HomeसंपादकीयओपेडCyber Crime : सायबर ठगांच्या भूलथापांनी अनेकांची फसवणूक!

Cyber Crime : सायबर ठगांच्या भूलथापांनी अनेकांची फसवणूक!

Subscribe

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आता सगळ्यांनी सजग राहायला हवे. अशी वेळ आल्यास त्याचा संयमाने सामना करणे गरजेचे आहे. समोरून एखाद्याने कोणत्याही भूलथापा मारल्यास त्या कितपत खर्‍या आहेत याचा शोध आधी घेणे गरजेचे आहे. कोणतीही वीज कंपनी घरी येऊन नोटीस दिल्याशिवाय वीज कधीच कापत नाही. डिजिटल अ‍ॅरेस्ट कधीच होत नाही. अटक ही प्रत्यक्षपणेच होते. केवायसी ही प्रत्यक्षपणे बँकेतच होते. आयकर विभागाकडे संबंधितांच्या बँकेची माहिती असते. ते कधीच फोन करून पैसे पाठवत नाहीत. इतका शहाणपणा बाळगल्यास ऑनलाईन फसवणूक टाळणे शक्य आहे. अशा प्रकारचे फोन कॉल्स आले तर नजीकच्या सायबर पोलिसांना याबाबतची माहिती जरूर द्यावी, जेणेकरून अशांना वेळीच ट्रॅप करणे त्यांना शक्य होईल.

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता बँक खात्यांमध्ये पैसे ठेवणे सध्याच्या घडीला खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणारे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार पाहता बँकेत अधिक पैसेच न ठेवलेले बरे, असे सध्याच्या घडीला अनेकांना वाटू लागले आहे. विविध कारणाने होणारे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार एखाद्याचा लाखोंचा बँक बॅलन्स अगदी पुढच्या घडीला चक्क शून्यावर आणून ठेवत असल्याच्या विचित्र घटना घडत आहेत.

आपल्या लाखोंच्या बँक बॅलन्सचे क्षणार्धात होत्याचे नव्हते कसे झाले, याची उत्तरे अनेकांना शोधूनही सापडत नाहीत. विशेषत: यामध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. वृद्धापकाळातील आपल्या आयुष्यासाठी जमा केलेले अनेक वर्षांपासूनचे धन हे अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून सायबर ठग असे काही परस्पररित्या लांबवतात याचा त्यांना काही थांगपत्ताच लागत नाही. केवळ ज्येष्ठच नाही तर अगदी तरुणांपासून ते स्त्रियांपर्यंत सर्वांच्याच बाबतीत अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत.

आपल्याकडे पूर्वीपासूनच पैसे हे बँकेतच ठेवले जातात. आवश्यक खर्चासाठीचे पैसे हे घरात ठेवले जातात, मात्र बाकी सर्व पैसे हे सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशानेच हे पैसे बँकेत ठेवले जातात. पूर्वी ऑनलाईन बँकिंग व्यवहारांची सुविधा काही उपलब्ध नव्हती. बँक सुरू असलेल्या दिवशीच सर्व व्यवहार व्हायचे. बँकांमध्ये ठेवलेला पैसा हा वर्षानुवर्षे सुरक्षितच असायचा. केवळ बँकेतून काढून आणताना त्यावर कोणी डल्ला मारू नये याची खबरदारी घ्यावी लागत असे.

कालांतराने ठिकठिकाणी एटीएमची सुविधा आली. बँकेतून पैसे काढणेही कमी झाले. ठिकठिकाणी एटीएम कार्डद्वारेही व्यवहार होऊ लागले. रोखीचे व्यवहार आणखी घटले. अलीकडच्या काळात तर डिजिटल यूपीआय पेमेंटची सुविधा आल्यानंतर बहुतांश ठिकाणी ऑनलाईनद्वारेच व्यवहार होत आहेत. बहुतांश व्यवहार ऑनलाईन होत असल्याने वेळ वाचत आहे, परंतु हे व्यवहार करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. खबरदारी न घेतल्यास याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

