HomeसंपादकीयओपेडSocial Consciousness : सामाजिक वेदनांच्या ज्वालामुखीचा उद्रेक

Social Consciousness : सामाजिक वेदनांच्या ज्वालामुखीचा उद्रेक

Subscribe

पटकन सुचते नि कागदावर उमटते ती कविता, असंही काहीजण समजतात, अर्थात हे तथ्यहीन आहे. कविता ही आतून येत असते. काही कवींच्या कविता ज्वलंत असून बदल घडवणार्‍या आहेत. तरीही ते प्रसिद्धीपासून कोसो दूर असतात. त्यांची कविता वाचकापर्यंत पोहोचतच नाही. बहुसंख्य कवी दोन-चार कविता लिहितात. त्यांचा संग्रह प्रकाशित होऊ शकत नाही. अशा अप्रकाशित परंतु सर्वच क्षेत्रांत परिवर्तन घडविण्यासाठी साहित्यातून नवनिर्माणाची कास धरणार्‍या, नवीन पेरणी करणार्‍या विविध स्तरातील कवींचा आणि कवितांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने ३१ कवींच्या प्रत्येकी दोन कविता संग्रहित करण्यात आल्या. विजयकुमार भोईर आणि भटू जगदेव यांनी त्याचा ‘वणवा’ हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह संपादित केला आहे.

-प्रदीप जाधव

साहित्य समाजाचा आरसा असल्याने त्यात समाजाचं प्रतिबिंब उमटत असतं. साहित्य हे सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तनाचं प्रभावी शस्त्र मानलं जातं. साहित्यातून निखळ आनंद आणि मनोरंजनाबरोबरच सत्य आणि वास्तव मतपरिवर्तन घडविणे अपेक्षित असतं. कविता, जलसा, पोवाडे यातून जनमत तयार करून ते जुलमी व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारण्यासाठी महत्त्वाचं माध्यम समजलं जातं.

तसं होत नसेल तर ते कुचकामी आणि कालबाह्य ठरतं. याउलट चिरकाल टिकणार्‍या साहित्याची दाहकता कायम असते. म्हणून विद्रोह आणि बंडखोरीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. सामाजिक जाणिवा निर्माण करून चिरंतन सामाजिक स्वास्थ अबाधित राखणे आणि अन्याय-अत्याचाराविरुद्ध प्रचंड लढा उभारणे यासाठी साहित्यिकांचं योगदान आणि भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली आहे.

ठिणगीने आग पेटते, आगीचा वणवा होतो. हा वणवा इतका भडकतो की, त्यातून शिल्लक उरते ती फक्त राख. आग नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही प्रकारची असली तरी दाहकता दूरगामी परिणामकारक असते. कैक वर्षे उपासमारीत जगत असलेल्या गरीब, वंचित, कष्टकरी, उपेक्षित समाजाच्या उपाशी पोटातील आगीचा भडका झाल्यास ज्वालामुखी होतो. आपल्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केल्यास ते जनआंदोलनाच्या रूपात रस्त्यावर उतरून प्रचंड सामाजिक आणि वित्तीय हानी होत असते.

मागच्याच आठवड्यात परभणीत संविधान चौकात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि तोडफोड झाली. त्यावरून भडका उडून वणवा पेटला. त्यातून माणसांमधली दरी आणखी वाढली. वणवा पेटण्याची अनेक कारणे दररोज घडत असतात. त्याला सामाजिक परिस्थिती जबाबदार असते. आजही प्रजासत्ताक लोकशाहीच्या अमृत महोत्सवी वर्षात जातीय संघर्षातून गावच्या गावं पेटवली जातात. घर, कुटुंब बेचिराख करून कोणाचे हातपाय तोडले जातात, डोळे फोडले जातात हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे.

आग जरूर लावावी, वणवा निश्चितच पेटवावा, त्यात विषम व्यवस्था जळून खाक व्हावी. जातीयता, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, गर्व, इर्षा, मत्सर, द्वेष, मीपणा, जात्यांध, धर्मांधता जळून राख व्हावी आणि नव्या माणसाचा जन्म होऊन नवीन समाजव्यवस्था निर्माण व्हावी ही खरी अपेक्षा आहे.

