सिगारेटच्या धुरासारखं नामदेव ढसाळच्या कवितेला आकाशाच्या दिशेनं फुंकून टाकता येत नाही की तिला टायरसोलच्या निर्दय लेदरबुटाखाली चिरडताही येत नाही. चिरडलेली नामदेवाची कविता जमिनीतून उगवते, तर धूर होऊन जाळलेला नामदेव आभाळातून बरसतो.
शहर, गावातले नदीनाले, गटारं, विहिरी, पाट यातून नामदेवची कविता वाहत असते त्यावेळी नामदेव शहरातल्या आळीआळी, गल्लीबोळातून फकीर बनून फिरत असतो, नामदेव शेतातलं झाडं असतो, नामदेव शेतातल्या आंब्याचा पाड असतो, नामदेव कत्तलखान्यातली जनावराचा फन्ना उडवणार्या मशीनकटरची दातेरी आरी असते. नामदेवाच्या बटन चाकूची धार रामपुरी असते… नामदेव ‘पोएट ऑफ अंडरवर्ल्ड’ असतो, राखेतून सूर्य पेटवणारा नामदेव फिनिक्स बर्ड असतो. एल्गार, विद्रोह, शोषण, कवितेतला जाळ, असले शब्द नामदेवाच्या कवितेच्या कितीतरी अलीकडे आपला दमसास सोडून मरून गेलेले असतात.
साहित्यातील ‘नोबेल’ मिळवणारे व्ही.एस. नायपॉल नामदेवाला भेटायला मुंबईत आवर्जून येतात. नामदेव गेल्यावर दादरच्या स्मशानभूमीत त्याचं दहन झाल्यावर कविश्रेष्ठ गुलजारांना त्याची चिता कधीच थंड पडणार नाही, याची खात्री असते. विजय तेंडुलकरांना नामदेवाच्या गोलपिठ्यातली माणसं आपल्याला का दिसली नाहीत, याची खंत असते. नामदेवाच्या कवितांचं भाषांतर दिलीप चित्रे यांनी हिंदीत तर अलीकडेच पत्रकार मंदार फणसे यांनी इंग्रजीत केलेलं असतं. आधुनिक माणसाच्या कालातीत जडणघडणीचा अभ्यास करणार्या जगातल्या नावाजलेल्या विद्यापीठात नामदेवच्या कविता या मानवी जाणिवांचे शब्दीक अनुभव म्हणून शिकवल्या जातात, नामदेवच्या कवितांची ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरे झालेली असतात.
जगातल्या आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ आणि मानवी जाणिवांना शब्दरुप देणार्या काव्यकारांमध्ये नामदेवचे नाव पहिल्या रांगेत असते, त्यामुळे नामदेवला साहित्यातील नोबेलच्या ताकदीचा कवी म्हणून मान्यता मिळालेली असते. नामदेवने ‘त्याला न ओळखणार्या’ अशा कित्येक ‘महाग्यानी’ लोकांना त्यांच्या बुडाखालचा अंधार दाखवलेला असतो. या अंधारातून आमच्या आळीतून जाताना तुमच्या पेटलेल्या मशाली विझवण्याचा सल्लाही त्यानं दिलेला असतो. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा संपूर्ण सूर्य दिसत असतो.
नामदेवने दाखवलेला सूर्य त्याला न ओळखणार्यांना कधीही पेलवणारा नसतो, त्यामुळे नामदेवला नाकारणे त्यांना सोपे वाटते, परंतु साहित्याच्या समुद्रात विक्राळ ऑक्टोपससारख्या अस्ताव्यस्त पसरलेल्या ढसाळला नाकारणेही सोपे नसल्याने त्याचा अनुल्लेख किंवा त्याला अनोळखी ठरवण्याची खेळी खेळली जाते. ढसाळांच्या कवितेचा संदर्भ असलेल्या ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाच्या सेन्सॉर संमती निमित्ताने ढसाळ नामदेवचे ‘अनोळखी नाकारलेपण’ समोर येते.
