Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयअग्रलेखMaharashtra Election 2024 : भाजपच्या मानगुटीवर मुस्लीम भयाचे भूत

Maharashtra Election 2024 : भाजपच्या मानगुटीवर मुस्लीम भयाचे भूत

Subscribe

लाडकी बहीण योजनेने सत्ताधारी महायुतीला विधानसभा निवडणुकीत बर्‍यापैकी सावरले असले तरी मुस्लीम समाजाने महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीचे नेते अस्वस्थ झालेले आहेत. केवळ मुस्लीम मतदार आपल्याजवळ नसल्याने सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास गमवावा लागू शकतो, याची कल्पना महायुतीला विशेषत: भाजप श्रेष्ठींना आली आहे. म्हणूनच आता मुस्लीम मतदारांच्या एकजुटीला आव्हान देण्यासाठी भाजपने हिंदू मतदारांचे एकत्रिकरण सुरू केले आहे.

याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठिकठिकाणच्या सभेत ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ चा नारा दिला. नरेंद्र मोदी हे कुठल्या एका धर्माचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आणि योगी आदित्यनाथ हेदेखील संविधानिक पदावर आहेत. त्यामुळे या दोघांनी अशी वक्तव्ये करावीत का, हादेखील वादाचा मुद्दा आहे. मात्र या विधानांना भाजपमधूनच विरोध सुरू झाला आहे.

- Advertisement -

ज्यांना सर्वच धर्मियांची मते मिळतात, त्या पंकजा मुंडे यांनी या विधानांना स्पष्टपणे विरोध केला आहे. महाराष्ट्रात असे मुद्दे आणायची गरजच नाही, अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे. खरे तर, महाराष्ट्रातील काही ठराविक मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदार निर्णायक भूमिका बजावत असतात. अशा ठिकाणी मुस्लीम समाजाने एकत्र येऊन एकगठ्ठा मतदान केल्यास, त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होतो, हे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.

धुळे लोकसभा निवडणुकीत तर पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे पुढे होते, मात्र मुस्लीमबहुल असलेल्या मालेगाव विधानसभा मतदारसंघाने डॉ. भामरेंच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला आणि या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. याशिवाय अन्य अनेक ठिकाणी मुस्लीम मतदारांचा फटका भाजपसह महायुतीला बसला. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कृत्याला ‘व्होट जिहाद’ असे संबोधले आहे.

- Advertisement -

मुस्लीम समाजाच्या मशिदींमध्ये महाविकास आघाडीला मत देण्याचे फतवे निघाले आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर, मतदानाच्या दिवशी जेथे नियोजित विवाह वा अन्य कार्यक्रम होते तेदेखील काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत, अशी फडणवीसांची माहिती आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत, मुस्लीम मतदार जर पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना समर्थन देऊ लागले, तर त्याचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

विशेषत: शहरी भागांमध्ये, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (उद्धव गट) महाविकास आघाडीचा जोर अधिक आहे, अशा ठिकाणी मुस्लीम मतदार निर्णायक ठरू शकतात. भाजपसाठी महाराष्ट्रातील काही भागांत मुस्लीम समाजाचे ध्रुवीकरण मोठे आव्हान ठरते. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि विदर्भातील काही शहरी आणि निमशहरी भागांमध्ये मुस्लीम मतदार निर्णायक ठरतात. जर मुस्लीम समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, तर भाजपचे गणित कोलमडू शकते.

त्यासाठीच मोदींना हिंदू मतदारांना एकत्र आणण्यासाठी बटेंगे तो कटेंगेचे आवाहन करावे लागत आहे. याचा उद्देश स्पष्ट आहे. मुस्लीम समाजाच्या एकजुटीला हिंदू मतदारांच्या अधिक मोठ्या एकजुटीने प्रत्युत्तर देणे. या वक्तव्यातून हिंदू मतदारांना संबोधित करण्याचा हेतू दिसून येतो. हिंदू समाज अनेक जाती, पोटजाती आणि सांस्कृतिक गटांमध्ये विभागलेला आहे.

मात्र, भाजपच्या राजकारणातील एक प्रमुख ध्येय हिंदू मतदारांची जातीय भेदभाव न करता एकजूट साधणे हे आहे. भाजपला ठाऊक आहे की, मुस्लीम समाजाच्या एकगठ्ठा मतदानामुळे महाविकास आघाडीला वाढत चाललेल्या पाठिंब्याला उत्तर म्हणून हिंदू मतदारांची एकजूट हाच प्रभावी मार्ग ठरू शकतो. या ध्येयासाठी ‘एक है तो सेफ है’ ही कल्पना पुढे केली जात आहे.

ध्रुवीकरण हे भारतीय राजकारणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. 1980 च्या दशकापासून बाबरी मशीद-रामजन्मभूमी विवाद, गुजरातचे 2002 मधील दंगे आणि त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये धर्माच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण होत आले आहे. बटेंगे तो कटेंगे हे विधान हा ध्रुवीकरणाच्या प्रयत्नाचा भाग आहे. हिंदू मतदारांना ‘धर्माच्या आधारावर एकत्र राहिल्यानेच सुरक्षितता आणि स्थैर्य मिळेल’, हा संदेश देणे, ही या घोषणेमागील कल्पना आहे.

मोदींनी या विधानातून मुस्लीम समाजाच्या एकगठ्ठा मतदानावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे आणि हिंदू मतदारांना त्याचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्याचा परिणामही आता वेगवेगळ्या मतदारसंघात दिसत आहे. आजवर भाजपला नाकारणारे मतदारही मुस्लिमांनी ठरवलेला आमदार नको म्हणून एकत्र येत आहेत. महाराष्ट्रातील हिंदू समाज अनेक जातीय विभागांमध्ये विभागलेला आहे. मराठा, ओबीसी, दलित, वंजारी, धनगर आणि इतर. भाजपला माहिती आहे की, या गटांमध्ये एकता नसेल, तर मुस्लीम मतदारांचा प्रभाव अधिक तीव्र होईल.

‘एक है तो सेफ है’ या विधानातून भाजप हिंदू समाजातील जातीभेद दूर करून एकत्र येण्याचे आवाहन करत आहे, मात्र यामुळे निवडणुकीचे स्वरूप अधिक तीव्र आणि धार्मिक रंगाने रंगण्याची शक्यता आहे. भारतासारख्या बहुविध देशात, अशा रणनीतींमुळे सामाजिक सलोख्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तरीही, निवडणुकीतील राजकीय समीकरणे या घोषणेमुळे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -