उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे. या महाकुंभ मेळ्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रयागराजमध्ये १३ जानेवारी २०२५ पासून कुंभमेळ्याची सुरुवात झाली. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा. हिंदू धर्मात प्रत्येक सणाला तसेच उत्सवाला काही न काही कारण हे असतेच.
तसेच हा कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक, धार्मिक आणि खगोलीय कारणेदेखील असतात आणि अनेक वर्षांनी त्याचे आयोजन केले जात असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होत असते. प्रयागराज येथे सुरू असलेला सध्याचा महाकुंभ मेळा हा त्याच्या भव्य-दिव्य, विराट आणि अत्यंत शिस्तबद्ध आयोजनासाठी जसा चर्चेत आहे, तसाच तो आणखी एका कारणासाठी देखील चर्चेत आहे. ते म्हणजे, या कुंभमेळ्यासाठी आलेल्या सौंदर्यवती.
या कुंभमेळ्यासाठी आलेले वेगवेगळे साधू, आखाडे आणि परदेशी पर्यटक जसे चर्चेत आहेत, तसेच तिथे आलेल्या सौंदर्यवतीदेखील चर्चेत आल्या आहेत. इतक्या की, कुंभमेळ्यापेक्षाही या सौंदर्यवतींचीच चर्चा जास्त रंगली आहे. सोशल मीडियावरही त्यांचेच सेन्सेशन आहे. त्यातही इंदौर येथून आलेली एक साधी माळा विकणारी मुलगी आहे, तिला तर भलतेच फॅन फॉलोइंग मिळाले आहे आणि हे फॉलोइंग एवढे वाढले की, शेवटी तिच्यावर कुंभमेळा सोडूनच जाण्याची वेळ आली आहे.
घटना पहिली –
तसं बघायला गेलं तर सुंदर स्त्रिया हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. स्त्रियांचे वागणे, दिसणे हे अनेकदा समाजाच्या आकर्षणाचा विषय ठरतो. अशाच एका साध्वीची चर्चा कुंभमेळ्यात रंगली होती. या कुंभमेळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक सुंदर साध्वी दिसते आहे. महाकुंभच्या सुरुवातीपासून या साध्वी म्हणजेच हर्षा रिछारिया यांचं नाव चर्चेत आलं होतं.
सोशल मीडियावर हर्षा यांना सर्वात सुंदर साध्वी असं नाव मिळालं आणि त्या पाठोपाठच हर्षा यांचा कुंभमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकालाच त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली. मग मीडियापासून सगळेच त्यांच्या मागे लागले आणि त्यांच्याबद्दलची जवळपास सगळीच माहिती ही सोशल मीडियावर आली. त्यानंतर काही वाद झाल्याने हर्षा या कुंभमेळाच सोडून निघून गेल्या.
घटना दुसरी –
अशीच दुसरी घटना आहे, इंदौर येथून आलेल्या एका साध्या मुलीची, जी माळा विकण्यासाठी म्हणून महाकुंभात आली. मूळची इंदौरची असणारी मोनालिसा भोसले कुंभमेळ्यात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली.
आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल या हेतूने ती येथे आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर महाकुंभमध्ये तिला भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत सेल्फी, फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली. यामुळे तिच्या व्यवसायावर परिणाम झाला. रुद्राक्ष माळा विक्री होण्याऐवजी तिचा जास्त वेळ फोटो काढण्यात जाऊ लागल्याने तिच्या वडिलांनी तिला पुन्हा घरी पाठवले.
कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या घटना सांगण्याचं कारण काय? तसं तर रोजच्या बातम्या पाहणार्या आणि वर्तमानपत्र वाचणार्या सर्वांनाच या घटना अगदी तपशीलवार माहिती आहेत. मग तरीही याचा विशेषत्वाने उल्लेख करण्यामागे समाज म्हणून आपली मानसिकता दाखवणे हा हेतू आहे. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किती पडावे, त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर किती प्रमाणात अतिक्रमण करावे याचे काही अलिखित नियम आहेत आणि अतिउत्साहाच्या भरात आपण अनेकदा त्यावरच घाला घालतो.
कुंभमेळ्यात आलेल्या या दोनच स्त्रिया होत्या का, तर नाही. आतापर्यंत हजारो, लाखो स्त्रियांनी या कुंभमेळ्याला भेट दिली असेल. पण याच दोन स्त्रियांची एवढी चर्चा का रंगली. सोशल मीडियावरही कुंभमेळा सर्च केल्यावर या दोघींचे विशेषतः मोनालिसा भोसले हिचे व्हिडीओ येतातच. पण मोनालिसाचे हेच सौंदर्य तिच्यासाठी मारक ठरले. कुंभमेळ्यात जाऊन फोटो वगैरे काढण्यातच तिचा इतका वेळ गेला की, तिचा वेळ फुकट जात असल्याने आणि व्यवसाय होत नसल्याने तिला तिच्या वडिलांनीच परत पाठवून दिले.
सोशल मीडियाबद्दल नेहमीच ते दुधारी शस्त्र असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच ते जितके उपयोगाचे ठरू शकते तेवढेच ते घातकही असते. अलीकडच्या काळात त्याचा घातकपणा प्रकर्षाने जाणवतो आहे. एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याची, एखाद्याने केलेल्या चांगल्या कामाची सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली प्रसिद्धी ही जशी सकारात्मक ठरते, अगदी तशीच एखाद्याची केलेली बदनामी, एखाद्यासोबत केलेला प्रॅन्क किंवा मस्करी सोशल मीडियावर टाकल्याने सगळीकडे व्हायरल झाल्यावर एखाद्याला आयुष्यातून उठवूदेखील शकते, हे आपल्या कधी लक्षात येणार? मध्यंतरी असाच एक प्रसंग समोर आला होता. एका मुलाचे रॅगिंग करून त्याच्या फजितीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आला आणि यामुळे झालेली नामुष्की सहन न होऊन त्या मुलाने थेट आत्महत्या केली.
म्हणजे सोशल मीडिया वाईट आहे, असा त्याचा अर्थ आहे का, तर नाही. पण, हे माध्यम हाताळण्याचे भान आपल्याकडे नाही, हे मात्र खरे. म्हणूनच आपण, व्हायरल, सोशल मीडिया अशा सगळ्या नावाखाली काय वाट्टेल ते शेअर करत असतो. ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्राम अशा सगळ्या मीडियावर गेलात तरी याचा प्रत्यय येईल. मग यातून कोणाचे नुकसान झाले तरी त्याची फार फिकीर असतेच असे नाही. (ही सगळी विधाने सर्वसमावेशक नाहीत, सगळेचजण अशाच पद्धतीने वागतात, असे नाही.)
गेल्या काही वर्षात सोशल मीडिया हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. टीव्ही, कम्प्यूटर आणि फोन या सर्व सुविधा एकाच माध्यमातून देणारा स्मार्ट फोन आणि आपले अगदी जीवाभावाचे मैत्र झाले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा घातकच ठरतो. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचाही अतिवापर हा नैराश्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे अनेक संशोधनांमधूनही समोर आले आहे.
हे सगळं टाळायचं असेल तर सामाजिक भान आपल्याला जपायलाच हवं. एखाद्याच्या आयुष्यात किती डोकावायचं, याचे काही नियम असतात, ते पाळायलाच हवेत. कुंभमेळ्यापुरता विचार करायचा तर यातील ज्या छाया आहेत त्यांच्या संबंधात काही वाद निर्माण झाला आणि तो सोशल मीडियावरही इतका चर्चिला गेला की या सगळ्याला कंटाळून त्या कुंभमेळाच सोडून गेल्या. तीच गत झाली मोनालिसा भोसले हिची. सोशल मीडियावर तिची, तिच्या सौंदर्याची खूप प्रसिद्धी झाली.
पण, याचा तिच्या व्यवसायाला फायदा झाला का, तर नाही. म्हणूनच तर तिला परत घरी पाठवण्याची वेळ तिच्या वडिलांवर आली. मोनालिसाचं सौंदर्य सोशल मीडियावर एवढं व्हायरल झालं की, जागोजागी तिला अडवून तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकं उभे असतात. शेवटी, यामुळे मला माझ्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचे मोनालिसाने जाहीररित्या सांगितले. आता हे एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरील अतिक्रमण नाही का?
एका संशोधनानुसार फेसबूक, ट्विटरसारखी सोशल मीडियाची साधने व्यक्तीला मानसिक स्वरुपात दुबळे करत आहेत. सोशल मीडियामुळे निर्माण होणार्या या नकारात्मक प्रभावांवर निश्चितच गांभीर्याने विचार करायला हवा आहे. कोणतीही गोष्ट जोवर मर्यादेत असेल तोवरच तिचे महत्त्व, उपयुक्तता आणि मुख्य म्हणजे आनंदही टिकतो. पण, हे भान राहिले नाही तर याचे एका आजारात रुपांतर होण्याची भीती नाकारता येत नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, एक चांगला, वैचारिक आणि सामाजिक भान जपणारा समाज निर्माण करण्यात आपल्याला अपयश येईल, हे निश्चित.