HomeसंपादकीयओपेडMumbai BEST Bus : बेस्टचे चांगले दिवस येणार तरी कधी?

Mumbai BEST Bus : बेस्टचे चांगले दिवस येणार तरी कधी?

Subscribe

बेस्ट सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी नव्या बसगाड्या खरेदीची बेस्ट प्रशासनाला नितांत आवश्यकता आहे, परंतु याबाबतचा निर्णय शासन दरबारी होणार तरी कधी आणि घेणार तरी कोण याची चिंता बेस्टला सतावत आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून बिरुदावली असणार्‍या मुंबई महापालिकेच्या अखत्यारित बेस्ट परिवहन उपक्रमाचा कारभार चालतो, परंतु असे असतानाही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणारी बेस्ट गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक डबघाईला आलेली आहे.

मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी (लाईफलाईन) म्हणून प्रसिद्ध असलेला बेस्ट परिवहन उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तोट्यात आहे. दिवसेंदिवस तोटा वाढत असल्याने बेस्ट परिवहन उपक्रमावर कर्जाचा डोंगर असून मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेली बेस्ट सध्या अखेरच्या घटका मोजत असल्याची गंभीर परिस्थिती आहे. एकेकाळी स्वमालकीच्या तब्बल 4 हजार बसगाड्या असणार्‍या बेस्टकडे सध्या केवळ साडेसातशेच्या घरात बसगाड्या उरल्या आहेत. कहर म्हणजे यापैकीही जवळपास पाचशेहून अधिक बसगाड्या या पुढील 10 महिन्यांच्या काळात भंगारात निघणार आहेत.

त्यामुळे बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसचा ताफा हा केवळ अडीचशेच्या घरात येणार आहे. आधीच इतक्या कमी प्रमाणात बसगाड्या असल्याने बेस्टला प्रवाशांना वेळेवर सेवा देण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच जवळपास पाचशेहून अधिक बसगाड्या भंगारात निघणार असल्याने इतक्या तुटपुंज्या बसगाड्यांच्या संख्येवर संपूर्ण शहरभर दिवस-रात्र सेवा तरी कशी सुरू ठेवायची, असा प्रश्न बेस्ट प्रशासनासमोर सध्या उभा ठाकला आहे.

बेस्ट सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी नव्या बसगाड्या खरेदीची बेस्ट प्रशासनाला नितांत आवश्यकता आहे, परंतु याबाबतचा निर्णय शासन दरबारी होणार तरी कधी आणि घेणार तरी कोण, याची चिंता बेस्टला सतावत आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून बिरुदावली असणार्‍या मुंबई महापालिकेच्या अखत्यारित बेस्ट परिवहन उपक्रमाचा कारभार चालतो, परंतु असे असतानाही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणारी बेस्ट गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक डबघाईला आलेली आहे.

बेस्टला आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी महापालिका प्रशासनाने काही प्रमाणात आर्थिक मदतही केली, परंतु ज्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती, त्या प्रमाणात आर्थिक मदत न मिळाल्याने आर्थिक तोट्याच्या खाईतून बाहेर येेणे बेस्टसाठी अशक्य होत गेल्याचे बेस्टमधील लोकांचे म्हणणे आहे. बेस्टला वाचवण्यासाठी राज्य सरकारने तरी मदत करावी, अशीही मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे, परंतु राज्यात अनेकदा सरकार बदलले, मात्र बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्याचा विषय हा काही मार्गी लागला नाही.

2014 साली केंद्रासह राज्यात सत्तांतर होताना ‘अच्छे दिन’चा (बेस्ट डेज) नारा हा खूप प्रचलित होता. त्यावेळी सत्ता आल्यास बेस्टचेही बेस्ट डेज आम्ही आणू, असा दावा अनेक नेत्यांकडून करण्यात आला होता, परंतु सत्ता उपभोगून 10 वर्षे उलटली तरी बेस्टचे बेस्ट डेज काही अद्याप आलेले नाहीत.

बेस्टमधील जवळपास 510 बसेस या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबरमध्ये भंगारात निघण्याची शक्यता आहे. बेस्टच्या अखत्यारित केवळ अडीचशे बसगाड्या उरल्यास बेस्टच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. इतक्या कमी प्रमाणात बसगाड्या उरल्यानंतर संपूर्ण शहर आणि उपनगरात बससेवा दिवस-रात्र सुरू तरी कशी ठेवायची, हा प्रश्न बेस्ट प्रशासनाला सतावणार आहे. बेस्टला या संकटातून वाचवण्यासाठी नव्या बसगाड्या खरेदी करणे भाग आहे.

बेस्टकडे यासाठी पर्याप्त निधी नाही. आधीच कर्मचार्‍यांचे पगार देताना बेस्ट प्रशासनाला निधीची चणचण जाणवत आहे. अशा परिस्थितीत बेस्ट नव्या बसगाड्यांची खरेदी कशी करणार, हा प्रश्न आहे. यापेक्षाही मोठी समस्या म्हणजे नव्या बसगाड्या खरेदीबाबतचा निर्णय बेस्टमध्ये सध्या घेणार तरी कोण, असाही प्रश्न आहे.

