यंदाच्या वर्षी तुळशीच्या लग्नानंतर म्हणजेच साधारणत: रविवार 17 नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरुवात झाली आहे. 15 नोव्हेंबरला तुळशीचे लग्न झाले आहे. त्यामुळे रविवारी 17 नोव्हेंबरपासून सुरू झालेला लग्नाचा हंगाम हा 15 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दिवसात एकूण 16 मुहूर्त आहेत. या मुहूर्त काळात तब्बल 48 लाख जोडपी लग्नबंधनात अडकणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा हा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे. कारण या लग्नसराईच्या काळात देशात सहा लाख कोटींची उलाढाल होणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेकडून जाहीर करण्यात आली आहे.
भारतात विवाहसोहळे एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे केले जातात. पूर्वापार भारतीय संस्कृती, परंपरा यांचे पालन करत साजर्या केल्या जाणार्या विवाह सोहळ्यांचे स्वरूप आता समारंभाकडे झुकताना दिसते आहे. भारतीय लग्न समारंभात असलेल्या अनेक प्रथा-परंपरा पाहता अगदी परदेशांतील नागरिकांनाही भारतीय लग्नाचे आकर्षण असते. या विवाह सोहळ्यात बराच खर्च करून आपल्या कुटुंबाची समाजातील प्रतिष्ठा आणि आर्थिक सामर्थ्य दाखविण्याचा, जपण्याचाच प्रयत्न अनेकदा केला जातो.
खरं तर विवाह सोहळा कसा साजरा करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न. त्यामुळेच प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार विवाहसोहळ्यांचे आयोजन करतो. पण हळूहळू त्यामध्येदेखील सामाजिक स्टेटस, दबाव येताना दिसतो आहे. आई-वडील तर संपूर्ण आयुष्याची कमाई आपल्या मुलांच्या लग्नासाठी खर्च करतात. अनेक जण त्यासाठी कर्ज काढायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. मोठ्या प्रमाणावर होणारे हे भारतीय विवाहसोहळे आपल्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार लावतात. मात्र, या विवाह सोहळ्याचा इव्हेन्ट करताना त्यातील आनंद नाहीसा होणार नाही, याची जबाबदारी आपलीच आहे.
आयुष्यात लग्न एकदाच होते, त्यामुळे खर्च करायला काय हरकत आहे इथपासून ते आपले स्टेटस दाखवण्यासाठी म्हणून किंवा सामाजिक दबावापोटी लग्नावर खर्च करणार्यांची संख्या आता चांगलीच वाढली आहे. त्यातच लग्नाचे वय येईपर्यंत अलीकडे मुलं-मुली चांगले कमावते झालेले असतात. आपल्या लग्नाचा खर्च स्वत:च करण्याइतपत त्यांची सांपत्तिक परिस्थिती असते.
त्यामुळेच लग्नात मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यासाठीदेखील ते आग्रही असतात. त्यासाठी त्यांचा स्वत:चादेखील पुढाकार असतो. डेस्टिनेशन वेडिंग, प्री शूट वेडिंग यादेखील आताच्या काळात आलेल्या लोकप्रिय संकल्पना. त्यासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी असते. पण, आपल्या आयुष्यातला लग्नासारख्या महत्त्वाचा प्रसंग यादगार होईल, याचे संपूर्ण प्रयत्न केले जातात. अगदी कर्ज काढून हा समारंभ साजरा करण्याची आपली तयारी असते.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची जगभरात चर्चा रंगली. या विवाहसोहळ्यावर काही हजार कोटींचा खर्च झाला. या लग्नाच्या निमित्ताने अनेक गोष्टी समोर आल्या. भारतीय विवाह उद्योगाचे मार्केट हे तब्बल 130 अब्ज डॉलर्स आहे. भारतातील लग्न उद्योग हा अमेरिकेच्या बाजारपेठेच्या दुप्पट आहे. भारतीय विवाह उद्योगाचा आकार अमेरिकन उद्योगाच्या (70 अब्ज डॉलर्स) जवळपास दुप्पट आहे. खाद्यपदार्थ आणि किराणा मालानंतरची ही दुसरी सर्वांत मोठी उद्योग श्रेणी आहे.
खाद्यपदार्थ आणि किराणा मालाचा उद्योग 681 अब्ज डॉलर्सचा आहे. एका ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, भारतातील लग्नाची बाजारपेठ अन्न आणि किराणा मालाखालोखाल दुसर्या क्रमांकावर आहे. एका अभ्यासातून समोर आले आहे की, भारतीय कुटुंबे शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च करतात. भारतीय लग्नासाठी सरासरी सुमारे 15 हजार डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 13 लाख रुपये खर्च येतो. विशेष म्हणजे, हा खर्च अगदी शाळेपासून तर मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणावर खर्च केलेल्या रकमेच्या जवळपास दुप्पट आहे.
भारतात विवाहसोहळे अनेक दिवस चालतात. वधू आणि वराच्या कुटुंबीयांकडून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतात विवाहसोहळ्यांना सांस्कृतिक महत्त्व आहे आणि त्यामुळेच विवाहसोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. अनेकदा हा खर्च उत्पन्नापेक्षाही अधिक असतो, असे अहवाल सांगतो.
