ठाणे अमली पदार्थविरोधी शाखेने अमली पदार्थांच्या तस्करी आणि निर्मितीचा छडा लावण्याचे काम सुरू केले आहे. ठाण्यात पोलिसांनी २ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त किमतीचे मॅफेड्रॉन आणि गांजा असा अमली पदार्थ नुकत्याच केलेल्या कारवाईत जप्त केला. ठाणे आणि मुंबई तसेच पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात अमली पदार्थ पोहचवले जात होते. त्यासाठी ड्रग्ज माफियांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे काम व्हायला हवे. मुंबई, ठाणे आणि रायगड तसेच पालघर परिसरात अमली पदार्थांची केंद्र होऊ पाहत आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
ठाणे आणि पालघर तसेच रायगड हे जिल्हे महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात जाण्यासाठी समुद्रकिनारा, रस्ते, रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहेत. येथून महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्यात जाता येणे शक्य आहे. त्यामुळे परराज्यात बनवलेले अमली पदार्थ तस्करीच्या मार्गाने महाराष्ट्रात आणले जात असल्याचे पोलिसांच्या अलीकडच्या कारवाईत स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्याची ओळख मुख्यमंत्र्यांचे ठाणे अशी होती. आज ती उपमुख्यमंत्र्यांचे ठाणे अशी जरी असली तरी महाराष्ट्रातील महत्त्वाचे असे सत्ताकेंद्र या जिल्ह्यात आहे. येत्या काळात स्मार्ट सिटी, मेट्रो असे महत्त्वाचे प्रकल्प या जिल्ह्यात होतील. त्यामुळे ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. सांस्कृतिक आणि राजकीय ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याची ओळख अमली पदार्थांमुळे बिघडत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
ठाण्यातील अलीकडच्या काळात एमडी, इतर अमली पदार्थ, बेकायदा विक्री होणारे कफ सिरप, गांजा, गुटखा आणि दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी कारवाईला वेग देण्याची गरज आहे. मुंबईनंतर ठाण्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ठाणे शहर आणि जिल्हा तसेच ग्रामीण भागातही शाळा, महाविद्यालयात शिकणार्या तरुणांची संख्याही वाढत आहे. रायगडमधील कर्जत, वांगणी हा भाग अभियांत्रिकी महाविद्यालयांमुळे शैक्षणिक केंद्र म्हणून आकाराला येत आहे. अशा परिस्थितीत येथील तरुणाईची काळजी घेण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या बाहेर या अमली पदार्थांच्या प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच पावले उचलावीत. यासाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या या प्रयत्नांना इतर ठाणे आणि लगतच्या जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देऊन अमली पदार्थविरोधी मोहिमेत सहभाग घ्यायला हवा.
पालघर जिल्हा समुद्रकिनारा आणि गुजरात राज्याच्या लगतच असल्याने या जिल्ह्यावर मोहिमेदरम्यान विशेष लक्ष द्यायला हवे. दमण भागातून होणारी मद्याची आणि गुजरात राज्यातील अमली पदार्थविरोधी कारवायांनी महाराष्ट्रातील अमली पदार्थविरोधी तपास यंत्रणांनी सतर्कता बाळगायला हवी. अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीचे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. कोट्यवधींचे अमली पदार्थ सापडत असताना आणि यात होणार्या कारवाईतील सातत्यामुळे हा भीतीदायक संशय खरा असल्याचे स्पष्ट व्हावे. ठाणे आणि परिसरातील अमली पदार्थविरोधी कारवाया पाहता मुंबई आणि ठाणे परिसरातील हा धोका राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी वेळीच ओळखायला हवा. मुंबई तसेच ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर महानगरातील आर्थिक सुबत्ता पाहून ड्रग्ज माफियांनी या शहरांतील तरुणांना लक्ष्य केले आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारातून निर्माण होणारी गुन्हेगारी ही वेगळी चिंता आहे.
अमली पदार्थ निर्मितीचे केंद्र जरी राज्याबाहेर असले तरी त्याच्या विक्रीचे जाळे महाराष्ट्रात पसरत आहे. हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अगदी तरुणाईच्या कौटुंबिक स्तरापासून प्रयत्न व्हायला हवेत. तरुणांना अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम समजावण्यासह अमली पदार्थविरोधी मोहिमेत तरुणाईचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी सरकारी, संस्थात्मक पातळीवर योजना, मोहीम आणि उपक्रम राबवणे गरजेचे झाले आहे. या अमली पदार्थांच्या तस्करीचा धोका संसदेत चर्चिला गेला आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने भिवंडीत कारवाई करून ८०० कोटींचा ७९२ किलोचा लिक्विड एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. मात्र या कारवाईतील सूत्रधार अद्याप समोर आलेला नाही.
खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात ड्रग्ज प्रकरणातील धोक्याचे गांभीर्य समजून घ्यायला हवे. यातील आरोपी कारवाई झाल्यानंतरही जामीन किंवा कायद्यातील पळवाटांमधून सुटल्यानंतर चोरी, धमकी, खंडणी, जमिनी बळकावणे अशा गंभीर गुन्ह्यात आढळत आहेत. या गुंडांमागे असलेल्या राजकीय शक्तींबाबत खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केलेली चिंता राज्यातील राजकारणाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करत आहे. या राजकीय पाठिंब्यामुळे पोलिसांना कारवाई करताना अडचणी येत असल्याचे खासदार म्हात्रे यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील डायघर, भिवंडी, कल्याण, दिवा, डोंबिवली तसेच कल्याण परिसरात अमली पदार्थविक्रीचे जाळे फैलावले आहे. हा धोका पाहता अमली पदार्थांचे हे जाळे नष्ट करण्यासाठी पोलीस, तरुण-तरुणी, त्यांचे पालक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि सरकारी यंत्रणांनी एकत्र प्रयत्न करणे ही गरज बनली आहे.