महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रमुखत्व असलेल्या महायुतीला जे प्रचंड यश मिळाले ते पाहिल्यानंतर आता आगामी काळात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपले काय होणार याविषयी विरोधी पक्षांच्या नेत्यांना चिंता वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण एकूणच वातावरण तसेच आहे. मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी होत चालला आहे, हे अलीकडच्या काळात दिसून येत आहे.
मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी ज्या पक्षाची स्थापना झाली त्या नेत्यांची भव्यदिव्य निवासस्थाने बनत असताना बहुसंख्य मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जो मोठा लढा देण्यात आला त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती, पण पुढे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर तिचा फार काळ टिकाव लागला नाही.
महाराष्ट्राची सत्ता ज्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध केला होता किंवा त्या काळात निष्क्रिय राहिले होते त्या काँग्रेस पक्षाकडे गेली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यात महाराष्ट्रातील अनेक बुद्धिजीवींचे मोठे योगदान आहे. ते रस्त्यावर उतरले, त्यांनी जनमत संघटित केले. त्यातून ती चळवळ उभी राहिली. काँग्रेसचे मोरारजी देसाई त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या आदेशाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणार्या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला.
त्यात 106 आंदोलक शहीद झाले. इतके सगळे होऊनही संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर विशेषत: मुंबईमध्ये महाराष्ट्राचा भूमिपुत्र असलेला मराठी माणूस त्याच्या न्याय हक्कापासून वंचित राहत होता. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांना भूमिपुत्रांच्या प्रश्नांची फारशी चिंता नव्हती. अशा परिस्थितीत सामान्य मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंंबईत शिवसेनेची स्थापना केली.
शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मुंबईत मराठी माणसाला त्याचे विविध क्षेत्रांमध्ये हक्क मिळावेत म्हणून अनेक आंदोलने करण्यात आली. त्यातून मुंबईतील मराठी लोकांना अनेक उद्योगांमध्ये, कंपन्यांमध्ये, बँका, हॉटेलांमध्ये नोकर्या मिळाल्या. शिवसेनेच्या स्थानिय लोकाधिकार समितीमुळे स्थानिक मराठी लोकांना मुंंबईतील कंपन्यांमध्ये प्राधान्य देण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व मिळाल्यामुळे मराठी माणूस मुंबईत ताठ मानेने आणि ताठ कण्याने वावरू लागला.
मराठी चित्रपट असो किंवा अन्य कुठलेही क्षेत्र असो, जिथे मराठी माणसांना न्याय मिळत नसेल तिथे शिवसेना धावून जाऊ लागली. स्थानिक पातळीवरील लोकांचे प्रश्न शिवसेना शाखांच्या माध्यमातून सुटू लागले. अशा प्रकारे शिवसेनेचा प्रसार मुंबईसह महाराष्ट्रात झाला. 1995 साली शिवसेनेची महाराष्ट्रात भाजपसोबत युतीची सत्ता आली, पण पुढे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी एकत्र आलेले शिलेदार जसे आर्थिकदृष्ठ्या सक्षम होऊ लागले तसे त्यांच्या स्वतंत्र महत्त्वाकांक्षा प्रबळ होऊ लागल्या.
छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांच्यासारखे शिवसेनेत सुरुवातीपासून निष्ठेने काम करणारे नेते बाहेर पडले. त्यात शिवसेनेला मुख्य फटका बसला तो राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा. कारण ती ठाकरे घराण्यात पडलेली फूट होती. त्यातून शिवसेना दुभंगली गेली. जे शिवसैनिक पूर्वी एकत्र लढत होते ते दोन पक्ष झाल्यामुळे एकमेकांच्या विरोधात लढू लागले. त्याचा फायदा अन्य पक्षांना होऊ लागला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनपेक्षित उलथापालथ झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बहुमताच्या आधारे बंड करून शिवसेना आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे मूळ शिवसेनेत तिसरी मोठी फूट पडली. मूळ शिवसेनेतील तीन पक्षांमध्ये विभागले गेलेले नेते आता एकमेकांच्या विरोधात निवडणुकांमध्ये लढत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे केवळ 20 आमदार निवडून आले, तर राज ठाकरे यांच्या मनसेचा एकही आमदार निवडून येऊ शकलेला नाही. ज्या शिवसेनाप्रमुुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, मुंबईत त्या शिवसेनेची अशी अवस्था व्हावी याविषयी मराठी लोकांमध्ये एक चिंतेचा सूर उमटू लागलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी चर्चा सुरू झालेली आहे.
याविषयीचा प्रश्न ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी मोघम उत्तर दिले. महाराष्ट्राविषयी ज्यांना चिंता आणि तळमळ वाटते, त्या सर्व पक्षातील लोकांनी एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल ते काही बोललेले नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी शिवसेनेतील काही बुजुर्गांनी बरेच प्रयत्न केले होते, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पहिली टाळी कोण देणार यावरच सगळे अडून बसले.
मुळात हे विभाजन नेतृत्वाच्या स्पर्धेतून झालेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे राज यांना सोबत घेऊन आपला प्रभाव कमी करून घेणार नाहीत. राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असे वाटत नाही. सध्या मूळ शिवसेना उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विभाजित झालेली आहे. हे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटत नाही. त्यामुळे मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी आता नव्या मराठी सेनेची गरज आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.