नुकताच 19 नोव्हेंबरला जगभरात जागतिक पुरुष दिन साजरा झाला. पण याबद्दल आपल्याकडे कितीजणांना ठावूक आहे हा प्रश्नच आहे. कारण पुरुषांचाही असा काही दिवस असतो हे खुद्द पुरुषांनाच माहीत नाहीये. पुरुषांना अशा कुठल्या तरी सेलिब्रेशन डेची गरज असते हे आपल्याला अपेक्षितच नाहीये. असे डे साजरे करणे हे बायकी काम असून मर्द लोकांना असले वेडचाळे करण्यात स्वारस्य नसते. कारण प्रत्येक दिवस त्यांचाच असतो मग त्यांचे कसले डे अशी आपल्या भारतीय समाजाची मानसिकता आहे. कारण पुरुष तसाच हवा हेच आपल्यावर पिढ्यानपिढ्या बिंबवले गेले आहे. त्यात भरीस भर म्हणजे महिला अत्याचाराच्या सततच्या घटनांमुळे भारतीय पुरुषांकडे बघण्याचा जगाचाच नाही तर आपलाही दृष्टिकोनच बदलला आहे.
भारतीय पुरुष असंवेदनशील, अशिक्षित, वासनांध, क्रूर, स्त्रियांना कमी लेखणारा, अत्याचारी आहे असेच काहीसे चित्र भारतीय पुरुषांबद्दल कायम रंगवले जातंय. पण या सगळ्या दाव्यांना नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालाने जबर धक्का बसला आहे. या अहवालानुसार जगातील इतर देशांतील पुरुषांच्या तुलनेत भारतातील विवाहित पुरुषांचे आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असून फक्त भारतीय महिलाच नाही तर भारतीय पुरुषदेखील कौटुंबिक अत्याचाराला बळी पडतात, असे धक्कादायक वास्तव यातून समोर आले आहे.
यामुळे ज्या पुरुषाला आपण कणखर, मजबूत, अशी अल्फा टाईपची विशेषणं लावून ठेवली आहेत तो प्रत्यक्षात किती तणावात जगतोय, बाहेरच्या जगाबरोबरच कुटुंबातील आव्हाने झेलतोय, त्यात तो कसा भरडला जातोय आणि शेवटी जगण्यापेक्षा मरण त्याला कसं प्रिय झालयं, याचा आरसाच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाने समाजाला दाखवला आहे. ज्याची दखल संपूर्ण जगाने घेतली असून भारतीय पुरुषांची कायम अंधारात असलेली अगतिकतेची दुसरी बाजू या निमित्ताने समोर आली आहे.
याचप्रकरणी महेश कुमार तिवारी या व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली आहे. त्यात देशातील विवाहित पुरुषांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी महिला आयोगाप्रमाणेच देशात पुरुष आयोगाची स्थापना करावी अशी विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या आकड्यांचा हवाला देण्यात आला आहे. या अहवालानुसार 2021 मध्ये 1.64 लाख पुरुषांनी आत्महत्या केली. यातील 81,063 पुरुष हे विवाहित होते. या पुरुषांच्या आत्महत्येची कारणे जरी वेगळी असली तरी कौटुंबिक ताण हा सर्व कारणांच्या मुळाशी असल्याचे सांगण्यात आले आहे.
या अहवालानुसार 2021 मध्ये आत्महत्या करणार्या 33.2 टक्के पुरुषांनी कौटुंबिक समस्यांना कंटाळून स्वत:ला संपवले. तर 4.8 टक्के पुरुषांनी वैवाहिक छळाला कंटाळून जीवन संपवले आहे. देशात वाढणार्या विवाहित पुरुषांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय जरी असला तरी त्यावर ठोस उपाययोजना ना कुटुंबातून होताना दिसते ना समाजातून. परिणामी 2014 मध्ये तब्बल 18 हजार विवाहित पुरुषांनी घरच्या भांडणाला कंटाळून आपले जीवन संपवले. तर 2015 पर्यंत कौटुंबिक जाचाला कंटाळून विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचा आकडा 66 टक्क्यांवर पोहचल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच यात विधुर आणि घटस्फोटीत पुरुषांचे आत्महत्येचे प्रमाण 3 टक्क्यांवर असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आले आहे.
विशेष म्हणजे आत्महत्या करणार्यांमध्ये विवाहित पुरुषांचं वाढतं प्रमाण ही चिंतेची बाब असून विवाहाशी त्याचा थेट संबंध असल्याने भारतीय विवाहसंस्थाही त्यामुळे चर्चेत आली आहे. जे पुरुष बाहरेची सर्व आव्हाने पेलू शकतात ते कौटुंबिक वादात मात्र सपशेल अपयशी ठरत आहेत. यासाठी पती-पत्नी यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती जरी जबाबदार असली तरी समाजाने पुरुष म्हणून त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षाच त्याच्यासाठी जीवघेण्या ठरत आहेत. मर्द को दर्द नही होता, पुरुष कधी रडत नाहीत. तू काय मुलगी-बाई आहेस काय रडायला? हे लहानपणापासूनच त्याच्या मनावर बिंबवले जात असल्याने पुरुषांना अश्रू गाळण्यास एकप्रकारची समाजानेच अलिखित बंदी घातली आहे. रडणे हे कमकुवत मानसिकतेच लक्षण मानले जाते. त्यामुळे मन मोकळं कोणासमोर करायचं? आपल्यांकडूनच होणार्या मानसिक-शारीरिक छळाबद्दल कोणाशी बोलायचं? कोणाची मदत घ्यायची? असे अनेक प्रश्न आजच्या पुरुषांना भेडसावत आहेत.
