घरसंपादकीयअग्रलेखभाजपकडून शिंदे गटाची कोंडी?

भाजपकडून शिंदे गटाची कोंडी?

Subscribe

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकदिलाने निवडणुकीला सामोरे जातील आणि देशात तब्बल ४०० पेक्षा अधिक तसेच महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणले जातील, असेे स्वप्न बघणार्‍या महायुतीची सध्याची अवस्था अतिशय बिकट अशीच म्हणावी लागेल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धारेवर धरणे, अपेक्षित मित्र पक्षांनाच अडचणीत आणण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचे ठिकठिकाणी दिसत आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकदिलाने निवडणुकीला सामोरे जातील आणि देशात तब्बल ४०० पेक्षा अधिक तसेच महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणले जातील, असेे स्वप्न बघणार्‍या महायुतीची सध्याची अवस्था अतिशय बिकट अशीच म्हणावी लागेल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धारेवर धरणे, अपेक्षित मित्र पक्षांनाच अडचणीत आणण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचे ठिकठिकाणी दिसत आहे. विशेषत: शिंदे गटाचा ज्या जागांवर हक्क आहे, तेथे भाजपकडून खोडा घातला जात आहे. परिणामी शिंदे गटातील इच्छुक उमेदवारांसमोर तिकीट मिळेल की नाही? आणि कुठल्या भरोशावर प्रचार सुरू करायचा, असे प्रश्न पडले आहेत. वेळ दवडला जाऊ नये म्हणून त्यांनी औपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली असली तरी त्यांचे लक्ष आपापल्या पक्षाच्या निर्णयाकडे लागून आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर बघितले तर या जागेवर सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे प्रतिनिधित्व करतात.

गोडसे यांनी यापूर्वी छगन भुजबळ यांचा दीड लाख आणि समीर भुजबळ यांचा २ लाख ९३ हजार मतांनी पराभव केला होता, त्यामुळे त्यांना जायंट किलर म्हटले जाते. हा विचार करून यंदा त्यांनाच उमेदवारी मिळेल असे चित्र होते. शिंदे गटात दुसरा प्रबळ उमेदवारही नसल्यामुळे गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी परिस्थिती होती, मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर मित्र पक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला. त्यात मनसेनेही नाशिकच्या जागेवर दावा केल्याने शिंदे गट कोंडीत सापडला. विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे या तिन्ही पक्षांकडे एकही सक्षम उमेदवार नसताना त्यांनी या जागेवर दावा कुठल्या आधारावर केला? राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी या मतदारसंघातून दोन वेळा नशीब आजमावले. दोन्ही वेळा त्यांचा सपाटून पराभव झाला. आता तर संपूर्ण मराठा समाजाचा विरोध त्यांनी ओढवून घेतला आहे. अशीच परिस्थिती इतरत्रही आहे. खासदार श्रीकांत शिंदेंचे नाव शिवसेनेच्या पहिल्या यादीत जाहीर होईल, असे बोलले जात असताना प्रत्यक्षात मात्र अजूनही या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

- Advertisement -

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना भाजप कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळेल की नाही याबाबत शंका घेतली जात आहे. भाजप पदाधिकारीही ती जागा भाजपला मिळावी यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे कल्याणऐवजी श्रीकांत शिंदे यांना ठाण्यातून रिंगणात उतरवण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू आहे. हिंगोली मतदारसंघात उमेदवारी जाहीर केल्यानंतर वाद वाढला आहे. या मतदारसंघात खासदार हेमंत पाटील यांचे नाव सर्वेक्षणातून पुढे आले नसल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी करत आहेत. संभाजीनगरमध्येही शिंदे गटाला मानाचे पान दिले गेलेले नाही. पालघरमध्ये शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचा उमेदवारीवर हक्क असतानाही वसई भाजपच्या शहराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देत गावित यांच्यावर नाराजी व्यक्त केली. धाराशिव लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकाचवेळी दावा केला आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघासाठी अधिक रस्सीखेच पहायला मिळत आहे, तर भाजपनेदेखील दावा केला आहे, पण अंतिम समयी विक्रम काळे यांचे नाव निश्चित केले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात खासदार अरविंद सावंत यांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी तयारी केलेली असताना भाजपकडून राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांचे नाव पुढे केले जात आहे, तर मनसेकडून बाळा नांदगावकर यांच्या नावांची चर्चा आहे, मात्र ऐनवेळी भलताच उमेदवार येथून लढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये एकमत होत नसल्याचे चित्र आहे. ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी उदय सामंत आग्रही आहेत, कारण उदय सामंत यांचा भाऊ किरण सामंत या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

- Advertisement -

एकूणच शिंदे गटाची कोंडी करण्यातच भाजप सध्या धन्यता मानत आहे. तिन्ही मित्र पक्षांनी एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित असताना शिंदे गटाला गृहीत धरून जागावाटपाच्या बैठका होत आहेत. सातार्‍याची जागा भाजपला सोडताना नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय या दोन्ही पक्षांनी परस्पर घेऊन टाकला, मात्र ज्यांचा नाशिक जागेवर खरा हक्क होता त्या शिंदे गटाचा साधा विचारही झाला नाही. त्यांना सरळ गृहीत धरण्यात आले. त्याही उपर आता एकनाथ शिंदेंनी स्वत:च या जागेवरचा हक्क सोडत शिरुरची जागा मागितली आहे. जेव्हा म्होरक्याच तलवार मॅन करतो, तेव्हा सैनिक कोणाच्या जोरावर लढणार? यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे महायुतीतील अंतर्गत बेबनाव भाजपच्या वतीने जाहीरपणे पुढे आणले जात आहेत. शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या विरोधात शक्तिप्रदर्शने केली जात आहेत. मित्र पक्षांच्या इच्छुकांविरोधात इतकी जाहीर शक्तिप्रदर्शने यापूवी कधीही झाली नव्हती. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला डोके वर काढूच द्यायचे नाही, असा कट भाजपकडून रचल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -