महाकुंभ मेळ्यानिमित्त कोट्यवधी भाविक उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील संगम घाटावर जमा होत आहेत. यंदाचा हा महाकुंभ मेळा आहे. प्रयागराजसह हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरवला जातो. जगातील हा सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा म्हणावा लागेल. प्रयागराजमध्ये बारावा कुंभमेळा आयोजित केला जातो, त्याला महाकुंभ असे म्हणतात.
कालगणनेनुसार 144 वर्षांनी हा योग येतो. त्यामुळे यंदाच्या या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे 13 जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ मेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानिमित्त देश आणि विदेशातून भाविक येथे दाखल होत आहेत. या पवित्र काळात गंगेत स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. पण मंगळवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीमुळे या भव्य सोहळ्याला गालबोट लागले.
मौनी अमावास्येला दुसरे अमृत स्नान केले जाते. तो योग साधण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत आणि होत आहेत. बुधवारच्या मौनी अमावास्येला एका दिवसात 8 ते 10 कोटी भाविक अमृत स्नान करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासूनच संगम घाटावर भाविकांची गर्दी झाली. परिणामी चेंगराचेंगरी होऊन 10 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला. आता त्याचे कारण काहीही दिले जात असले तरी, यात प्रशासनाचा फोलपणा आणि नियोजनशून्यता हेच कारण अधोरेखित होते.
144 वर्षांनी असा योग येत असल्याचे सांगितले जात असताना, तसेच 10 कोटी भाविक येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असताना, तसे नियोजन केले होते का? एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था करण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारसह तेथील विविध आखाड्यांना अपयश आले, असे म्हणावे लागेल. या आधीच्या काही कुंभमेळ्यातही अशा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. त्यातून काहीच धडा घेतला नाही का? ज्या ठिकाणी अलोट गर्दीची शक्यता असते तिथे पोलिसांचा पुरेसा फौजफाटा होता का?
आसपासच्या राज्यांकडून काही कुमक मागविली होती का? इतर स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे संख्याबळ भाविकांच्या मदतीसाठी उपलब्ध होते का? त्यातही उत्स्फूर्तपणे काम करणारे किती? त्यांना ड्युटी देण्यात आलेले किती? यावरही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन निर्भर असते. कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय लष्कराकडे महाकुंभचे व्यवस्थापन का सोपविण्यात आले नाही?
असा प्रश्न श्री निरंजनी पंचायती आखाड्याचे महामंडलेश्वर प्रेमानंद पुरी यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय, महाकुंभच्या निमित्ताने गंगेत स्नान करण्यासाठी व्हीआयपी आपल्या लव्याजम्यासह येत असल्याने त्यांची बडदास्त ठेवण्याबरोबरच सुरक्षिततेचीही काळजी प्रशासनाला घ्यावी लागत आहे. महामंडलेश्वर प्रेमानंद पुरी यांनी माध्यमांशी बोलताना हेच अधोरेखित केले आहे. एखाद्या दुर्घटनेनंतर व्हीआयपींची भेट जशी बचावकार्याला त्रासदायक ठरते, तसलाच प्रकार अशा धार्मिक उत्सवाच्या बाबतीतही घडतो.
हे केवळ उत्तर प्रदेशातील महाकुंभच्या बाबतीत नव्हे तर, इतर ठिकाणीही असेच घडत आहे. जुलै महिन्यात उत्तर प्रदेशच्याच हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. त्यात सुमारे 60 जणांचा मृत्यू झाला होता. छठ पूजा आणि दिवाळीनिमित्त वांद्रे-गोरखपूर ट्रेनने गावाला जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाल्याने ऑक्टोबर महिन्यात वांद्रे टर्मिनस येथे चेंगराचेंगरी झाली. त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नऊ प्रवासी जखमी झाले होते.
तर अलीकडेच म्हणजे साधारण 20 दिवसांपर्वी वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती येथे श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी टोकन मिळणार्या केंद्रांवर भाविकांची गर्दी झाली होती. त्यावेळी चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. सुमारे ४० जण जखमी झाले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, जशी जबाबदारी संबंधित राज्य सरकारची, तशीच भाविकांचीही आहे. श्रद्धा असावी, पण ती आपलाच जीव घेणारी नसावी, एवढे भान भाविकांनी ठेवले पाहिजे.
एखाद्या सण-उत्सवात कोणत्याही देवस्थानात अशा प्रकारे गर्दी केली जाते की, हे आपले अखेरचेच दर्शन आहे. यातूनच दुर्दैवाने ते काहीजणांचे अखेरचेच दर्शन ठरते. सोशल मीडियावर किंवा प्रसारमाध्यमांसमोर आपण कसे बचावलो, याचे वर्णन केले जाते. पण परमेश्वराच्या दारात अनावधानाने का होईना अप्रत्यक्षपणे दुसर्याच्या मृत्यूला आपण कारणीभूत ठरत आहोत, हे कोणाच्याच कसे लक्षात येत नाही. या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सकाळी पुन्हा अमृत स्नानाला सुरुवात झाली.
दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे सव्वाचार कोटी भाविकांनी स्नान केले. महाकुंभच्या अमृत योगानिमित्त गंगेत डुबकी घेणार्यांची संख्या जवळपास 20 कोटींच्या पार गेली आहे. पण शोकसागरात बुडालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांच्या आप्तांचे काय? त्यांच्यासाठी हा पवित्र योग वेदनादायी ठरला आहे. धार्मिकस्थळी, प्रार्थनास्थळी प्रामुख्याने महिला आणि लहान मुले हेच भाविकांच्या बेपर्वाईचे बळी ठरत आहेत. या बेपर्वाईमुळे लोकांची श्रद्धा आणि आस्था चेंगरली जात आहे. त्यामुळे श्रद्धेबरोबरच शिस्तही तेवढीच गरजेची आहे.