ऑनलाईन व्यवहारादरम्यान आपल्या बँक खात्याचा डेटा लीक न होऊ देणे, आपला पासवर्ड कोणालाही शेअर न करणे, ओटीपी न देणे आदी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा बँकेतील सुरक्षित पैसे कधी सायबर ठग लांबवतील हे कळणारसुद्धा नाही. बँकेतील पैसा हा सुरक्षितच असतो, परंतु ऑनलाईन व्यवहारादरम्यान योग्य खबरदारी न घेतल्यानेच सायबर ठगांचे फावते. ऑनलाईन व्यवहारांचे अ‍ॅप काम झाल्यानंतर तातडीने लॉग आऊट करून बंद करणे गरजेचे असते. न केल्यास डेटा लीक होण्याची भीती असते.

आपण लॉग आऊट न केल्यास संबंधित अ‍ॅप हे ठराविक काळानंतर आपसूकच लॉग आऊट होतात, परंतु यामध्ये जो वेळ असतो, त्याचदरम्यान डेटा लीक होण्याची शक्यता अधिक असते. डेटा लीक होणे ही ऑनलाईन फसवणुकीची प्रथम पायरी आहे. सायबर ठग हे अशाच प्रकारे संधी साधून सर्वप्रथम एखाद्याचा डेटा लीक करून माहिती मिळवतात. संबंधिताच्या बँक खात्यात किती बँक बॅलेन्स आहे. त्याचे व्यवहार कोणकोणत्या ठिकाणी होत आहेत, याची इत्थंभूत माहिती मिळवतात.

त्याला कसे लुबाडावे, याची पुरेपूर योजना ते आखतात. एखाद्याने ऑनलाईन व्यवहार करून अलीकडच्या काळात आपले वीज देयक भरलेले असल्यास त्याला फसविण्यासाठी सायबर ठग हे संबंधिताला फोन करून आपले वीज देयक प्रलंबित असल्याचे भासवतात. आपण ज्याठिकाणी वीज देयक भरत आहात ते चुकीच्या ठिकाणी जात असून तुमची थकबाकी ही मोठ्या प्रमाणात आहे. ती तातडीने ऑनलाईन न भरल्यास वीज कापण्याच्या भूलथापाही मारतात. त्यांना तातडीने पैसे पाठविण्यास प्रवृत्त करतात. संबंधितांना एखादी लिंक पाठवून तेथेच पैसे भरण्यास सांगितले जाते.

सायबर ठग इतके हुशार असतात की चोरलेले फोटो वापरून, काल्पनिक ओळख पटवून देणारे प्रोफाइल तयार करीत आपणच संबंधित वीज कंपन्यांचे अधिकारी आहोत असे समोरच्याला भासवतात. फसवणूक करणारे डेटिंग प्लॅटफॉर्म आणि सोशल नेटवर्क्सचा वापर इतक्या सराईतपणे करतात की एखाद्या कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ कुठले आणि बनावट कुठले हेदेखील समोरच्याला ओळखणे कठीण होऊन बसते. आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) सोय उपलब्ध झाल्याने सायबर ठगांचे अधिकच फावत चालले आहे.

एआयसह इमेज मॅनिप्युलेशन सॉफ्टवेअरचा वापर करून, अधिक वास्तववादी वातावरण तयार केले जाते. पैशांचा भरणा न केल्यास पुढील कोणत्याही क्षणी तुमची वीज कापली जाईल, असे सांगितले जाते. अनेक रहिवाशांची वीज आम्ही अशाप्रकारे कापल्याचेही त्यांना खोटी चित्रे तयार करून भासवण्यात येते. दिलेल्या लिंकवर ठराविक रक्कम भरण्यास प्रवृत्त केले जाते. ती भरताना ओटीपी विचारून संबंधितांच्या बँकेतील लाखो रुपये इतरत्र वळते केले जातात.

