महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. कारण ही निवडणूक विविध अंगाने महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. त्याचसोबत महाराष्ट्र हे देशातील स्ट्रॅटेजिक स्टेट मानले जाते. त्यामुळे तेथील राजकीय हालचालींना विशेष महत्त्व असते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांसह आपल्याला ४००चा आकडा पार करता येईल असे भाजपला वाटत होते, पण ते तर दूरच त्यांना त्यावेळी बहुमतही मिळाले नाही. त्यामुळे त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या आधाराने सरकार स्थापन करावे लागले. उद्या जर का राजकीय परिस्थिती बदलली तर केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची शाश्वती देता येत नाही. कारण चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे दोघेही महत्त्वाकांक्षी आहेत.
२०१९ साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. त्यानंतर अडीच वर्षांनी त्यांनी ती मोठ्या सायासाने मिळवली, पण त्यासाठी त्यांना बरीच उलथापालथ करावी लागली. आता राज्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांची महायुती आणि दुसर्या बाजूला काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय अटीतटीची होऊन बसलेली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निवडून येणार्या उमदेवारांची संख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे आपल्याला यावेळी मोठी मुसंडी मारता येईल असे काँग्रेसला वाटते, तर लाडकी बहीण योजनेचा फायदा आपल्याला मिळेल. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकता येतील, असा विश्वास भाजपला वाटत आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आम्हीच सत्तेत येणार, असे छातीठोकपणे सांगत आहेत, पण त्याचवेळी त्यांच्यातील मुख्यमंत्री कोण होणार हे मात्र कुणी छातीठोकपणे सांगत नाही. अजित पवार यांच्यासारखे तर आपले मुख्यमंत्रीपदाचे बॅनर अगोदरच झळकवून मोकळे झाले आहेत. भाजपने एकनाथ शिंदे यांना काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्रीपद दिले, अशी खंत भाजपच्या नेत्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यामुळे आता त्यांना आपला मुख्यमंत्री हवा आहे. त्याचसोबत ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार, असे शिंदे यांचे समर्थक सांगत आहेत. दुसर्या बाजूला महाविकास आघाडीतील काँग्रेसमधील नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्रीपदाचे कोट शिवून बसलेले आहेत.
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर सगळ्यात अगोदरपासून उद्धव ठाकरे हेच कसे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य आहेत याचा धोशा लावलेला आहे. शरद पवार हे नेहमीप्रमाणे शांत असले तरी मौके पे चौकाच नव्हे तर छक्का कसा मारायचा याचे प्रात्यक्षिक त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची स्थापना करून दाखवले आहे. जर शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर भाजपची खेळी फसली असती. ठाकरेंनी राजीनाम्याची घाई करू नये, असे पवारांनीही त्यावेळी सुचवले होते. पवारांचा पक्ष फुटल्यामुळे आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असे ते सांगत असले तरी महाराष्ट्रातील किंगमेकर हे शरद पवार राहिलेले आहेत. आपलीच सत्ता येणार असा दावा करणार्यांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत.
निवडणुकीचे मतदान संपले की एक्झिट पोलवाल्यांचे पेव फुटते. काही वेळा हे अंदाज खरे ठरतात, पण बरेचदा त्यांच्या अंदाजाचा फुगा फुटतो. सध्या महाराष्ट्रात त्यांच्या अंदाजावर चर्चा सुरू आहे. एक्झिट पोलवाल्यांचे बहुमत सध्या महायुतीच्या बाजूला आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा निकाल जाहीर होतील, त्याचवेळी वास्तव सगळ्यांसमोर येईल. एक्झिट पोलवाल्यांच्या अंदाजाचा सोक्षमोक्ष तेव्हाच लागेल. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए ४०० पार करणार, असे बरेच एक्झिट पोलवाले सांगत होते, पण प्रत्यक्षात काही वेगळेच घडले. हरियाणातही काँग्रेसच येणार, असे एक्झिट पोलवाले सांगत होते, पण भाजप आली.
महाराष्ट्रात सध्या एक्झिट पोलवाले महायुतीच्या बाजूने कल दाखवत असल्यामुळे महायुतीतील काही नेते निकाल लागण्याअगोदरच आपले विजयी बॅनर लावून मोकळे झाले आहेत. बरेचदा एक्झिट पोलवाल्यांचे अंदाज चुकतात. याचे कारण म्हणजे निकालाला कलाटणी देणारे काही अदृश्य घटक असतात. ते एक्झिट पोलवाल्यांना दिसत नसतात. इतकेच नव्हे तर राजकीय विश्लेषकांचेही असेच होते. अदृश्य घटक आणि वळणे त्यांना दिसत नसल्यामुळे त्यांचे अंदाज चुकतात. एक्झिट पोलवाले किंवा राजकीय विश्लेषक हे आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींच्या किंवा घटनांच्या आधारावर आपले अंदाज तयार करीत असतात, पण काही अज्ञात घटक अचानक पुढे येत असतात याची त्यांना कल्पना येत नाही. त्यामुळे त्यांचे अंदाज चुकतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होईल आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील, याचा अंदाज कुठल्याच एक्झिट पोलवाल्याला किंवा राजकीय विश्लेषकाला करता आलेला नव्हता. त्यामुळे आज जेव्हा निकाल जाहीर होतील तेव्हाच कुणाला बहुमत मिळेल किंवा कोण सत्तेवर येईल हे स्पष्ट होईल. कोण किती पाण्यात आहे ते कळेल. तोपर्यंत सगळ्यांचे आपला आपला अंदाज बांधणे सुरू राहील.