घरात नवरा-बायकोचा वाद झाला तर बायको भडाभडा रडून मन मोकळं करते. एवढ्यावरच ती थांबत नाही तर फोनवर आई-वडिलांना, बहिणीला, सासरी असेल्या लेकीला, मुलाला, मैत्रिणीला अशी टप्प्याटप्प्याने ती पतीबरोबर झालेल्या भांडणाबद्दल बोलून मनाचा निचरा करत असते. त्यातून ती एकप्रकारे समोरच्या व्यक्तींची सहानुभूतीच मिळवत असते. मानसिक सहानुभूती मिळवण्याचा हा उत्तम मार्ग आहे हे ती जाणून असते. पण पुरुषांचं तसं होत नाही. ते आतल्या आत चरफडत राहतात. कारण दु:ख जाहीर करण्याची त्यांना परवानगी नाही. कारण तो पुरुष आहे. मर्द आहे. आणि मर्द को दर्द नही होता है. हे त्याच्या मनावर पक्क बिंबवलेलं असतं. रडल्याने स्ट्रेस हार्मोन्स रिलिज होतात. ताण कमी होतो, पण जर पुरुष रडलाच नाही तर स्ट्रेस हार्मोन्स शरीरातून बाहेर पडत नाहीत. त्याचा विपरीत परिणाम त्याच्या शरीरावरच नाही तर मनावरही होतो. याच घुसमटीतून विकृत मनोवृत्तीही तयार होण्याचा धोका असतो, हे शास्त्रीयदृष्ठ्या सत्य आहे.
हा मुद्दा स्पष्ट करायचं म्हटलं तर आपल्या घरात किंवा आजूबाजूलाही आपण नीट पाहिलं की लक्षात येतं की असे आपलेच जवळचे अनेक पुरुष आहेत, जे पती, वडील, भाऊ, काका, मामा, मित्र किंवा इतर कोणी असतील. त्यांना आपण कधी रडताना, मोकळं बोलताना पाहिलंय का? कौटुंबिक कलहात फक्त पुरुषच बायकांना छळत नाहीत तर कैक घरात बायकाचं नवर्याचा जो मानसिक छळ करतात त्याबद्दल काय बोलावे. कौटुंबिक न्यायालयात आज अशाच जोडप्यांच्या घटस्फोटासाठी रांगा लागल्या आहेत. बरं यातही घटस्फोट घेऊन वेगळं व्हावं आणि नंतर तुझं तू बघ माझं मी बघतो एवढं काही विभक्त होणं सोपं नाही. कारण जर जोडप्याला मूल असेल तर नवर्याला जिवंतपणी मरणयातना देण्यासाठी महिला नेहमीच तयार असतात. कोर्टाने आदेश देऊनही बर्याच वेळा महिला पतीला मुलांना भेटायला देत नाहीत. त्यामुळे मुलांच्या विरहात बापाचं मन कायम रडत राहतं.
अनेक वेळा त्याच्या पुरुषत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याचं मानसिक खच्चीकरण पत्नीकडून केलं जातं. असे आरोप त्याच्या पुरुषार्थालाच चॅलेंज असल्याने अनेक केसेसमध्ये तो समाजाच्या लाजेपोटी स्वत:ला संपवतो. तसेच त्याच्यावर खोट्या केसेस टाकल्याने बर्याच वेळा पुरुषांना नोकर्या गमवाव्या लागतात. अशा वेळी तरुणांना, पुरुषांना कोर्टात केस असल्याने दुसरीकडे जॉब मिळणे कठीण होऊन जातं. तर कधी सासू-सासरे नको, अशा बायकोचा हट्ट असल्याने अगतिक पुरुष आईवडिलांपासून, भावंडांपासून दुरावतो. एकटा पडतो. पण याबद्दल कोणाशी बोलावं. याच विवंचनेत तो अडकतो. डिप्रेस होतो आणि स्वत:ला संपवून आयुष्यातील प्रश्नच कायमचे संपवून टाकतो. जे भयंकर आहे. खरे अशा स्थितीत शेवटचे टोक गाठण्यापूर्वी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याची गरज आहे. कारण ते त्यातून त्याला काही मार्ग सुचवू शकतात. टेन्शन आले की, काही पुरुष स्वत:ला दारूच्या नशेत गुंतवून स्वत:चे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हिंमत है मर्दा तो मदत करे खुदा, ही भावना पुरुषांनी स्वत:मध्ये विकसित करण्याची गरज आहे.
काळ बदलतोय तशी आपल्याला स्त्री-पुरुषांसाठी समाजाने निश्चित केलेली मानसिकताही बदलायला हवी. स्त्री-पुरुष हे समाजाचे संतुलन सांभाळणारे जीव आहेत. शारीरिक रचनेने ते भिन्न असले तरी दोघेही मनाने संवेदनशील आहेत. दोघांना एकमेकांच्या आधाराची गरज आहेच. मग अशा वेळी तिने रडावे आणि याने घुसमटत राहावं हे आता चालणार नाही. त्यासाठी मुलांच्या आयांनी मुलांना म्हणजेच भावी पुरुषांना रडू द्यावं. जगण्यासाठी जशी श्वासोच्छवासाची गरज असते तशीच ताण घालवण्यासाठी अश्रू ढाळण्याची, हे मुलांना शिकवण्याची वेळ आली आहे. नाहीतर या घुसमटीतून अनेकजण स्वत:ला संपवत राहतील तर काहीजण दुसर्यांना संपवण्यासाठी तयार होत राहतील.