भारतात दरवर्षी सुमारे 8 ते 10 दशलक्ष (80 लाख ते एक कोटी) विवाहसोहळे आयोजित केले जातात; तर चीनमध्ये 7 ते 8 दशलक्ष (70 ते 80 लाख) आणि अमेरिकेत 2 ते 2.5 दशलक्ष (20 ते 25 लाख) विवाहसोहळे आयोजित केले जातात. ‘WedMeGood’ या भारतीय विवाह नियोजन वेबसाईट आणि अॅपच्या अलीकडील अहवालानुसार, भारतीय विवाह उद्योग वार्षिक सात ते आठ टक्के दराने वाढत आहेत. २०२३ ते २०२४ च्या काळात लग्नाच्या या उद्योगाची उलाढाल ७५ अब्ज डॉलर्सवर गेल्याचा अंदाज आहे.
भारतात ‘लक्झरी वेडिंग’चा ट्रेंड निघाला आहे. भारतातील श्रीमंत आणि प्रसिद्ध लोक विवाहसोहळ्यांवर सरासरी २० लाख ते 30 लाख रुपये खर्च होतो. हा खर्च कोटींपर्यंतही जाऊ शकतो. या खर्चांमध्ये साधारणपणे पाच ते सहा कार्यक्रम, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पाहुण्यांच्या राहण्याची सोय, उत्कृष्ट खानपान, कलाकार आणि सेलिब्रिटींना आमंत्रण अशा सगळ्याच गोष्टींचा समावेश असतो. याशिवाय अलीकडे अनेकांना डेस्टिनेशन वेडिंग हवे असते. यातही राजस्थानच्या शाही महालांना जास्त प्राधान्य मिळते. त्याशिवाय गोव्याचे बीच वगैरे आहेतच.
‘‘WedMeGood’ च्या 2023-2024 च्या वेडिंग इंडस्ट्रीच्या अहवालानुसार, लोक परदेशी जाऊन लग्न करण्यास प्राधान्य देतात. 2022 मध्ये 18 टक्क्यांच्या तुलनेत 2024 मध्ये डेस्टिनेशन वेडिंगचे प्रमाण 21 टक्क्यांनी वाढले आहे. गोवा, उदयपूर, जयपूर, केरळ आणि उत्तराखंड ही ठिकाणे लोकप्रिय आहेत; तर जागतिक स्थळांमध्ये थायलंड, बाली, इटली आणि दुबईला प्राधान्य मिळते. प्रत्येकालाच डेस्टिनेशन वेडिंग किंवा लग्नात मोठा खर्च करणे आवडत नाही. ‘मिंट’च्या वृत्तानुसार 12 टक्के जोडपी अगदी काही लोकांमध्ये छोटेखानी विवाहाला पसंती देतात.
या विवाहाच्या नवीन इव्हेंटमध्ये मोठे आणि लहान असे दोन्ही व्यावसायिक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. भारतात अनेक जाती, धर्म, पंथ असल्याने इथे प्रथा, परंपरांची काहीही कमी नाही. या पारंपरिकतेमुळे आणि त्यासोबतच त्याला दिलेल्या आधुनिक टचमुळे लग्न सोहळे अत्यंत सुंदर असतात. विविध प्रदेश आणि धर्मातील विशिष्ट चालीरितींसाठी स्थानिकांना रोजगार मिळतोच. दागिने, पोशाख, खाद्यपदार्थ, पेये, फोटोग्राफी, लग्नाचे नियोजन, सजावट इत्यादी श्रेण्यांमध्ये लग्नासाठी खर्च होतो. कपड्यांवरील 10 टक्क्यांहून अधिक खर्च लग्नासाठी केला जातो. तर लग्नाच्या खर्चाच्या 20 टक्के खर्च केटरिंगसाठी लागतो. सर्वाधिक खर्च हा सोन्याच्या दागिन्यांमध्ये होतो.
या सगळ्याच गोष्टींमुळे लग्नाची अशी एक स्वतंत्र आणि समांतर अर्थव्यवस्था देशात तयार झाली आहे आणि ती अर्थव्यवस्था खूप मोठी आहे. याशिवाय विवाह व्यवसाय हे अप्रत्यक्षपणे इतर क्षेत्रांनाही मदत करताना दिसतात. कारण, घरातील कार्याच्या निमित्ताने घराचे रुपडे पालटते. घरातल्या अनेक वस्तू नवीन साज लेवून येतात, घराला नवीन रंग काढला जातो. काही कुटुंबे सहसा समारंभाअगोदर घराचे नूतनीकरण करतात. अनेकदा लग्नात या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या जात असल्याने टेलिव्हिजन, स्मार्टफोन आणि गृहोपयोगी उपकरणे यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीत वाढ होते.
यासोबतच लग्न सोहळ्यांमुळे देशातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. आपल्या देशातच एवढी पर्यटन स्थळे असल्याने डेस्टिनेशन वेडिंगला मोठ्या प्रमाणात मागणी असते हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी ‘wed in india’ असा नारा दिला होता. ज्यायोगे देशातला पैसा बाहेर जाणार नाही आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल असेही ते म्हणाले होते.
देशात दरवर्षी जवळपास एक कोटी लग्न समारंभ होतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत देशभरात 35 लाख लग्न समारंभ झाले. या 35 लाख लग्न सोहळ्यांची आर्थिक उलाढाल होती 4.25 लाख कोटी रुपये एवढी! देशातल्या या ‘वेडिंग इंडस्ट्री’चा आकार एवढा मोठा आहे की, दरवर्षी या उद्योगात 8 लाख 36 हजार 420 कोटी रुपयांची उलाढाल होते. सर्वसामान्य भारतीय आपल्या आयुष्यभराच्या कमाईपैकी 20 टक्के रक्कम या दोन ते तीन दिवस चालणार्या विवाह सोहळ्यावर खर्च करण्याच्या तयारीत असतात, असे ही आकडेवारी सांगते. यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे समाजातील आपली प्रतिष्ठा वाढवणे.