महाराष्ट्रात विधानसभेचा प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेससमोर मोठे आव्हान ठेवले. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे, इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार हे राहुल गांधी असल्याचा प्रचार शिवसेनेने केला. शिवसेनेला काँग्रेसबद्दल इतका आपलेपणा वाटत असेल तर काँग्रेस नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी. त्यांच्याविषयी चांगले बोलून दाखवावे.
मुळात काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वर्षानुवर्षे म्हणजे अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासून एकमेकांच्या विरोधात राहिलेले आहे. महाराष्ट्रातील भूमीपुत्रांची काँग्रेसच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारकडून होणार्या उपेक्षेच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झालेली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर नेहमीच सडकून टीका केलेली आहे. आपण काँग्रेससोबत जाणार नाही, तसे करायची वेळ आली तर शिवसेना हा पक्ष मी बंद करेन, असे ते म्हणाले होते.
अर्थात, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी महाविकास आघाडी केली तेव्हा त्यांना पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले हा भाग वेगळा. आता शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले असले तरी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मूळ शिवसेनेचे प्रमुख या नात्याने पाहिले जाते. सध्या शिवसेनेचा कागदोपत्री नसला तरी जन्मजात वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे मोदी आणि शहा यांनी काँग्रेससमोर बाळासाहेबांच्या स्तुतीचे ठेवलेले आव्हान खरोखरच अवघड आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी 12 वा स्मृतीदिन होता. त्यानिमित्त काँग्रेसचे प्रमुख नेते आणि गांधी घराण्याचे वारसदार राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर अगदी अल्पशब्दाचा संदेश दिला आहे. त्यात राहुल गांधी यांनी, बाळासाहेब ठाकरेजी यांचे त्यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त स्मरण करतो. माझे विचार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसेच संपूर्ण शिवसेना परिवारासोबत आहेत, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या या संदेशाचे स्वरूप पाहिल्यावर त्यांनी किती सुरक्षित भूमिका घेतलेली आहे, ते दिसून येईल.
यात त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या कार्याची स्तुती अजिबात केलेली नाही. बाळासाहेबांच्या नावाआधी शिवसेनाप्रमुख असेही संबोधलेले नाही. खरे तर आता बाळासाहेब ठाकरे यांचे देहावसान होऊन बारा वर्षे झाली आहेत, त्यामुळे आता या सांत्वनाच्या सुरापेक्षा त्यांच्या कार्यासंबंधी किंवा काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये नव्याने जुळून आलेल्या नात्यासंबंधी त्यांनी बोलणे अपेक्षित होते. त्यांनी बाळासाहेब आम्ही तुमचे स्मरण करतो, असे म्हटले आहे, पण कशासाठी हे स्पष्ट केलेेले नाही. ते केले असते तर शिवसेनेशी नव्याने जुळलेल्या नात्याविषयी त्यांना काय वाटते हे लोकांना कळले असते.
एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची लोकसभा निवडणुकीत जोरदार स्तुती केलेली दिसून आली. कारण त्यांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार खाली खेचायचे होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी राहुल गांधी यांचा जो जोरदार प्रचार केला, त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा काँग्रेसला फायदा झाला. कारण शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सगळ्यात जास्त 13 जागा निवडून आल्या.
मोदींचे सरकार जाईल आणि इंडिया आघाडीचे सरकार येेईल, असे ठाकरे गटाला वाटत होते, पण तसे झाले नाही, उलट, कॉँग्रेसच्या भरघोस यशामुळे राज्य स्तरावर ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. कारण महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीही नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेत काँग्रेसला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीत त्यांचा प्रभाव आपोआप वाढणार आहे.
त्यामुळे ते म्हणतील, तसे मित्र पक्षांना ऐकावे लागणार आहे, त्यामुळे इथेच ठाकरे गटाची कोंडी झालेली आहे. ज्याचे जास्त आमदार निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री असे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे म्हणणे आहे, पण हे ठाकरे गटाला मान्य नाही.
कारण केंद्रात राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी ठाकरे गटाने जोरदार पाठिंबा दिला, आता राज्यपातळीवर काँग्रेसने तशीच भूमिका घेऊन मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावे, असा एकूणच ठाकरे गटाचा सूर आहे, पण त्याला राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस तयार होईल, असे वाटत नाही. त्यामुळे मागे एका संयुक्त सभेत तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते, पण त्यांच्या बोलण्यातला राग काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या लक्षात आला असावा, म्हणून ते त्याविषयी काही बोलले नाहीत.
महाराष्ट्रात ठाकरे गटाला दुखवून चालणार नाही, हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरेंबाबत सावध भूमिका घेतली. राहुल गांधी यांनी जो संदेश दिला आहे, त्यातूनही तशीच सावध भूमिका दिसून आलेली आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती टाळली आहे. कारण त्यांनाही काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवायचा आहे.