Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयअग्रलेखDhananjay Munde Resign : अखेर मुंडेंवर हातोडा पडला!

Dhananjay Munde Resign : अखेर मुंडेंवर हातोडा पडला!

Subscribe

9 डिसेंबर 2024. याच दिवशी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणप्रकारे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ट्वीट करून मुंडे यांनी त्याला सद्सद्विवेक बुद्धीचीही जोड दिली आहे. आजारपणाचे कारण सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे. हत्या आणि राजीनामा या दोन दिवसांमधील अंतर आहे तब्बल 85 दिवसांचे.

म्हणजे मुंडे यांची सद्सद्विवेक बुद्धी तब्बल 85 दिवसांनी जागी झाली म्हणावी लागेल. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून मुंडे यांच्यावर वारंवार आरोप केले जात होते. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हत्येनंतर 21 दिवस फरार होता. त्याने 31 डिसेंबर 2024 रोजी पोलिसांसमोर शरणागती पत्करली, मात्र या प्रकरणात तो मी नव्हेच अशी भूमिका घेत मुंडे यांनी राजीनामा देण्यास पहिल्यापासून नकार दिला होता.

शिवाय त्यांना त्यांचे पक्षनेते अजित पवार यांनी दिलेली साथ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोयीस्कर मौन यामुळे त्यांना कुणीही हात लावत नव्हते. नवीन सरकारच्या स्थापनेपासून एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी दाखवल्यामुळे अजित पवार यांना दुखवून चालणार नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत होते. त्यामुळे मुख्यमंत्री असूनही धनंजय मुंडे यांचा विषय त्यांनी अजित पवार यांच्यावर सोडून दिला होता. अखेर धनंजय मुंडेंवर हातोडा पडला आणि अनेकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण पहिल्यापासूनच लावून धरले होते. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुंडेंविरोधातील पुरावे दिले होते. शिवाय मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर सर्व पुरावे पाठवल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कायम मुंडेंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून पूरक माहिती समोर आणली.

मनोज जरांगे यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यामुळे महायुतीची होत असलेली बदनामी लक्षात घेत अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी बेल्स पाल्सी आजार झाल्याचे सांगून या आजारामुळे सध्या सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही, असे सांगितले होते. असे होते तर त्याचवेळी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन विश्रांती आणि उपचार करणे योग्य ठरले असते. पण मंत्रिपदाच्या बळावर खूप काही करण्याची त्यांची ऊर्मी या निमित्ताने ठळकपणे दिसून आली.

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो पाहिल्यानंतर हत्या करणारी माणसे नव्हती तर हैवान होती, हे स्पष्ट होते. असे असतानाच 50 दिवस मौन बाळगलेले महंत नामदेव शास्त्री अचानक मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. एवढेच नाही तर ज्या लोकांनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली? कारण अगोदर त्यांना मारहाण झाली होती, असे वक्तव्य करून महंतांनी नव्या वादाला तोंड फोडले आणि स्वत:चीच कोंडी करून घेतली. वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप झाला.

याबाबत सीसीटीव्ही फुटेजची मागणी झाल्यावर कराड असलेल्या जेलमधील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आली. हे कमी म्हणून की काय एसआयटी-सीआयडी चौकशी सुरू असूनही 85 दिवसांत आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एवढे होऊनही मुंडे राजीनामा का देत नव्हते, पक्षप्रमुख अजित पवार त्यांना राजीनामा देण्यास का सांगत नव्हते, मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा का घेत नव्हते, हे अजूनही कोडे आहे. हे प्रकरण काही केल्या थंड होत नाही हे पाहून नंतर अजित पवार यांनी मुंडे यांच्याबाबत नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला होता.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना सद्सद्विवेक बुद्धी जागी झाल्याचा उल्लेख केला. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागी झाली नाही, देशमुख यांची मुलगी पोरकी झाली तेव्हा सद्सद्विवेक बुद्धीची आठवण झाली नाही, देशमुखांच्या हत्येनंतर न्यायासाठी झगणारा त्यांचा भाऊ धनंजय देशमुख मुंडेंना दिसला नाही, कराडने खंडणी वसुलीसाठी केलेल्या प्रतापांमुळे यांची सद्सद्विवेक बुद्धी जागी झाली नाही. हा सगळा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील जनता दुधखुळी समजण्यासारखे झाले. मुंडेंवर अनेक आरोप होत आहेत.

ज्या आबादा कंपनीच्या खंडणीतून पुढे विरोध करताना संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाल्याचा गंभीर आरोप आहे. या बैठकीला कराड आणि इतर आरोपी उपस्थित असल्याचा आरोप आहे. हे आरोप अजूनही मुंडे यांनी फेटाळले नाहीत. आता धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला खरा, मात्र ती केवळ औपचारिकता ठरू नये. कारण यापूर्वी राजीनामे देऊन पुन्हा मंत्री झालेले नेते आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत.