HomeसंपादकीयओपेडMarathi Language : मराठीची जबरदस्ती नको, आत्मचिंतन हवे!

Marathi Language : मराठीची जबरदस्ती नको, आत्मचिंतन हवे!

Subscribe

एखाद्यावर जबरदस्ती करून त्याला आपली भाषा बोलायला लावणं हे चुकीचंच आहे. कारण असे केल्याने त्या भाषेबद्दल, त्या समाजाबद्दल संबंधित व्यक्तीच्या मनात आदर तर नाहीच उलट द्वेष वाढीला लागतो. त्यातूनच मग मराठी-अमराठी यासारखे वाद निर्माण होत असतात. संत ज्ञानेश्वरांनी मराठीला अमृताची उपमा दिलेली असताना हे मराठी भाषेचे अमृत परप्रांतीयांना पासले पाडून पाजले तर काही उपयोग होईल असे वाटत नाही. त्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे.

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥ या ओळींमधून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेवरील त्यांचे निस्सीम प्रेम व्यक्त केले. मराठी ही इतकी रसाळ भाषा आहे की तिची तुलना ज्ञानेश्वरांनी अमृताच्या माधुर्याशी केली. यातच खरंतर मराठी भाषेचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांच्या या ओळी अजरामर झाल्या.

यामुळेच मराठी भाषेबद्दल बोलताना तिचा गौरव करताना या ओळी प्रत्येकाच्या ओठांवर येतातच, पण आज मराठी आणि अमराठी वादांमध्ये याच रसाळ मधाळ गोड भाषेचे जे काही वाभाडे काढण्यात येतात, त्यातून समाजात फक्त मराठी भाषाच नाही तर मराठी माणसाबद्दलही आदर कमी आणि तिरस्कारच अधिक वाढताना दिसतोय. त्यामुळे इतरांना पासले पाडून अमृत पाजून काही साध्य होईल असे वाटत नाही. त्याला आत्मचिंतनाची गरज आहे.

अनेक उदाहरणं गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. अगदी काल परवाचं उदाहरण म्हणजे कल्याणमध्ये शुक्ला नावाच्या सरकारी अधिकार्‍याने मराठी कुटुंबाला गुंडांकरवी केलेली मारहाण, ज्याचे पडसाद थेट विधानसभेत उमटले. त्याआधी रायगडमध्येही एका भाजी विक्रेत्या महिलेने मराठीत बोलण्यास दिलेला नकार आणि अगदी ताजं उदाहरण मुंब्र्यात मराठी तरुणाने फळविक्रेत्याला मराठी बोलण्याची सक्ती केल्यानंतर झालेला वाद आणि माफी.

कधी भाषेवरून तर कधी मराठी माणसाच्या खाद्यसंस्कृतीवरून अमराठी व्यक्तींकडून त्यांना घरं नाकारली जातात. सातत्याने मराठी माणसाला टार्गेट केलं जात आहे. त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. ते बघून पेटलेला मराठी माणूस माजलेल्या परप्रांतीयांवर समाजमाध्यमांवरील कॉमेंट्समधून तुटून पडतो. आतला राग व्यक्त करतो. मग एक ठरावीक पक्ष यात उडी घेतो. अमराठी व्यक्तीच्या कधी कानाखाली जाळ काढतो.

शिव्यांची लाखोली वाहत कधी त्याला उठाबशा करीत माफी मागायला लावतो आणि हा वाद तिथेच संपल्याचे जाहीर करून मराठी माणसांचे कैवारी आपणच असल्याच्या थाटात सोशल मीडियावर चमकतो. आपण मराठी असल्याने आपल्याच माणसावर झालेला अन्याय आणि त्याच्या मदतीला धावलेल्या पक्षाबद्दल त्यावेळापुरता आपल्याला कमालीचा अभिमान वाटतो. कोणी तरी आहे मराठी माणसांचं अशी भावना यामागे असतेच, पण मुळात प्रश्न आहे आपण एखाद्यावर अशी भाषेची सक्ती का करतोय, त्यामागचा उद्देश आणि त्याने काय साध्य होणार याचा विचार करण्याची.

जर आपण खरंच मराठी भाषेचे तारक असाल तरच इतरांना मराठी भाषा बोलण्याचा आग्रह करावा. कारण आजच्या तारखेला आपल्या घरात किती जण लग्न सभारंभ किंवा सणावारासारखे सोहळे सोडून मराठी संस्कृतीचे पालन करतात. आपल्याच घरातील शिकलेली चार पोरं एकत्र आल्यावर चारचौघात किती मराठी बोलतात यावरही नजर टाकावी. खरंतर मराठी भाषेच्या या दुरवस्थेला मराठी माणूसच जबाबदार आहे. आज महाराष्ट्रात मराठी भाषेवर प्रेम करणारी एवढी प्रामाणिक माणसं असती तर मराठी शाळांना टाळी लागली नसती.

