– अविनाश चंदने –
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यात खूप गाजत आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत 9 आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. यात वाल्मिक कराड याच्यासह प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे, तर चिंतेची बाब म्हणजे एसआयटी, सीआयडी तपास करत असूनही 55 दिवसांनंतरही कृष्णा आंधळेपर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत. अशी परिस्थिती असताना भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नसताना त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांच्या पाठीशी गड उभा असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर ज्या लोकांनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली? कारण अगोदर त्यांना मारहाण झाली होती, असा सवाल उपस्थित केला. याच वक्तव्यावरून महंत नामदेव शास्त्री टीकेचे धनी झाले आहेत.
हा सगळा प्रकार खंडणीतून झाला आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने पवनचक्की मालकाकडून खंडणीसाठी तगादा लावला आणि त्याला सरपंच संतोष देशमुख यांनी विरोध केला. त्यातून देशमुख यांनी खंडणी मागणार्यांना दोन-चार फटके काय दिले म्हणून त्यांचा खून केला आणि ही मानसिकता जर महंत म्हणवून घेणार्या नामदेव शास्त्रींना खटकत असेल तर ते कोणत्या वृत्तीचे समर्थन करत आहेत हे उघड दिसत आहे. वास्तविक या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा पहिल्यापासून आरोप होता, परंतु तो फरार होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल 21 दिवसांनी म्हणजे 31 डिसेंबर रोजी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतो. तरीही वाल्मिक कराडचा बोलवता धनी वेगळाच असल्याचा आरोप या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच होत आहे.
कराड हा धनंजय मुंडे यांचा खास माणूस असल्याची अख्ख्या बीड जिल्ह्याला माहिती आहे. मुंडे यांचा जनता दरबार तो चालवायचा असाही त्याच्यावर वारंवार आरोप झाला आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहिल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पहिल्यापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. तेव्हापासून शांत असलेले महंत नामदेव शास्त्री यांनी 50 दिवसांनंतर धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहणे आणि हत्या करणार्यांची बाजू धरत त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे, असे विधान करून धनंजय मुंडे यांना वंजारी समाज तुमच्या पाठीशी असल्याचा मेसेज दिला आहे.
हे करतानाच महंत नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुखांच्या मुलांचा सगळा खर्च भगवानगड उचलेल, अशीही घोषणा करून आपण दयाळू, कनवाळू असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र बुंद सें गयी वो हौद सें नही आती, अशी त्यांची अवस्था झाली आहे. महंतांच्या या दिखाऊ दातृत्वाला देशमुख कुटुंबीयांनी तेवढ्याच प्रामाणिकपणाने नाकारले आहे. आम्हाला मदत नको, न्याय द्या, अशी मागणी त्यांनी केली. एवढेच नाही तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवी यांनी रविवारी भगवानगडाला भेट देऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वाल्मिक टोळी आणि त्याविरोधातील पुरावे सादर केले. हे कमी म्हणून की काय भगवानगडाला 50 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यातूनच संतोष देशमुख यांची हत्या करणारे आणि त्यांच्या कायम पाठीशी राहणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही देशमुख कुटुंबाची भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे, तर आरोपींच्या पाठीशी उभे राहू नका, असा अप्रत्यक्ष मेसेज धनंजय देशमुख यांनी या भेटीतून दिला आहे. त्याचवेळी महंत नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मानसिकतेचा विचार केला. त्याच महंतांना वैभवी संतोष देशमुखने खडा सवाल केला. ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यांच्या शरीराचा एकही भाग शिल्लक ठेवला नाही, त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या मानसिकतेचा विचार तुम्ही केला काय? यावर गड देशमुखांच्या पाठीशी आहे, असे उत्तर महंतांनी दिले.
दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, ते गुन्हेगार नाहीत, असे म्हणणारे महंत नामदेव शास्त्री आता संतोष देशमुख यांच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवत आहेत. यातून एक बाब स्पष्ट झाली आहे. गुन्हेगारांची मानसिकता का बिघडली हे महंत यांचे विधान चुकीचे होते. त्यावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ही विश्वासार्हता परत मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. खरंतर महंतांसारख्या व्यक्तींनी सत्याचीच बाजू घ्यायला हवी, मात्र जवळपास 50 दिवस या विषयावर काहीही न बोललेले महंत धनंजय मुंडे भगवानगडावर त्यांना भेटायला आल्यावर आणि त्यांनी मुक्काम केल्यानंतर दुसर्या दिवशी लगेचच पत्रकार परिषद घेऊन बरेच काही बोलून जातात. एवढेच नाही तर या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी महंतांशी राजकीय चर्चा झाली नसल्याचे नंतर सांगितले, तर राजकीय आणि सामजिक चर्चा झाल्याचे महंत नामदेव शास्त्री यांनी दोघांच्या भेटीनंतर स्पष्ट केले. म्हणजे त्यांच्यातील चर्चेसंबंधात मुंडे यांची लपवाछपवी समोर आली आहे.
मुळातच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर सुरू झालेले लपवाछपवीचे राजकारण याचा समाजाला प्रचंड उबग आला आहे. या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडचे पोलिसांशी असलेले सौहार्दाचे संबंध, त्यांच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिप खूप काही सांगून जातात. याशिवाय बीड जिल्ह्यातील राखेचे राजकारण, यापूर्वी झालेल्या हत्या, भाजपचे आमदार सुरेश धस तसेच शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कराडचे सर्व कारनामे बाहेर काढले आहेत. कराड कुणाच्या इशार्यावर काम करायचा याचाही अनेकदा उल्लेख केला आहे. हे कमी म्हणून की काय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण पहिल्यापासूनच लावून धरले आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी अजित पवारांचीही भेट घेऊन त्यांच्याकडे पुरावे सादर केले होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्ताने बीड, परळीमधील गुंडगिरी, खंडणी, दादागिरी उघड झाली आहे. त्याचवेळी या घटनांचे आधुनिक ’वाल्मिकी’ कोण हेही महाराष्ट्राला उमगले आहे. खरंतर साधूसंत-महंतांनी सत्याची बाजू घेणे गरजेचे आहे, किंबहुना तेच त्यांचे काम आहे, पण कलियुगात हीच मंडळी राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली जमत असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी ठेवता येणार? संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात भले तरि देऊं कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी, असे म्हटले आहे. म्हणजेच गरज पडली तर स्वतःची लंगोटी देऊ, पण जर कुणी आम्हाला घाबरट समजून लंगोटीलाच हात घालणार असेल तर आम्ही अशा नाठाळाचे टाळके फोडायलाही कमी करणार नाही. म्हणजेच आपले संत एवढे सडेतोड आणि स्पष्टवक्ते होते. त्यांनी परिणामांची कधीही तमा बाळगली आहे. बिघडलेल्यांना खडे बोल सुनवायला संतांनी कधीही कमी केले नाही. यात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री बसतात का, हाच खरा प्रश्न आहे.