस्टिनेशन भविष्यातील भारताच्या अंतराळ मोहिमांना व्यापक रूप देणारे ठरेल.
आजघडीला अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत एक मोठी शक्ती म्हणून नावारूपाला आलेला देश आहे. यामध्ये अर्थातच इस्रोचे बहुमूल्य योगदान आहे. अमेरिका, युरोपियन देशातील शेकडो उपग्रह इस्रोने आतापर्यंत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे. जागतिक उपग्रह प्रक्षेपण बाजारात अत्यंत कमी खर्चात उपग्रह अंतराळ पाठविणारा भारत एक सशक्त आणि तितकाच विश्वासाचा पर्याय निर्माण झालेला आहे. उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक ६ अब्ज डॉलरच्या बाजारपेठेत हळूहळू इस्रोची हिस्सेदारी वाढू लागली आहे.
इस्रो आज भारताचा अभिमान आहे. १९६२ मध्ये स्थापन झालेल्या इस्रोचे नाव पूर्वी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च असे होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई हे या संस्थेचे प्रमुख होते. साराभाईंकडे मोजक्याच शास्त्रज्ञांची टीम होती. शिवाय पैशांचीही कमतरता होती. अत्यंत गरीब आणि एक वेळच्या अन्नासाठीही संघर्ष कराव्या लागणार्या भारतीय जनतेला कशाला हवे रॉकेट सायन्स अशी त्यावेळची सर्वसामान्यांची धारणा होती.
पण साराभाईंनी वर्षभरातच मोठ्या चिकाटीने पहिले रॉकेट प्रक्षेपित करून भविष्यातील अंतराळ मोहिमांचा राजमार्ग दाखवून दिला होता. ५ दशकांनंतर आपण चंद्र, मंगळ आणि त्यापलीकडे सूर्याच्या दिशेने अंतराळयान पाठवत आहोत. तेही युरोप, अमेरिका, रशिया, चीनपेक्षाही अत्यंत कमी खर्चात आणि स्वदेशी तंत्रज्ञान वापरून. हे इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. याचा पुढचा टप्पा असणारे स्पेस स्टेशन भारताचा अंतराळातील अधिकृत पत्ता असेल.