Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयअग्रलेखNeelam Gorhe : अखिल भारतीय बदनामी!

Neelam Gorhe : अखिल भारतीय बदनामी!

Subscribe

देशाची राजधानी दिल्लीत पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ज्यांनी राजकीय चिखलफेक केली, त्यांनी उभ्या महाराष्ट्राला अक्षरश: लाज आणली आहे. खरे तर २०१९ साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अशी काही राजकीय उलथापालथ झाली की, त्यामुळे कोण गोरे आणि कोण काळे असा भेद करणेही मुश्किल झाले आहे. पक्षनिष्ठा हा प्रकार तर पार धुळीस मिळालेला सगळ्यांनी पाहिला.

त्यामुळे पक्षनिष्ठा आणि राजकीय विचारसरणी यापेक्षा सत्ता आणि पद हे कसे श्रेष्ठ ठरते हे दिसून आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटले आणि त्यांच्या मूळ पक्षप्रमुखांना बेदखल करण्यात आलेले महाराष्ट्रातील जनतेने पाहिले. त्यामुळे जे पक्षाचे मूळ प्रमुख होते, त्यांची अवस्था असून खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, अशी झाली. त्यांंच्याकडे पक्षाचे नावही राहिले नाही आणि चिन्हही राहिले नाही.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे दोन तुकडे झाले. त्यामुळे दोन्ही गटात घमासान टीका सुरू आहे. त्याचे पडसाद दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनात उमटले. या संमेलनात ‘असे घडलो आम्ही’, या विषयावर विविध मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात राज्यातील विधान परिषदेच्या उपसभापती नीमल गोर्‍हे यांची मुलाखत झाली. त्यावेळी त्यांनी पूर्वी ज्या पक्षात होत्या, त्या पक्षाच्या प्रमुखांबद्दल वाद निर्माण होईल, असे विधान केले. खरे तर नीलम गोर्‍हे या उच्चशिक्षित आहेत.

शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य केलेेले आहे. त्या उत्तम लेखिका आणि वक्त्या आहेत. असे सगळे असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे विधान केले, त्यामुळे स्वत:चा लौकिक तर घालवलाच आहे, पण त्याच वेळी महाराष्ट्रातील मराठी लोक आणि तिथले राजकारण याचीही लक्तरे सगळ्या देशासमोर टांगली. आपण कुठल्या व्यासपीठावरून बोलत आहोत, याचे भान नीलम गोर्‍हे यांना राहू नये, हेे खरेच धक्कादायक आहे.

नीलम गोर्‍हे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानानंतर उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शेलक्या विशेषणांचा वापर करून त्यांचा समाचार घेतला. इतकेच नव्हे तर त्यांनी मराठी संमेलनाचे आयोजन करणार्‍या मराठी साहित्य महामंडळावर आक्षेपार्ह आरोप केले. साहित्य संमेलनात कुणी काय बोलावे, याची साहित्य महामंडळ आचारसंहिता तयार करू शकत नाही. कारण तसे केले तर वक्त्यांच्या किंवा चर्चेत सहभागी होणार्‍यांच्या विचार आणि व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातल्यासारखे होईल.

पण आपण कुठल्या व्यासपीठावरून बोलत आहोत, याचे भान बोलणार्‍याने ठेवायला हवे. जेव्हा सत्तर वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी संमेलन दिल्लीत झाले तेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटक होते. ज्या संमेलनाला खुद्द पंतप्रधान उद्घाटक म्हणून उपस्थित राहतात ही त्या राज्याच्या आणि भाषिकांच्या दृष्टीने अत्यंत सन्मानाची बाब असते. पण एकमेकांविषयी राजकीय द्वेषाने पेटलेल्या नेत्यांनी गल्लीतील राग दिल्लीत जाऊन काढला.

पोलिसांना १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे प्रकरण राज्यात गाजत असताना, अशा लोकांच्या मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचायला हवे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले होते की, ‘राजकारणात पैसा कुठून येतो हे फडणवीसांना माहीत नाही का, हमाम मे सब नंगे’. पण आता महाराष्ट्रातील पक्षीय फोडाफोडी आणि पदांसाठीची चढाओढ यामुळे वातावरण इतके संघर्षमय झालेले आहे की, कुणीही कुणाचे कपडे फाडायची संधी सोडत नाही. पण हे कपडे फाडल्यामुळे लाज सगळ्यांची जात आहे, याचे भानही अनेकांना राहिलेले नाही.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, यासाठी गेली अनेक वर्षे सर्वच पक्षातील खासदार संसदेत मागणी करत होते. राज्यातून त्यासाठी जोरदार मागणी केली जात होती, त्यासाठी वेगळा आयोग स्थापन करून मराठी भाषा ही अभिजात दर्जासाठी कशी योग्य आहे, हे दाखवून देण्यात येत होते, पण मागणी काही मान्य होत नव्हती. खरे तर तो मराठी भाषेवर अन्याय होता. तो महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची जी काही धूळधाण झाली, त्यानंतर धुवून काढण्यात आला. त्यामुळे जगभरातील मराठी माणूस भरून पावला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर देशाच्या राजधानीत भरणारे हे पहिले मराठी साहित्य संमेलन असल्यामुळे त्याचा एक वेगळाच दिमाख होता. या आयोजनस्थळी एकेकाळी विजयी मराठ्यांची छावणी पडली होती. दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा, हे गीत एका काश्मिरी महिलेने यावेळी गायले. ते ऐकून सगळ्यांचे ऊर भरून आलेले असताना निलम गोर्‍हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जे आरोप केले, त्यामुळे महाराष्ट्राची अखिल भारतीय बदनामी झाली. देशातील लोकांसमोर मराठी माणसांचे हसे झाले.