आता तर अनेकदा ओटीपी शेअर केलेला नसतानाही केवळ एखादी लिंक देऊन त्याला बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्या बँक खात्यातील रक्कम लांबवली जाते. केवळ वीज देयकाच्या निमित्तानेच नाही तर तुम्हाला डिजिटली अ‍ॅरेस्ट (अटक) केली जाईल अथवा तुमचा नातेवाईक किंवा कौटुंबिक सदस्य अथवा जवळचा मित्र अडचणीत असून त्याला मदतीची गरज आहे, असे सांगून पैसे लुटण्याचे प्रकार घडत आहेत. कधीकधी तर एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये संबंधिताला सामील केले जाते. त्यांना संबंधित लिंकवर जाऊन प्रश्नांची उत्तरे देण्याचा टास्क दिला जातो. त्यातून फसवणूक केली जाते.

कित्येकदा तर तुमच्याकडे आलेल्या पार्सलमध्ये बेकायदा आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्याचे सांगून चौकशीच्या नावाखाली गंडवले जाते. काहींना तर त्यांच्या बँक खात्यात चुकीने कुणाचे तरी पैसे जमा झाल्याचे सांगून ते पैसे परत करण्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते. केवायसी अपडेटच्या बहाण्याने तसेच आयकर परताव्याच्या नावानेही लूट केली जाते. यंदाच्या वर्षात जवळपास ९ महिन्यात सायबर गुन्हेगारांनी ११ हजार ३३३ कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक आकडेवारी आहे.

भारताच्या सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने याबाबतची आकडेवारी जारी केली असून सर्वाधिक फसवणूकही स्टॉक ट्रेडिंगमध्ये झाल्याचे म्हटले आहे. स्टॉक ट्रेडिंगमधून ४ हजार ६२६ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. गुंतवणूक करण्यास सांगून ३ हजार २१६ कोटी लुबाडण्यात आल्याची आकडेवारी आहे. डिजिटल अरेस्टच्या प्रकरणात १ हजार ६१६ कोटींची फसवणूक झाली आहे.

यंदाच्या वर्षी आतापर्यंत १२ लाख सायबर फसवणुकीच्या तक्रारी आहेत. गेल्या चार वर्षात ३०.०५ लाख तक्रारी दाखल झाल्या असून यात आत्तापर्यंत २७ हजार ९१४ कोटींचे नुकसान झाले आहे. सायबर ठगांकडून होणार्‍या फसवणुकीत यावर्षी ८५ टक्क्यांनी वाढ झाल्याची आकडेवारी आहे. सायबर गुन्हेगार फसवणुकीतून लुटलेले पैसे डिजिटल करन्सी, क्रिप्टो करन्सी, मर्चंट पेमेंट आणि ई वॉलेटच्या माध्यमातून काढतात.

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. एखाद्याने कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही भूलथापा मारल्या तरी आपण सावध राहायला हवे. त्या कितपत खर्‍या आहेत याचा शोध आधी घेणे गरजेचे आहे. कोणतीही वीज कंपनी घरी येऊन नोटीस दिल्याशिवाय वीज कधीच कापत नाही. डिजिटल अ‍ॅरेस्ट कधीच होत नाही. अटक ही प्रत्यक्षपणेच होते. केवायसी ही प्रत्यक्षपणे बँकेतच होते. आयकर विभागाकडे संबंधितांच्या बँकेची माहिती असते. ते कधीच फोन करून पैसे पाठवत नाहीत.

इतका शहाणपणा बाळगल्यास ऑनलाईन फसवणूक टाळणे शक्य आहे. अशा प्रकारचे फोन कॉल्स आले तर नजीकच्या सायबर पोलिसांना याबाबतची माहिती जरूर द्यावी, जेणेकरून अशांना वेळीच ट्रॅप करणे त्यांनाही शक्य होईल. सायबर ठग हे सर्वांच्याच मागे लागत नाहीत. ज्यांच्या बँक खात्यात अधिक पैसे असतात त्यांनाच ते लुटण्याचा प्रयत्न करतात. लाखोंच्या घरात पैसे असलेली खाती लुबाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे मोठे बँक बॅलन्स असलेली खाती शक्यतो ऑनलाईन व्यवहारांसाठी लिंक करू नयेत. त्यांचे व्यवहार थेट बँकेतून केल्यास ते अधिक सुरक्षित ठरतील.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईक
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.