लॉर्ड बेडन पॉवेल हे ब्रिटिश जनरल आणि आधुनिक स्काऊटिंग चळवळीचे संस्थापक होते. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला. त्यांचे वडील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. लंडनमधील चार्टर हाऊस या शाळेत शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी शिक्षण घेतले आणि जवळच्या जंगलात खेळत प्राथमिक स्काऊटिंग कौशल्ये शिकली. शालेय शिक्षणानंतर ते ब्रिटिश सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झाले आणि भारतात त्यांची नियुक्ती झाली. दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात मॅफेकिंग या शहराची शत्रूच्या वेढ्यापासून केलेली मुक्तता ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी होय.
सैनिकी स्काऊटकरिता त्यांनी लिहिलेले एड्सटू स्काऊटिंग हे पुस्तक शाळेतील मुलांसाठीही अतिशय उपयुक्त असल्याचे लक्षात येताच, त्यांनी इंग्लंडच्या ब्राउनसी बेटावर मुलांचे पहिले स्काऊट-शिक्षण शिबीर भरविले (१९०७). अशा प्रकारे बालवीर संघटनेची चळवळ सुरू केली. थोड्याच दिवसात ही चळवळ अनेक देशांत पसरली. १९१० मध्ये आपली बहीण ग्नेस बेडन पॉवेल हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ (गर्ल गाइड) ही संघटना स्थापन केली.
लंडन येथे १९२० मध्ये ‘जगाचे प्रमुख स्काऊट’ (चिफ स्काऊट) हा बहुमान त्यांना सर्वानुमते मिळाला. १९२२ मध्ये ‘बॅरोनेट’ व १९२९ मध्ये ‘फर्स्ट बॅरन बेडन-पॉवेल ऑफ गिलवेल’ होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल १९३९ मध्ये त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी सुचवले होते, परंतु दुसर्या जागतिक युद्धामुळे ते दिले गेले नाही. स्काऊटिंग फॉर बॉईज, माय अॅडव्हेंर्चस अ स्पाय, गर्ल गाइडिंग, व्हॉट स्काऊट्स कॅन डू, स्काऊटिंग अँड यूथ मुव्हमेंटस्, लेसन्स ऑफ अ लाइफ टाइम, आफ्रिकन अॅडव्हेंचर्स, पॅडल युवर ओन कॅगो ही बेडन-पॉवेल यांची उल्लेखनीय पुस्तके आहेत. बेडन पॉवेल यांचे ८जानेवारी १९४१ रोजी निधन झाले.