महाराष्ट्रासमोर जीबीएस ‘गुएलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचे आव्हान असले तरी रुग्ण बरे होण्याची वाढती संख्या ही दिलासा देणारी आहे. कोविड काळात व्यक्तीगत स्वच्छतेबाबत सजग असलेले नागरिक मास्कबंदी उठल्यानंतर आणि लस घेतल्यावर काहीसे निष्काळजी झाले होते, मात्र आता पुन्हा विशेषतः पिण्याचे पाणी, अन्न आणि व्यक्तीगत स्वच्छतेबाबत पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे, परंतु संसर्गाचे प्रमाण कोविडइतके नसल्याने आणि रुग्ण बरे होण्याची संख्या पाहता घाबरून न जाता सरकारच्या आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. सोबतच सरकारी यंत्रणाही सतर्क झाल्या असून त्यांना सहकार्याचीच भूमिका नागरिकांनी घ्यायला हवी.
‘जीबीएस’ आजाराचे रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षणासाठी आठ रुग्णालय झोन तयार करण्यात आले आहेत. तसेच १६ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी शनिवारचा दिवस मावळेपर्यंत जवळपास दहा हजार संशयित घरांची तपासणी केली. त्यात या आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याने ही दिलासा देणारी बाब आहे, परंतु त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेच्या सूचना टाळता कामा नयेत. दूषित पाण्यातून या आजाराचा फैलाव होत असल्याची दाट शक्यता असल्याने पाणीपुरवठा करणार्या पालिकांची जबाबदारी वाढली आहे.
पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात या आजाराचे संशयित असे १५ रुग्ण दाखल आहेत. यातील सहा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. इतर रुग्णांचीही प्रकृती स्थिर असल्याने योग्य वेळीच औषधोपचार मिळाल्यास या आजाराला घाबरण्याचे कारण नसल्याने स्पष्ट व्हावे. सोबतच आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. या आजाराबाबत समाजमाध्यमांवर अफवा पसरवणे, दिशाभूल करणारी माहिती देणार्यांना वेळीच रोखायला हवे. त्यामुळे जनजागृतीपेक्षा भीती पसरते आणि बरेचदा आजारापेक्षा आजाराची भीती जास्त धोकादायक ठरते. या आजारावरील औषधे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध आहेत तसेच सरकारच्या आरोग्य सुविधांच्या योजनेतही या आजाराचा समावेश असल्याने नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा आहे. या आजाराला रोखण्यासाठी आठ वैद्यकीय अधिकार्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यात आजारी रुग्णांविषयी सर्वेक्षण, उपचाराबाबत समन्वय, माहितीचे संकलन आणि योग्य उपचार अशी दिशा आहे. या आजाराविषयी योग्य आणि पुरेशी माहिती मिळण्यासाठी हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील विविध महापालिकांनी वेळीच सावध होऊन पाणीपुरवठा आणि स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. येत्या काळात उष्मा वाढेल तशी टँकर्सची संख्याही वाढणार आहे. खासगी ठिकाणाहून प्रक्रिया न करता पाण्याचा उपसा करणारे आणि असे पाणी पुरवणार्या टँकर्सच्या बाबतही हा धोका अधिक आहे. पाणी उकळून आणि गाळून पिण्याची आवश्यकता आहे. अन्न स्वच्छ आणि ताजे असायला हवे. दूषित किंवा बाहेरचे अन्न टाळायला हवे. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यायला हवा. हा आजार हवेतून फैलावण्याचे प्रमाण स्पष्ट नाही, परंतु अन्नपाण्यातून या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. परिणामी त्याबाबत काळजी घ्यायला हवी.
कच्चे मांस टाळावे. शिजलेले ताजे आणि गरम अन्न खावे. शिजवलेले अन्न आणि न शिजवलेले अन्न एकत्र ठेवता कामा नये. दूषित पाण्यातून संसर्गाची शक्यता लक्षात घेता उकळलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. सोबतच दूषित थंड पाणी टाळायला हवे. आजाराची लक्षणे दिसताच वेळीच वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. हातापायांना मुंग्या येणे, अन्न गिळण्यास त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास अडथळा येणे, जुलाब अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. या आजारावर उपचार शक्य आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये. सर्व प्रकारच्या वयोगटात या आजाराची लक्षणे आढळू शकतात, मात्र अत्यल्प रुग्णांमध्ये आजाराची तीव्र लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे भीती न बाळगता व्यक्तीगत स्वच्छता आणि पाणी तसेच अन्नसेवनाविषयी काळजी घेण्याची गरज आहे.
पुणे वगळता महाराष्ट्रात अद्याप या आजाराचा संसर्ग समोर आलेला नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच काळजी घेण्याची गरज आहे. ठाणे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागात खासगी टँकरचे पाणी मागवले जाते. असे दूषित पाणी पिण्यासाठीही वापरले जाते. दूषित पाणी स्वच्छ पाण्याच्या संपर्कात येता कामा नये. येत्या काळात राज्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यावेळी टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पालिकांची जबाबदारी वाढणार आहे. अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये टंचाईच्या काळात खासगी पद्धतीने पाणी मागवले जाते. यावेळी अशा पाण्याचा उपसा आणि साठवणूक करताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही. या पाण्याचे नमुने तपासणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत या आजाराविषयी संशोधन केले जात आहे. तोपर्यंत व्यक्तीगत स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.
देशाच्या विविध भागात या आजाराचे संशयित रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, राजस्थानातही संशयित रुग्ण आढळले आहेत. पिण्याच्या पाण्यावर क्लोरिन प्रक्रिया करणे आवश्यक झाले आहे. ही प्रक्रिया करतानाही त्यात कुठलाही निष्काळजीपणा आजाराचा संसर्ग वाढवू शकतो. राज्यातील पाणीपुरवठा प्रकियेशी संबंधित विभागांनी वेळीच योग्य दिशेने काळजी घेतल्यास या आजाराला वेळीच रोखता येईल. पाण्याच्या स्वच्छ शुद्धिकरण प्रक्रियेतील निकषांचे पालन करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी पातळीवर धोरणात्मक कार्यवाही व्हायला हवी. या आजाराला कारण असलेला बॅक्टेरिया प्राथमिक संशोधनाच्या स्तरावर असल्याने आजाराची शक्यताच रोखता यायला हवी. या बॅक्टेरियाच्या संक्रमणाची ठिकाणे आणि त्याचा संसर्ग याविषयी अभ्यास केला जात आहे. येत्या काळात याबाबत अधिक माहिती स्पष्ट होईल. तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. पुरेशी झोप, बाहेरील अन्नपाणी टाळणे तसेच स्वच्छता अंगीकारून या आजाराला रोखता येईल.