मराठी व्याकरणात कर्ता, कर्म आणि क्रियापदांना महत्त्व असतं. यात कर्ता दिशादर्शक मानला जातो. वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा शब्द म्हणून त्याची ओळख असते. त्यानंतर येते ते कर्म, ज्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हटले जाते आणि वाक्यातील मुख्य शब्द हे क्रियापद मानले जाते. या क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थबोध पूर्ण होत नाही.
त्यामुळे भाषेच्या व्याकरणात या तीनही संज्ञा अत्यंत महत्त्वाच्या प्राथमिक आणि पर्याय नसलेल्या असतात. वाक्याचा अर्थबोध झाल्यावर भाषेचा संवाद पूर्ण होतो. त्यानंतर या संज्ञाचे काम संपुष्टात येते. व्याकरणात आणि राजकारणातही कर्त्याची कर्तव्ये सारखीच असतात. व्याकरणात कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तीन गुण असलेले वाक्य परिपूर्ण मानले जाते, तर राजकारणात हे तीनही गुण असलेला कार्यकर्ता परिपूर्ण मानला जातो.
व्याकरणात आणि राजकारणात हे साम्य कमालीचे आश्चर्यकारक आहे. व्याकरणातल्या कर्त्याचा राजकारणात कार्यकर्ता होतो. कार्यकर्त्यासाठी त्याचा नेता कर्ताधर्ता असल्याने केवळ त्याने आदेश दिलेले कर्म करत राहणे आणि त्यानुसार पुढील क्रिया चालवली जाणे महत्त्वाचे असते. पक्षात याला निष्ठा असे नाव असते. राजकारणात नेत्यांच्या निष्ठा बदलत असतात, मात्र कार्यकर्त्यांनी आपल्या निष्ठा नेत्यांच्या निष्ठेनुसार वेळोवेळी वळवायच्या असतात, स्वतंत्रपणे विचार करणे कार्यकर्त्यासाठी पक्षद्रोह मानला जातो, परंतु नेत्यांनी आपल्या धोरणात बदल केल्यास त्याला मुत्सद्दीपणा मानलं जातं.
महाराष्ट्राच्या राजकारणात सद्यस्थितीत सर्वच पक्षांनी त्यांच्या मूळ ध्येय धोरणांशी फारकत घेतली आहे. एकसंध शिवसेनेनंतर आताचे दोन्ही गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा सगळ्याच पक्षांच्या ध्येय धोरणांत पक्षनेत्यांनी काळानुसार बदल केले आहेत, मात्र या पक्षातील कार्यकर्त्यांची निष्ठा कायम आहे. व्याकरणातले कर्ता, कर्म आणि क्रिया असे तीनही गुण कार्यकर्त्यात असणे गरजेचे असते. भाषेतील संवाद पूर्ण झाल्यावर व्याकरणातल्या वाक्याची गरज संपते, तसेच सत्ता आल्यावर राजकारणातल्या कार्यर्त्याची गरजही संपुष्टात येते.
राजकारणात दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात. केवळ आपले हितसंबंध जोपासण्यासाठी राजकारणात आलेले आणि निष्ठा, विचार, ध्येय धोरणांमुळे पक्षासाठी काम करणारे…यात पहिल्या प्रकारच्या कार्यकर्त्यांचे यथावकाश नेत्यांमध्ये रूपांतर होते तर दुसर्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना निष्ठेच्या नावाखाली तडजोड क्रमप्राप्त असते. कार्यकर्त्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पक्षाने केलेले राजकारण ही चळवळ वाटत असते. पक्षाला ध्येय धोरणे असल्याचे कार्यकर्त्याला कायम ठामपणे सांगितले जाते. त्यासाठी अस्मिता, इतिहास, परंपरा, संस्कृती, निष्ठा असे काहीबाही शब्दांचे दाखले दिले जातात.
