Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeसंपादकीयओपेडNational Science Day : अंधश्रद्धेच्या अंधारात विज्ञानाच्या दिव्याची गरज!

National Science Day : अंधश्रद्धेच्या अंधारात विज्ञानाच्या दिव्याची गरज!

Subscribe

आज मोठ्या प्रमाणात विज्ञानाचा फायदा घेऊन आपण जगत आहोत, मात्र आपण वैज्ञानिक दृष्टी पुरेपूर स्वीकारली असे मात्र खात्रीने म्हणू शकत नाही. कारण आजही समाजातील परंपरागत प्रमाणमूल्ये बदललेली नाहीत. त्यामुळे समाज मानसिक गुलामगिरीत जीवन जगत आहे. समाजात दैववादीपणा आणि अंधश्रद्धा वाढताना आपल्याला दिसतात. अनेक परंपरागत मूल्ये आजही समाजात रूढ आहेत. त्यामुळे समाज संकटात सापडतो. आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी घेतलेला आढावा.

समाजात काही वेळा काही माणसं अशी भेटतात आणि म्हणतात की, विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वी माणसाच्या जीवनामध्ये ताणतणाव कमी होते, संघर्ष कमी होते आणि त्यामुळे माणूस अधिक सुखी होता. आधुनिक विज्ञान युगात मात्र ताणतणाव व संघर्ष इतके वाढले की त्यातून माणसाचे सुखच हरवून गेले आहे. खरंतर जीवनातील ताणतणाव, संघर्ष, सुख या सार्‍या मानवी मनाच्या जाणिवा आहेत. भारतीय माणूस भूतकाळात जास्त रमतो.

त्यामुळे आपल्या जन्मापूर्वी येथे अधिक सुखाचे, कमी संघर्षाचे आणि कमी ताणतणावाचे जीवनमान होते असे त्याला वाटणे शक्य आहे, पण आज आपण वस्तुस्थिती पाहिली तर आपल्याला वेगळ्याच गोष्टी जाणवतील. ज्या काळात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होत होते त्या काळात अपत्य वियोगाचे दारुण दु:ख किती मोठ्या प्रमाणावर मातापित्यांना भोगावे लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

वारंवार तीव्र स्वरूपाच्या दुष्काळाचे तडाखे बसत असताना फक्त जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी त्या माणसांना किती धडपड करावी लागत असेल याचा विचार केला तर आताही अस्वस्थ वाटते. खरं म्हणजे पर्याय नसल्याने मन मारून परिस्थितीशी जुळवून घेणे आणि त्यात सुख मानणे वेगळे आणि खरोखर सुखी असणे वेगळे आहे. उदाहरणार्थ ज्या समाज व्यवस्थेमध्ये समाजातला एक मोठा मानवी समूह जन्मजात विषमतेमुळे शूद्र, दलित, गुलाम किंवा वेठबिगार म्हणून मूठभर उच्चभ्रूंसाठी राबत होता, म्हणून त्या काळातली सर्व माणसे सुखी होती, ताणतणावमुक्त होती, असे म्हणणे हे त्यांच्या जीवनाची थट्टा करण्यासारखेच आहे.

थोडक्यात विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे मानवाची प्रगती झाली आहे, होत आहे व त्याचे जीवन जास्तीत जास्त सुखाचे होत आहे यात शंका नाही. याचा अर्थ असा नव्हे की आज आदर्श परिस्थिती निर्माण झाली आहे व सर्व संघर्ष व सारी दुःखं लयाला गेली आहेत, मात्र पूर्वीपेक्षा आताची परिस्थिती नक्कीच सुधारली आहे आणि पुढील काळातही विज्ञान-तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला तर त्यामध्ये जास्त सुधारणा होईल एवढे मात्र नक्की!

इथे असा प्रश्न निर्माण होतो की विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा फायदा आपल्याला मिळावयाचा असेल तर त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे आवश्यक आहे का? म्हणजे जर आपण विज्ञान तंत्रज्ञान यातून मिळणारी प्रगती आयात केली तर आपण खरोखर सुखी होऊ का? खरंतर विज्ञान तंत्रज्ञान हे वस्तुनिष्ठतेवर आधारित आहे. म्हणून वापरणार्‍याचा मानसिक दृष्टिकोन, भावना, श्रद्धा काय आहेत यावर त्या यंत्राचे काम अवलंबून नसते. म्हणजे काही लोक असेही म्हणतात की तंत्रज्ञान, विज्ञान आयात केले की समाजाला फायदा होईल.

त्यामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी खटपट करण्याची गरज नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलचा हा विचार चुकीचा आहे. कारण विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे निवळ यंत्रे आणि उपकरणे नव्हेत. ती एक कामाची पद्धत आहे. त्याच्या वापरासाठी एक शिस्त आवश्यक आहे. या सर्व गोष्टी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. थोडक्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्याच करायची असेल तर मुक्त तर्काला धरून केलेले कोणतेही विधान जे निरीक्षण, काटेकोर तर्क, अनुमान प्रचिती आणि प्रयोग याद्वारे सार्वत्रिकरित्या सिद्ध करता येते.

जर विज्ञान-तंत्रज्ञान याच्या वापरामागे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा भक्कम पाया नसेल तर असे समाज आधुनिक होण्याऐवजी विकृतीला बळी पडतात. असे समाज उपभोगाच्या मागे धावतात आणि आपले स्वत्वच गमावून बसतात. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्राण आहे. कारण विज्ञान तंत्रज्ञानाद्वारे जे काही घडते त्यापाठीमागची कारणं शोधण्याचा, ती बदलण्याचा, त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याचा मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच मिळतो. खरंतर वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ विज्ञान तंत्रज्ञानापुरताच मर्यादित नाही, तर तो जीवनाबद्दलचा मूल्यांशही सांगू इच्छितो.