आपल्याकडे भारतात दरवर्षी होळी पेटवली जाते, या होळीमध्ये अंधश्रद्धा, विषमता, जातीयता नष्ट व्हावी असा संकल्प केला जातो, परंतु तसं अजून तरी झालं नाही. अर्थात ही समाजव्यवस्था टिकून राहावी यासाठी प्रयत्न करणारे सनातनी आणि प्रतिगामी सतत प्रयत्नशील असतात. म्हणूनच इथल्या व्यवस्थेला कंटाळून काही लोकांनी आपलं गाव, शहर, देशही सोडल्याचे अनेक पुरावे आहेत. अंतर्मनातील वेदना दाबल्या जातात. त्याचा उद्रेक होऊन कवितेच्या रूपातून त्या बाहेर येतात.

समाजसुधारकांबरोबरच विद्रोही, बंडखोर साहित्यिक, कवी, लेखकच खर्‍या अर्थाने समाजातील अनिष्ट कृतींवर हल्ला चढवून परिवर्तन घडवून आणू शकतात. पाण्यालाही आग लावू पाहणारे कवी हा वणवा पेटवताना कुठपर्यंत जाईल, काय काय जळून खाक होईल याची पर्वा या कवींना नसते. अलीकडे कवी संमेलने होतात त्यात श्रोते, रसिक नसतातच सहभागी कवीच रसिक आणि कवीही. तेच कविता वाचतात, गातात, एकमेकांना दाद देतात.

वणवा या कवितेत कवी विजयकुमार भोईर लिहतात, कवी संमेलनातून एकदा सगळ्या कवींनी संगनमत केले नि लिहिल्या कविता. विद्रोही शब्द पेटले, गाणी पेटली, बघता बघता नदीचे पाणी पेटले, झरे तापले, लव्हाळे जळू लागले, झाडे झुडपे करपू लागली. त्यांचं एकमत झालं. आता मेलेल्या मनांची मशागत करायला, नवचैतन्य बहरायला वणवेच पेटायला हवेत. जागतिकीकरणाला विरोध करण्यासाठी नवी पिढी निर्भयपणे उभी राहायला हवी. मानवतेचे खळखळणारे झरे निर्माण व्हायला हवेत. ते पुढे लिहितात,

जाती अंताचा लढा प्रखरपणे लढण्यासाठी
वणवेच पेटायला हवेत.

कवी सुरेश पेंदोर ‘लढा’ या कवितेत मुर्दांड जनतेला चेतवण्याचा प्रयत्न करतात. ते लिहितात,आग लावा तुमच्या देहाला ज्यांच्यात लढण्याची धमक नाही. जगायचे तर सिंहासारखे जगा बकरी बनून जगण्यात अर्थ नाही. तुम्ही माणूस आहात तेव्हा माणुसकीवर होणार्‍या हल्ल्यांना परतावण्यापेक्षा लपण्यात कोणती आली मर्दुमकी? मर्दासारखे लढा अन्यथा हातात बांगड्या भरा. आयुष्यावर थोडं काही बोलीन म्हणतोय, या कवितेत कवी भटू जगदेव विद्रोहाचे पाणी पेटते आहे अशा स्वरूपात आपली मांडणी करतात.

आजही समाजामध्ये अनेक अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा आहेत त्याविरुद्ध सहसा कुणी पुढे येत नाही. स्त्रियांना विशेष करून विधवा स्त्रियांना त्यांचा सन्मान मिळत नाही. आपण सुधारलेल्या राज्यात, जगात जगत असलो तरी अजूनही आपली मानसिकता बदललेली नाही. यावर भाष्य करताना कवी कवितेतून आपल्या पत्नीला सल्ला देताना म्हणतो, तू एक काम कर माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी कोलमडून जावू नकोस. तिच्यात धैर्य निर्माण करून ते लिहितात,

उधळ फुले माझ्या मृतदेहावर, अश्रू मात्र ढाळू नको
प्रिय सखे फुलवायचे असेल आयुष्याचा मळा
तर मी मेल्यानंतर तू नवीन घरोबा कर
भूतकाळ विसरून जीवनात नवचैतन्याची बाग फुलव.
तर कवी सुनील मोरे ‘दाहक’ या कवितेतून लिहितात,

विषमतेविरुद्ध वणव्यासारखी पेटलेली माझ्या मनातली आग विझवू कशी? सैरावैरा फिरणारं माझं मन तिला शांत होऊ देत नाही. अस्वस्थ मनात उठतात लाव्हाचे दाहक अन् म्हणतात,

चल उठ बंड कर ह्या तटबंदीच्या ठेकेदारांवर
भूकंप कर बरसूदे तुझ्या दाहकतेचा लाव्हारस.

