तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप सार्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, सुखाचे आणि समृद्धीचे जावो, हीच शुभेच्छा! दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण एकमेकांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून तसेच समाज माध्यमांवरून शुभेच्छा देत असतो. गेल्या वर्षीही म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी अशाच शुभेच्छा एकमेकांना दिल्या होत्या. प्रत्यक्षात मागे वळून पाहिले तर हे वर्ष कसे गेले सर्वांनीच पाहिले आणि अनुभवले.
2024 हे वर्ष महिला अत्याचार, गुन्हेगारी, राजकीय कुरघोडी आदी कारणांसाठीच जास्त चर्चेत राहिले. त्यातही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा हंगामही पाहिला. दोन्ही निवडणुकांचे एकमेकांविरोधात लागलेले निकाल पाहिले. या वर्षातील शेवटचे तीन महिने राज्यासाठी खूपच कठीण गेले असे म्हणावे लागेल. महिला अत्याचार, हत्याकांड, हिट अँड रन, राजकीय गुन्हेगारी यामुळे महाराष्ट्र हादरून गेला.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. त्यातच बदलापूर, कल्याण, पुण्यासह राज्यातील इतर भागातील महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र सुन्न झाला. हे अत्याचार कधी थांबणार? त्यांना लाडक्या बहिणी म्हणायचे आणि त्या महिला वर्गाच्या सुरक्षेविषयी बेफिकीर रहायचे, ही महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे.
बदलापूरमधील अत्याचारामधील आरोपीचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणावरच पडदा पडला. त्यामुळे या शाळेतील ज्या पदाधिकार्यांवर आरोप झाले त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. कल्याणमधील प्रकरण तर आणखी गंभीर आहे. राज्यात सतत महिला अत्याचाराच्या, अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटना सतत घडत आहेत. आरोपींना कडक शिक्षा होईल, फाशी मिळेपर्यंत सरकार शांत बसणार नाही, हे सर्व ऐकायला चांगले वाटते पण जलदगतीने तपास झाला नाही, आरोपी पोलिसांना सापडत नसतील तर शिक्षा कुणाला करणार?
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा येणार होता, या कायद्याचे काय झाले? सरकार या कायद्याबाबत खरोखरच गंभीर असेल तर ते जनतेला कळायला हवे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्राच्या राजकारणाची काळी बाजू समोर आली आहे. वाल्मिक कराडचे कारनामे ऐकून कुणीही हादरून जाईल. एवढी वर्षे या माणसाची बीड जिल्ह्यात दहशत आहे, तर त्याचा पोशिंदा म्हणजेच आका कोण, असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे.
यासाठी राज्याच्या एका मंत्र्याचे नाव पुढे येत आहे, ही बाब राज्यासाठी नक्कीच भूषणावह नाही. राजकारण आणि गुन्हेगारी हातात हात घालून चालत असल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसू लागले आहे. कायदा आणि सुव्यवस्था पाळणार्या सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी ही बाब आहे. पुण्यातील कल्याणीनगरमधील 19 मे रोजीचे हिट अँड रनचे प्रकरण तर खूपच गाजले.
यात एका युगुलाचा मृत्यू झाला तरीही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. चक्क त्याच्या रक्ताचे नमुने ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये बदलले गेले. हा आरोपी डॉक्टर अशीच कामे करायचा अशी माहिती नंतर पुढे आली. शिवाय याच प्रकरणात बाल हक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन असल्याच्या मुद्यावरुन आरोपीला जामीन मिळाला होता. त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती. आपली यंत्रणा कुठल्या दिशेने झुकत आहे, याचा हा उत्तम नमूना होता.
सायबर गुन्हेगारीने या वर्षात डोके वर काढले आहे. ही गुन्हेगारी केवळ वाढली नाही तर फोफावली आहे. तंत्रज्ञान ज्या वेगाने अपडेट होत आहे त्याच वेगाने सायबर गुन्हेगारही वाढत आहे. यंदा देशातील जनतेची ११ हजार ३३३ कोटींची लूट या सायबर गुन्हेगारांनी केली आहे. सायबर गुन्हेगारीमुळे मोबाईल वापरणारे सर्वच भयग्रस्त आहेत. कुठली लिंक येईल, कधी बँक खाते रिकामे होईल हे सांगता येत नाही. या निमित्ताने सायबर अॅरेस्ट हा नवा प्रकार समोर आला आहे.
आयकर, ईडी, पोलीस असल्याचा व्हिडीओ कॉल येतो आणि समोरच्याला ठगवतो, असे प्रकार सुरू आहेत. पोलीस तसेच सर्व यंत्रणांनी आता सायबर गुन्हेगारीविरोधात जाहिरात सुरू केली असून 1930 यावर फोन करण्याचे आवाहन केले जाते. कुणालाही आर्थिक कंगाल करणार्या सायबर गुन्हेगारांना चाप बसेल, अशी यंत्रणा उभी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
कारण मोबाईल हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा भाग आहे. बँकेचे खाते, आधार कार्ड, पॅन हे सर्व मोबाईल नंबरला लिंक केलेले असते. शिवाय यूपीआय पेमेंट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असते. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची गरज झाली आहे. आता लोकांना जगण्याची आणि आर्थिक सुरक्षेची हमी हवी आहे. हे जगणे कसे सुखकर होईल हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. अपेक्षा करूया की, नवीन वर्षात राज्यात जनता सुरक्षित राहील आणि गुन्हेगार जेलमध्ये असतील.