विज्ञानबोध या १९३४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मराठी ग्रंथाच्या विस्तृत प्रस्तावनेमध्ये श्री. म. माटे यांनी लिहिले आहे की, पूर्वीपेक्षा आता मुलांना शास्त्रीय प्रमेय जास्त माहीत झालेली आहेत यात शंका नाही, पण विद्यार्थ्यांच्या मनाची ठेवणच शास्त्रीय करून ठेवणे फार महत्त्वाचे आहे. माटे यांच्या विचाराचा हेतूच मुळी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढत जावा असा होता. पुढे पुढे अनेकांनी जोरदारपणे हा विचार मांडला. डॉ. जयंत नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञांनी हाच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार विज्ञानावर आधारित असलेल्या ललित साहित्यातून समाजापुढे सातत्याने मांडला.

अनेक परंपरागत मूल्ये आजही समाजात रूढ आहेत. ती योग्य आहेत असा चुकीचा समज निर्माण झालेला असतो. त्यामुळे समाज संकटात सापडतो. उदाहरण द्यायचे ठरले तर ठरावीक दिवशी ठरावीक मुहूर्तावर नदीमध्ये आंघोळ केली की पाप धुतले जाते आणि व्यक्ती पवित्र होते. अशी अनेक परंपरागत मूल्यं आजही समाजात रूढ आहेत. ती इष्ट आहेत, योग्य आहेत असा चुकीचा समज समाजात निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे नेहमीच समाज संकटात सापडतो.

चुकीची मूल्ये बदलण्यासाठी सत्तेशी संघर्ष करावाच लागतो आणि तो करण्याची बहुतेक माणसांची तयारी नसते आणि समजा तो केला तरीही परिस्थिती बदलेलच याची खात्री नसते, पण असे जरी असले तरी व्यक्तीने या चुकीच्या प्रमाणमूल्यांना शरण जाण्याचे कारण नाही. व्यक्ती म्हणून आपल्या प्रत्येकाकडे विवेकबुद्धी आहे. व्यक्ती स्वत:ची

व्यक्ती स्वत:ची विवेकबुद्धी व त्याद्वारे नैतिकता अधिक प्रखर करू शकते. त्याद्वारे व्यक्ती प्रमाणमूल्यांनी निर्माण केलेली आर्थिक पिळवणूक, राजकीय फसवणूक आणि दडपशाही, रूढी-परंपरांची मानसिक गुलामी याविरुद्ध लढा देऊ शकते. स्वत:चे जीवन, स्वत:चे कुटुंब, स्वत:चा प्रभाव असलेला समाजातील छोटा-मोठा विभाग या परिघातील प्रमाणमूल्ये व्यक्ती बदलू शकते.

ही नवी मूल्ये माणसाची बुद्धी निर्माण करते म्हणून बुद्धिजीवी वर्ग लागतोच. व्यक्तीच्या विवेकात ही शक्ती आहे. म्हणून विवेकवादी बुद्धिवर्ग समाजात लागतो. असा बुद्धिजीवी वर्ग सत्ताधारी नसला तरी तो प्रभावी ठरतो. अशा वर्गाचे कार्य हे समाजाला डोळस बनवणारे आणि माणुसकीचे असते. ते समाज हिताचे तर आहेच, परंतु राज्यघटनेतील नागरिकांच्या कर्तव्यात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि सुधारणावाद व शोधकबुद्धीचा विकास करणे, या कर्तव्याचे पालन करणे म्हणजेच समाजातील प्रमाणमूल्ये बदलण्याचा प्रयत्न करणे.

माणसं आजही अनेक वेळा त्यांच्या जीवनामध्ये विचारापेक्षा भावनेच्या आधारे निर्णय घेतात. म्हणून विचार आणि भावना यांचे संतुलन राखणे म्हणजेच सारासार विवेक वापरून निर्णय घेणे होय. अर्थातच त्याचा पाया वैज्ञानिक दृष्टिकोनच आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाला जीवन मूल्यांची जोड दिली की विवेकाची निर्मिती होते असे हे सूत्र आहे. विवेकी मेंदूची क्षमता व परिणामकारकता वाढवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. जर नसेल तर ते असायलाच हवे. त्यातून दोन गोष्टी घडतील. त्या म्हणजे प्राप्त, प्रचलित विज्ञान तंत्रज्ञानाचा विवेकी पद्धतीने माणसासोबतच एकूणच पर्यावरणासाठी किती आणि कसा योग्य प्रकारे वापर करायचा ते माणसाला समजेल.

दुसरे असे की आपण पाहतोच की मागील १०० वर्षे किंवा त्याहून अधिक काळापासून आपल्या देशामध्ये निसर्ग नियमांशी साधर्म्य राखणारे मूलभूत संशोधन झालेले नाही. वैज्ञानिकांना उच्च दर्जाची बुद्धिमत्ता आवश्यक असते यात शंकाच नाही, मात्र संशोधकांकडे चिकाटी आणि परिश्रम करायची तयारी असावी लागते. या विचाराने आपल्याला नव्या ज्ञानाची नवी पिढी घडवायची असेल, निर्माण करावयाची असेल तर त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जाणीवपूर्वक व्यक्ती आणि समाजामध्ये रुजवणे व तो विकसित करणे याशिवाय दुसरा पर्याय आज तरी नाही.