भारतीय संविधान या कवितेत कवी मिलिंद जाधव संविधानाचे महत्त्व विशद करताना माणुसकीविरुद्ध लढणार्‍या प्रवृत्तींवर हल्ला चढवतात. संविधानामुळे सर्वांना मान-सन्मान मिळू लागला. आता जाती-पाती, पंथ, वैराची बंधने तोडा, माणुसकीच्या धाग्याने एकत्र येत लोकशाहीच्या समृद्धीसाठी मतदान करून मतदानाचा टक्का वाढवा, असं आवाहन करताना ते लिहितात,

देशाची, नागरिकांची उंचावली आहे मान
ज्यामुळे आहोत सुरक्षित ते फक्त भारतीय संविधान.

कवी सोमदत्त कुलकर्णी लिहितात, घरात मोठ्यांचा धाक नाही, नीतीमत्ता कुठे दिसत नाही. जो तो एकमेकांचे पाय खेचतो. खेकड्याची वृत्ती जाणार कधी, स्वार्थी, लबाड अशा जगात सत्याला किंमत राहिली नाही. कवी किशोर कासारे यांची भारतीय कविता अत्यंत बोलकी असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. ते लिहितात, जाती व्यवस्थेच्या गडद काळोखाला भेदणारा सूर्य उगवला. बाबासाहेबांच्या रूपाने त्या सूर्याची तेजोमय किरणे पसरली आहेत गावागावात.

बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या संदेशाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गाव, खेडी, शहरे, पाडे, वस्ती, गल्ली, नगरे आज शिक्षित होत आहेत. बाबासाहेबांचा संदेश आणि आदेशाचे पालन करीत आहेत. त्यामुळे विकासाच्या वाटा त्यांच्या वस्तीपर्यंत पोहोचल्या आणि वस्ती प्रकाशमान झाली आहे. विकास, सत्ता, स्पर्धेच्या नावाखाली माणुसकीहीन समाजव्यवस्था निर्माण झाली आहे.

यावर कवी नवनाथ रणखांबे यांचे कविता कोरडे ओढते. ते लिहितात, माणूसपण गमावलेल्या इथल्या लेखण्याही कुचकामी ठरत वेगवेगळ्या वर्ण, जाती, अधर्माच्या दावणीला बांधून वेगवेगळ्या विचार प्रवाहाचा वस्तारा हातात घेऊन हजामत करत मानवतेला काळीमा फासत आहेत. लोक रस्त्यावर का उतरत नाहीत? न्याय का मागितला जात नाही? अन्यायाला वर्ण, जात, धर्म असतो का, असाही प्रश्न ते आपल्या कवितेतून विचारत आहेत.

कवयित्री वृषाली माने यांची ‘मी जय भारत बोलते’ ही कविता एकात्मता, देशाभिमान, राष्ट्रप्रेमाचे गीत गाते. त्या लिहितात, मी जय भारत बोलते, मी नाही बोलत नमस्कार चमत्कार. होय मी जय भारत बोलते, जात, धर्म, पंथ सोडून जगायचंय, मी फक्त भारतीय म्हणून एक माणूस म्हणून रणशिंग फुंकलंय मी. त्या म्हणतात,

होय मी जय भारत बोलते
ना हिंदू ना मुस्लीम ना ख्रिश्चन आहे
मी फक्त भारतीय माणूस आहे

संपूर्ण जग आता योग साधनेकडे वळले आहे. योग साधनेसंबंधी सरला कापसे यांची योग ही कविता शरीरस्वास्थ ठेवून आयुर्मान वाढविण्यासाठी काही सूचना करते. त्या लिहितात, योग म्हणजे श्वासावर, स्वत:वर नियंत्रण, स्वशक्तीचा अविष्कार. वणवा काव्यसंग्रहातून माणसांच्या मनातील दु:ख, वेदनांना वाट करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

=संपादक – विजयकुमार भोईर,
=भटू जगदेव
=प्रकाशक -साहित्यमनू
=पृष्ठे -९१, मूल्य १८० रुपये