हा मराठी भाषा दिन असतो, यानिमित्ताने ढसाळच्या मराठी साहित्यातील योगदानाची चर्चा सुरू झालेली असते. पांढरपेशा साहित्यिकांनी व्याकरणाने अंलकृत केलेली घरंदाज मराठी भाषा नामदेवने बटकीसारखी वागवलेली असते, नामदेवची वेदना स्पष्ट करायला अशी अलंकृत मराठी भाषा कागदावर तोकडी पडते, त्यावेळी मराठीच्या पदरात नामदेव कित्येक नव्या शब्दांचे दान टाकतो, त्याची मराठी कुठल्याही गावकुसाबाहेरच्या पालातून बाहेर पडून मुंबईच्या झोपडपट्टीपासून ते मुंबईतल्या उषाकिरण इमारतीच्या उंचीपर्यंतचे अवकाश कवेत घेते.
नामदेवच्या अस्सल जाणिवेचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केल्यास मराठी सारस्वतांचे शब्द सुरू होताच आटून गेलेले असतात. त्यामुळेच नामदेवच्या माणूसपणाच्या जाणिवांचे संदर्भ शोधायला त्याची कविता मराठीच्या मर्यादेबाहेर पडते आणि इतर भाषांमध्ये भाषांतरीत होऊन त्याचा शोध घेते. नामदेवच्या कवितेने मांडलेले माणूसपण, वेदना, आक्रोश, आनंद, प्रेमाच्या संदर्भांचा शोध म्हणूनच अजूनही संपलेला नसतो.
नामदेवच्या कवितेत विद्रोह नसतोच, ती प्रेमाची आणि आनंदाची माणूससुलभ इच्छाच असावी, नामदेवच्या कवितेतला टोकाचा राग हा एकाच पातळीवर माणूसपणाचा आग्रह आहे आणि तो नाकारल्याची खंत आहे. इथं सगळी एकाच हाडमांशी रक्ताची माणसंच असताना, एकानं दुसर्याला सांडपाण्यावर जगवण्याची त्याला चीड असते. नामदेवला नाकारण्यामागची कारणे ही बुद्धकाळापासून इथं विद्यमान असतात. नामदेवला नाकारणं म्हणजे माणसाच्या निखळ माणूसपणाला नाकारणं असत. माणसांचे माणूसपण नाकारल्याशिवाय सत्तेचा मार्ग स्पष्ट होत नाही. त्यामुळे हा प्रयोग याआधीही स्वतःला ‘महाग्यानी’ समजणार्यांकडून कित्येकदा झालेला असतो.
माणूसपणाच्या शोधात असलेल्या नामदेवाने ‘या सत्तेत आता जीव रमत नाही’, असं विषादानं म्हटलेलं असतं. नामदेवाने ‘महाग्यानी’ लोकांच्या बुडाखालच्या अंधारालाच ‘उज-एड’ समजणार्या ’सूर्याच्या रथाचे सात घोडे’ साहित्याच्या पानावर लेखणीच्या एकाच फटकार्यात मारून टाकलेले असतात. वास्तविक हे घोडे नसून झूल पांघरलेली गाढवं असल्याचं नामदेवाने दाखवून दिल्यावर अशांच्या स्वातंत्र्याला ‘कुठल्या गाढवीचं नाव द्यावं?’ असा प्रश्न त्याला पडलेला असतो. नामदेवला नाकारण्यामागचं सूत्र एकच असतं, नामदेवची भाषा अशुद्ध, शिवराळ असल्याचा आरोप त्याच्यावर माणसांना अशुद्ध विटाळ मानणार्या आणि त्यांचे ‘शुद्धी’करण करण्यात माहीर असलेल्यांकडून केला जातो.
शुद्धी करणे, पावन करून घेणार्या संस्काराच्या कित्येक पलीकडे नामदेवची मराठी पोहचलेली असते, माणूसपणाची किळस करणार्यांची कीव नामदेवच्या शब्दांतून व्यक्त होते, शुद्धिकरणाला फाट्यावर मारून नामदेव ‘जंताच्या माळा गळ्यात घालून’ शहरातल्या गल्लीबोळात मिरवत असतो. त्याच्या कवितेत ‘असोशी वाहणारी’ गटारं असतात, ती ‘नरकात ऋतू आलेल्या मराठी भाषेसाठी थम घेऊन दुवा’ मागतात.
