Homeसंपादकीयअग्रलेखBeed and Parbhani case : मारुती कांबळेचं काय झालं?

Beed and Parbhani case : मारुती कांबळेचं काय झालं?

Subscribe

पाच दशकांपूर्वी जब्बार पटेलांच्या ‘सामना’ चित्रपटात मारुती कांबळेचं काय झालं, हा प्रश्न चित्रपटात मास्तर झालेल्या डॉ. लागूंनी निळूभाऊंनी साकारलेल्या हिंदुराव धोंडे पाटील या गावच्या पुढार्‍याला वारंवार विचारला होता. अर्ध्याअधिक चित्रपटात वारंवार हा प्रश्न हिंदुरावांच्या राजकीय सत्तेला आव्हान ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अलीकडेच सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोघांच्या मृत्यूसाठी नेमकं काय कारण झालं, हा प्रश्न राज्यकर्त्यांना डोकेदुखी ठरला आहे. दोघांना ‘मारुती कांबळे’ बनवून संपवून टाकण्यात आले का, या प्रश्नाचे उत्तर तपास यंत्रणांनी शोधायला सुरुवात केली आहे, मात्र या दोन्ही प्रकरणांमधील राजकीय गुंतागुंत पाहता या प्रश्नाचे खरेखरे उत्तर मिळणे कठीण आहे. परभणीत भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केल्याची घटना घडल्यानंतर आंदोलन झाले. त्यानंतर हिंसेच्या घटना घडल्याने त्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. या कारवाईत सोमनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. यादरम्यान त्यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला.

या घटनेनंतर राजकीय नेत्यांचे परभणी दौरे सुरू झाले. अगदी राहुल गांधींनीही परभणीत भेट दिली. या प्रकरणात महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांमध्ये संताप होता. सोमनाथच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीवरून आंदोलने, बंदचे इशारे दिले जात होते. यात राज्याचा गृहविभाग आणि पर्यायाने मुख्यमंत्री टीकेचे धनी ठरत होते. राज्यातील वातावरण यावरून तापलेले असताना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यामागोमाग त्यांच्या हत्येची बातमी आली. या दोन्ही घटना काही दिवसांच्या कालावधीने घडल्या. यातील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या बातम्यांची चर्चा देशमुखांच्या हत्येच्या बातमीने थंडावली. या हत्या प्रकरणाशी संबंधित नावे राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी असल्याने प्रसार आणि समाजमाध्यमातही हा विषय महत्त्वाचा ठरला.

याच प्रकरणात संशयाची सुई अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वळत आहे. विरोधकांनीही हा विषय लावून धरला आहे. यातून राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना आरोप-प्रत्यारोप, संशय, आपली बाजू मांडण्याचा राजकीय धुरळा उडाला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन पातळीवर सुरू आहे, तर सहा जणांना अटकही झाली आहे. याच प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्या आरोपाचे लक्ष्य धनंजय मुंडेंवरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार होते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी असा मित्रांचा राजकीय ‘सामना’ रंगला.

दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले. तब्बल २२ दिवसांनंतर आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. तोपर्यंत तो कुठे होता, असा प्रश्न विचारला जात आहे. हे प्रकरण शांत होण्याची चिन्हे नाहीत. कराडला पोलीस संरक्षण असताना २२ दिवस त्याला पोलिसांनी सरकारच्या सूचनेनुसारच जाणीवपूर्वक अटक केली नाही का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे.

देशमुखांच्या हत्या प्रकरणातील छोटे मासे गळाला लागले आहेत. त्यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आहे की त्याचाही कुणी आका आहे, या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. हत्या करणारे गजाआड घातले जातात, परंतु त्यामागील खरे सूत्रधार खरेखुरे ‘आका’ नामानिराळे राहत असल्याचा अनुभव महाराष्ट्रासाठी काही नवा नाही. असे कित्येक गुन्हे महाराष्ट्राच्या राजकारणाने ‘पचवले’ आहेत. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा काही दिवस उडत राहतो. तोपर्यंत दुसरे प्रकरण पुढे येते. पहिले प्रकरण शांत होते. राजकारणातील अशा गुन्ह्यांची उकल होण्याची संख्या नगण्य असते. व्यवस्था चालवणारे, कायदे राबवणारे, कायदे बनवणार्‍यांवरच आरोप होत असतील, तर घटनेच्या मुळापर्यंत पोहचून मुख्य आरोपींना सजा होणे अवघड असते. आरोप-प्रत्यारोपांपलीकडे हाती काहीच लागत नाही.

सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबतही संशयाचे वातावरण होते. स्वत: राहुल गांधी यांनी सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि राजकीय आरोप केले, मात्र गांधी यांनी बीडमध्येही जाऊन देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट का घेतली नाही, असे राजकीय आरोप काँग्रेस विरोधकांनी सुरू केले. प्रसारमाध्यमांसाठी केवळ बातमीचे मूल्य म्हणून तर समाजमाध्यमांवर जातीय चष्म्यातून या दोन्ही मृत्यूंकडे पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही मृत्यू प्रकरणात कमालीचा राजकीय हस्तक्षेप झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासामध्ये राजकारण दडलेले आहे, असे म्हणण्यास बराच वाव आहे. परिणामी या दोन्ही मृत्यूंचे संपूर्ण सत्य लोकांपर्यंत पोहचू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत ‘संतोष आणि सोमनाथ’ यांचे नक्की काय झाले, हा प्रश्न ‘सामना’ चित्रपटातील मारुती कांबळेचं काय झालं? या प्रश्नासारखाच अनुत्तरितच राहण्याची दाट शक्यता आहे.