उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात देशभरातील कोट्यवधी भाविक मौनी अमावास्येच्या अमृत स्नानासाठी गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या प्रसिद्ध त्रिवेणी संगमावर एकवटले होते. ब्रम्हमुहूर्ताचा योग साधण्याच्या नादात बघता बघता भक्तांचा हा महापूर त्रिवेणी संगमावर उसळू लागला. मंगळवारी मध्यरात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास भक्तांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रचंड रेटारेटी, चेंगराचेंगरी होऊन त्यात 30 भाविकांचा मृत्यू झाला.
तर 60 हून अधिक भाविक जखमी झाले. चेंगराचेंगरीनंतर अपघाताच्या ठिकाणी भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारे दृश्य दिसले. त्रिवेणी संगमाच्या तिरावर दुर्घटनाग्रस्तांच्या चपला-बूट, कपडे आणि इतर सामान अस्ताव्यस्त पडले होते. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांच्या आप्तांचे आक्रोश, किंकाळ्या आणि हंबरड्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमाचाही थरकाप उडाला असेल.
दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. 12 पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल 144 वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. म्हणूनच धर्मग्रंथांमध्ये प्रयागराजला तीर्थक्षेत्रांचा राजा असेही म्हटले जाते. अशा प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हा मेळा जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक असल्याचा दावा अगदी सुरूवातीपासूनच उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारकडून केला जात आहे.
त्यामुळे अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणा किंवा भारताची धार्मिक शक्ती जगापुढे अधोरेखित करण्यासाठी म्हणा उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारने कुठलीच कसर शिल्लक ठेवलेली नाही. त्यातच स्वत: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 13 आखाड्यांपैकी एक असलेल्या नाथ आखाड्याशी संबंधित आहेत. तर केंद्रात हिंदुत्वाचे राजकारण करणार्या भाजपचे सरकार असल्याने यंदाच्या महाकुंभ मेळ्याला वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.
महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजचे महाकुंभ क्षेत्र नवीन जिल्हा म्हणून घोषित केले होते. त्यामुळे राज्य आणि केंद्रातील हजारो प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा कुंभमेळ्यात अहोरात्र कार्यरत आहेत. कोट्यवधींचा निधी खर्च करून भक्तांसाठी सोई-सुविधा उभारण्यात आल्या, जगात नावाजलेल्या परदेशी खासगी संस्थेला व्यवस्थापनाचे काम दिले.
परंतु एवढे करूनही यंदाच्या कुंभमेळ्याला दुर्घटनेचा डाग लागलाच. महाकुंभमेळा सुरू होऊन आठवडा होत नाही, तोच लागोपाठ ३ सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत 20 ते 30 तंबू जळून भस्मसात झाले होते. या आगीला कारणीभूत ठरलेल्या स्फोटांची जबाबदारी एका खलिस्तानी संघटनेने घेतली होती. या आगीत केवळ काही आखाड्यांतील साधूसंत आणि भाविकांच्या सामानांचे नुकसान झाले, सुदैवाने जीवितहानी वा कुणालाही दुखापत झाली नाही.
म्हणून कदाचित या सिलिंडर स्फोटांची फारशी चर्चा झाली नसावी. परंतु एका खलिस्तानी संघटनेने या स्फोटांची जबाबदारी घेणे आणि तपासातून आतापर्यंत काहीच निष्पन्न न होणे हे उत्तर प्रदेशसह केंद्रीय तपास यंत्रणांचेही अपयशच आहे. त्यापाठोपाठ आता ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
महाकुंभ मेळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर स्नान केल्याने जन्मोजन्मांतरीचे पापक्षालन होऊन मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यातच मौनी अमावास्येच्या दिवशी स्नान केल्याने सुख-समृद्धी मिळते आणि पिंडदान केल्यास पूर्वज प्रसन्न होऊन धन, समृद्धीचे आशीर्वाद देतात, अशीही श्रद्धा आहे. त्यातच हा योग तब्बल 144 वर्षांनी जुळून आल्याने त्रिवेणी संगमावर भाविकांची गर्दी होणे स्वाभाविकच होते.
या गर्दीचे योग्य नियोजन करणे हीच खरी व्यवस्थापकांची कसोटी होती. ब्रम्ह मुहूर्त साधण्यासाठी अनेक भाविक त्रिवेणी संगमाच्या रस्त्यातच बसून होते, काही झोपले होते. परंतु गर्दीचा लोंढा अव्याहतपणे संगमावर आदळतच होता. या बसलेल्या तसेच झोपलेल्या भाविकांना वेळीच हटवण्यात आले नाही. व्हीआयपींना स्नानासाठी प्राधान्य दिल्याने काही मार्ग तात्पुरते बंद ठेवले होते.
त्रिवेणी संगमाव्यतिरिक्त भाविकांना इतर घाटांकडे वळवण्यात आले नाही. संगमाकडे जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग ठेवला होता, अशी एक ना अनेक कारणे आता दिली जात आहेत. या कारणांपेक्षाही नाशिक, हरिद्वार, अलाहाबादच्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची उदाहरणे समोर असूनदेखील गर्दी व्यवस्थापनाच्या कसोटीत योगींचे महाकुंभ प्रशासन सपशेल अपयशी ठरले.
या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहताना आपण काही महान आत्म्यांना गमावल्याचे भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रसार माध्यमांशी बोलताना स्वत:चे अश्रू आवरणेही कठीण झाले होते. महाकुंभमेळ्यात डुबकी घेणार्यांचे आकडे प्रशासन जितक्या तत्परतेने दाखवते, तितक्या तत्परतेने त्यांनी मृतांची आकडेवारी जाहीर केली नाही.
परिणामी कोट्यवधी भाविकांच्या कुटुंबियांचा जीव चिंतेने व्याकुळ झाला होता. महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करून पापक्षालनासाठी गेलेल्या अनेकांचे हे अखेरचे स्नान ठरले आहे. योगी सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण या चौकशीतून महाकुंभ मेळ्यातील महापापाचे वाटेकरी कोण हे खरोखरच समोर येणार आहे का?