कारण बेस्टच्या बुडत्या जहाजाला वाचवण्यासाठी सध्या कोणी वालीही नाही अशी परिस्थिती आहे. बेस्ट उपक्रमाच्या बुडत्या जहाजात धड एक सनदी अधिकारी टिकेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी अद्याप कुणाची नियुक्ती झालेली नाही. गेल्या जवळपास महिनाभरापासून या पदावर कोणा सनदी अधिकार्‍याची नियुक्ती झालेली नाही.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे बेस्टचा तात्पुरता चार्ज सोपविण्यात आला आहे. पूर्णवेळ सनदी अधिकारी नसल्याने बेस्टमध्ये महत्त्वाचे निर्णय सध्या घेणार तरी कोण, हा प्रश्न आहे. बेस्ट उपक्रमात बदली झाल्यास पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्या अधिकार्‍याची बदली होते. असाच काहीसा अनुभव बेस्टमध्ये येत आहे. गेल्या 16 महिन्यांच्या काळात बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी 3 सनदी अधिकार्‍यांची बदली झाली आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी अनिल डिग्गीकर यांची 14 मार्च 2024 रोजी बेस्टमध्ये महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानंतर जवळपास 10 महिन्यांत त्यांची बदली झाली. 24 डिसेंबर 2024 रोजी अनिल डिग्गीकर यांची उचलबांगडी करण्यात आली. अनिल डिग्गीकर यांच्याआधी विजय सिंघल यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु विजय सिंघल यांचीही 8 महिन्यांत बदली झाली होती. सिंघल हे बेस्ट उपक्रमात 5 जून 2023 रोजी रुजू झाले होते, तर 5 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांची बदली झाली होती. विजय सिंघल यांच्यानंतर अनिल डिग्गीकर यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

जवळपास 10 महिन्यांनंतर त्यांची उचलबांगडी झाली. अनिल डिग्गीकर यांच्यानंतर हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार स्वीकारला नव्हता. त्याचे कारण समोर येण्यापूर्वीच त्यांची अवघ्या 10 दिवसांत बेस्ट उपक्रमातून बदली झाल्याचे फर्मान राज्य शासनाकडून काढण्यात आले. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाची खुर्ची रिकामीच आहे.

केवळ बसगाड्यांच्या विषयामुळेच बेस्टवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे असा भाग नाही. बेस्टची प्रवासी संख्या दिवसेंदिवस घटत आहे. स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा घटत असल्याने यावर उपाय म्हणून कंत्राटदारांचा पर्याय प्रशासनाने अवलंबला होता, परंतु कंत्राटी बसगाड्यांचा विषय हा बेस्टसाठी रोगापेक्षा इलाज भयंकर असा होऊन बसला आहे. कंत्राटी बसगाड्यांमुळे बेस्टच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बेस्टची प्रतिमाही डागाळली आहे.

गेल्या पाच वर्षात बेस्ट उपक्रमात विविध प्रकारचे 834 अपघात झाले असून त्यामध्ये 88 जणांचा बळी गेला आहे. तसेच अपघाताप्रकरणी बेस्ट उपक्रमाला आतापर्यंत 42.40 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे. आर्थिक तोट्यात असतानाही बेस्ट उपक्रमाला कोट्यवधी रुपये नुकसान भरपाईसाठी द्यावे लागले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तर एकामागून एक बेस्ट बस अपघाताच्या घटना घडल्या.

9 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत म्हणजे अवघ्या सहा दिवसांत लागोपाठ चार अपघातात 9 जणांचे बळी गेले, तर 42 जण जखमी झाले होते. यामध्ये 9 डिसेंबर रोजी कुर्ला येथील बस दुर्घटनेत 9 जणांचा बळी गेला, तर 40 जण जखमी झाले. 11 डिसेंबर रोजी गोरेगाव येथे बेस्ट बसने बाईकला धडक दिल्याने अपघात घडला.

11 डिसेंबर रोजीच सीएसएमटी, बोरा बाजार येथे बसखाली चिरडले गेल्याने एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर 14 डिसेंबर रोजी शिवाजी नगर, गोवंडी येथे धावत्या बसखाली बाईकस्वार ठार झाल्याची घटना घडली होती. मागील 5 वर्षात 834 बेस्ट बस अपघात झाल्याची खळबळजनक आकडेवारी नुकतीच माहिती अधिकारातून समोर आली होती. एकूण 834 अपघातांत बेस्ट प्रशासनाच्या आणि खासगी कंत्राटदारांच्या बसेसचा समावेश आहे.

बेस्टचे एकूण 352 अपघात असून यात जीवितहानीची संख्या 51 आहे, तर भाडेतत्त्वावरील खासगी कंत्राटदारांकडून झालेल्या अपघातांची संख्या एकूण 482 असून यामुळे झालेल्या जीवितहानीची संख्या 37 आहे. 11 जानेवारी रोजी विक्रोळी येथे बसचालकाशिवाय बस तब्बल 40 मीटर पुढे धावली गेल्याने एका चहाच्या टपरीला धडकली होती. चालक हँडब्रेक न लावता निष्काळजीपणाने खाली उतरल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते. वारंवार होणार्‍या अपघातांमुळे बेस्टची प्रतिमा आणखी खालावत आहे. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.