कार्यकर्त्यांना या सगळ्याचा अभिमान असतो. बरेचदा आपल्या दुचाकीवर हा अभिमान स्टीकर पट्ट्यांनी लिहून मिरवला जातो. निवडणुकांच्या काळात कार्यकर्त्याचं कार्य हे त्याचं दक्ष कर्तव्य बनलेलं असतं. या कर्तव्यापुढे इतर सगळ्याच कर्तव्यांना किंमत नसते, तशी कार्यर्त्यांनाही किंमत नसते. निवडणुकीत किंमत मतदारांना असते. त्यामुळे अशी किंमत मतदारांपर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्नात कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात. कार्यकर्त्यांनी असे गुन्हे पक्षासाठी काम केल्याची पोचपावती म्हणून अभिमानाने मिरवायची असते.
राजकारणात नेत्यांची फळी असते, तर ही फळी ज्या पायावर उभी असते त्या पायाशी कार्यकर्ता असतो. राजकारणाचा फळीदार डोलारा कार्यकर्त्यावरच उभा असतो. त्यामुळे हा कार्यकर्ता दर्शनी स्टेजवर दिसत नाही, तो स्टेजच्या मागे किंवा बरेचदा खालीच असतो. पक्षाच्या मंचावर मान्यवर नावाची माणसे असतात. त्यांचा पोडीयम उचलणे, माईक सेट करणे, नेते-पदाधिकार्यांच्या नाष्टा जेवणाची सोय करण्याची महत्त्वाची कामे कार्यकर्त्यांना करावी लागतात.
रिकाम्या खुर्च्यांवर बसण्यासाठी माणसे मागवणे, आपल्या लोकप्रतिनिधीची ताकद पक्षनेतृत्वाला दाखवण्याची बहुमोल जबाबदारी कार्यकर्त्यांवर असते. अशा कार्यकर्त्याला सतरंजी उचलण्यापुरते संबोधून त्यांचा अवमान विरोधी गटाकडून केला जातो, त्यावेळी स्थानिक नेत्यांकडून पक्षनेतृत्वाचे जोडेही उचलले गेल्याचे पाहून सतरंजी उचलणार्या कार्यकर्त्यांना सुखद दिलासा मिळालेला असतो. कार्यकर्त्यांनी मागणी करायची नसते.
मागणी करण्याला पक्षद्रोह, गद्दारी किंवा बंडखोरीचे नाव दिले जाते. मागणी केल्यास कितीही दिले तरी रडतात, अशी अवहेलना कार्यकर्त्यांना नेत्यांकडून बरेचदा ऐकावी लागते. निवडणुकीचे दिवस कार्यकर्त्यांसाठी कमावण्याचे दिवस असल्याचे त्यांना पक्षातील वरिष्ठ हितचिंतकांकडून सांगितले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे महत्त्व निवडणूक काळात कमालीचे वाढलेले असते. पक्षांतरात जेवढे कार्यकर्ते सोबत येतात त्या प्रमाणात नेत्याची ताकद मानली जाते.
त्यामुळे नेत्यांना त्यांच्या मागेपुढे कार्यकर्त्यांची फौज बाळगावी लागते, परंतु ही फौज माध्यमांच्या कॅमेरा फोटोत येणे हा नेत्यांचा उपमर्द असतो. त्यामुळे असे कार्यकर्ते फोटोवेळी खड्यासारखे बाजूला काढले जातात. त्यांना लाथ मारली जाते किंवा हात धरून मागे सारले जाते. नेते याला राजशिष्टाचार म्हणतात. वापरा आणि फेकून द्या, हा धडा कार्यकर्त्यांनी नेत्यांकडूनच शिकलेला असतो. हेच धडे गिरवत एखाद्या संयमी कार्यकर्त्याचा यथावकाश नेता बनतो.
कार्यकर्त्यापासून नेता बनलेल्या या नेत्यामागेही पुन्हा कार्यकर्ते उभे राहतात. पुन्हा त्यांनी फळाची अपेक्षा न करता कर्म करायचे असते आणि कर्ता म्हणून केवळ नेत्यांना पुढे करायचे असते. ही क्रिया कार्यकर्ता नेतेपदाला पोहचेपर्यंत चक्राकार गतीने अशीच सुरू असते. भाजपचे रावसाहेब दानवे यांनी याची एक झलक नुकतीच दाखवली. त्यांच्या लाथेचे कार्यकर्त्याने हसून स्वागत केले.