नामदेवला नाकारणार्यांची अनादी काळापासून भीती मोठी असते, नामदेवची कविता ही रसरशीत जीवनाचा अनुभव देणारी असते. तो अनुभव मराठीसाठी नवीन असतो. हा अनुभव कल्पनाविलास, कागदावरचा आदर्शवाद, भंपक पापपुण्य, शाब्दीक कोट्या, वैश्विक साहित्याच्या जाणिवेतील भाषांतरीत उचलेगिरी, वर्चस्ववादाची बोगसगिरी आणि सगळं जग सुखनैव जीवन जगत असल्याच्या साहित्यातल्या पोकळ अॅनेस्थेशियाची नशा खाडकन उतरवून टाकतो. नामदेवच्या कवितांचे शब्दांचा आशयविषय मांडायला मराठीची लायकी कमी पडल्याने नामदेवने तिला काही शब्द त्यांचे अर्थ उधारीवर दिलेले असतात, याच उधारीवर नामदेवनंतरच्या कित्येक मराठी आणि मराठीतर साहित्यरचना कविता पोसल्या जातात.
कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही, असे विचारणारे अनभिज्ञ ज्ञानेश्वरांचे वैश्विक पसायदान, तुकारामांचे अभंग, कबीराचे दोहे, बुद्धांची करुणा, बाबासाहेबांचे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनांपासूनही अनभिज्ञ असावेत. नामदेवच्या कला सहित्य, सृजन, निर्मिती आणि मानवी जाणिवेची उंची गाठण्यासाठी जातीधर्मापलीकडे केवळ निखळ-नितळ माणूस म्हणून मोठेपण आवश्यक असते, मात्र नामदेवला न ओखळणार्यांचेही खरे आहे म्हणा…आपल्याच शाब्दीक, सांस्कृतिक, साहित्याच्या डबक्यात, या मर्यादित चिखलात लोळणार्या साहित्य संस्कृती परंपरांना नामदेवाने जीव-जनावर-माणसांचे, नर-मादींचे संदर्भ असलेला साहित्याचा अथांग समुद्र दाखवला.
आता या परंपरागत अंधाराने सूर्यच पाहिला नसल्याने त्यांचे असे आंधळे होणे स्वाभाविकच म्हणायला हवे, या पिढ्यानपिढ्यांच्या शतकानुशतकांच्या वैचारिक दांभिकतेने भारलेल्या आंधळेपणातूनच त्यांना नामदेव ढसाळ दिसत नाही, हा त्यांचाही दोष नाही, अशांना सूर्यप्रकाशात यायचंच नाही, बुडाखालचा काळोख उकरत बसण्यातच धन्यता मानणार्यांना ढसाळने दाखवलेल्या सूर्याची भीती वाटत असावी, या सूर्यप्रकाशात आपल्यातला नागडेपणा उजागर झाला तर आपली शतकानुशतके जपलेली सांस्कृतिक अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जातील, ही भीती त्यांना वाटत असावी. सूर्य पाहाण्यासाठी सॉक्रेटीससारखं स्वतःला काहीच माहीत नसल्याचं आधी समजून घ्यावं लागतं, या अनादी अहंकारातून आधी मुक्त व्हावं लागतं.
आमच्या भाषा, साहित्य संस्कृतीच्या कक्षेत आधीपासूनच सगळं असल्याची अफवा वर्षानुवर्षे पोसणार्यांना नामदेव अनभिज्ञच वाटावा, नामदेव ढसाळला ओळखतो म्हटल्यावर त्याच्या जाणिवा, संवेदनशीलता, अनुभवांना ओळखावं लागतं यातून स्वत:च्या ‘सनातन’ दांभिक लबाड्याही नाईलाजाने इतिहासातून समोर येतात, जे आजच्या वर्तमानात परवडणारं नसतं, म्हणूनच नामदेव ढसाळ कोण? आम्ही ओळखत नाही, अशी पळवाट काढली जाते. अशी पळवाट काढली तरी त्यातून आपली सुटका होणार नाही, याची ढसाळांना नाकारणार्यांना कल्पना नसते. कारण त्यांच्या पळवाटांवर ढसाळ पाय रोवून उभे असतात. त्यांना उखडून टाकता येत नाही.