कारण समाज या शाळांमधूनच घडतो. मुलांना घडवण्यात आईबापानंतर जर कोणाचा मोठा वाटा असेल तर तो मातृभाषेचा आहे. मग जर मराठी माणूसच मुलांना मराठी शाळांमध्ये न टाकता कॉन्वेंट आणि इंग्रजी शाळांमध्ये शिकवण्यात धन्यता मानतोय मग हा भाषेचा हट्ट का. त्यातून काय साध्य करायचंय. खरंतर मराठी माणसाने आपल्याच घरात नीट पाहावं. आपलं मूल जेव्हा बोलायला लागतं तेव्हा आपणच त्याला मॉम, मम्मा पापा, डॅडा बोलायला शिकवतोय…आई बाबा तर लांबच राहिलेत.

मग जर तुम्हाला तुमच्या मुलांना मराठी बोलायला शिकवणं कमीपणाचे वाटते तर मग ज्यांना या भाषेचा गंध नाही जो पोटाची खळगी भरण्यासाठी या शहरात आलाय त्यावर मराठी बोलण्याची सक्ती करणं केवळं आकसापोटी आहे का…हे स्पष्ट करावं. मराठी माणूसच त्याच्या भाषेप्रति प्रामाणिक नसल्यानेच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत अमराठी आकडा मराठी विरोधात एकवटत आहे. ज्यावर राजकीय पक्ष आपली पोळी शेकून घेत आहेत. हे केव्हा मराठी माणसांना कळणार?

एखाद्यावर जबरदस्ती करून त्याला आपली भाषा बोलायला लावणं हे चुकीचंच आहे. कारण असे केल्याने त्या भाषेबद्दल, त्या समाजाबद्दल संबंधित व्यक्तीच्या मनात आदर तर नाहीच उलट द्वेष वाढीला लागतो. त्यातूनच मग मराठी अमराठी यासारखे वाद निर्माण होत असतात. त्याविरोधात विरोधकांची एक फळी तयार होते. कारण भाषा हे संवादाचे माध्यम आहे. या संवादातूनच समाज घडतो.

त्यामुळे त्याचे महत्त्व वेळीच समजून त्यावर उपाययोजना करायच्या असतील तर मराठी बांधवांनी स्वत:मध्ये काही बदल करायला हवेत. मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा मान अमराठींनी राखावा असं वाटत असेल तर सोयीने उठसूठ मराठी मराठी करू नये. उलट आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस हे कसे मोठे आहेत हे आपल्या कृतीतून करून दाखवावे. त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे अशी कृती मराठी माणसांनी करावी.

त्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवावा. महाराजांनी कधीही भाषिक वादाला थारा दिला नाही. त्यांच्या सेवेला सगळ्याच धर्माचे, भाषांचे सरदार होते. यामुळे राजकीय नेत्यांच्या मराठी अमराठी या ठरवून तयार केलेल्या वादात पडणे योग्य नाही. स्थानिक-परप्रांतीयांमध्ये वाद घडवून त्यातून वोट बँक जमवणार्‍या राजकीय नेत्यांच्या नादी न लागता सद्सद्विवेकबु्द्धीने खरे महाराष्ट्रीय बना.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. यामुळेच आज मुंबईत दररोज हजारो लोक विविध राज्यांतून शिक्षणासाठी, कामधंद्यासाठी, उपचारासाठी येतात. मिळेल ते काम करतात. त्यांना तुमच्या भाषेबद्दल अनादर असण्याचे कारण नाही. ते पोट भरण्यासाठी आलेत. जे काम तुम्ही आम्ही करू शकत नाही, ते काम करून ते जगत आहेत. ज्या देशात काही अंतरावर भाषा बदलते तिथे कुठल्या एका भाषेची सक्ती करता कामा नये. त्यात आपल्याकडे ज्या परप्रांतीयांचा ओढा सर्वाधिक असतो त्यात सुशिक्षितांपेक्षा अशिक्षितांची संख्या अधिक.

त्यामुळे त्यांच्या भाषेपलीकडे त्यांना दुसर्‍या भाषेची जाण नसते. फक्त कष्ट करण्याच्या तयारीनिशीच ते मुंबईत येतात आणि पैसा व नाव कमावतात. कारण येथे राहून ते पैसा कमावण्याची भाषा शिकतात. टोलेजंग इमारतीत आलिशान घरात राहतात आणि आम्ही मराठी मराठी करीत १० बाय १० च्या खोलीत भांडत बसतो. मराठी माणूस आज मुंबईबाहेर फेकला जात आहे. त्यात त्याची आर्थिक दुर्बलता हे मुख्य कारण आहे. त्यावर मार्ग कसा निघेल त्यावर खरंतर विचार व्हायला हवा.

आपल्या राज्यात राहूनही जर कोणी मराठी भाषा बोलण्यास टाळाटाळ करीत असेल तर प्रत्येक वेळी याचा अर्थ फक्त मराठी भाषेला कमी लेखणे असा काढणे योग्य नाही. कारण प्रत्येक जण धर्माप्रमाणेच आपल्या भाषेप्रतिही संवेदनशील असतो. त्यामुळे नवखी भाषा बोलताना चुकीच्या उच्चारातून गैरसमज निर्माण होऊ नये यासाठीही दुसर्‍या भाषेत बोलणे टाळतात. याबद्दल शांत डोक्याने विचार केल्यास मराठी भाषेप्रति आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपसूकच मिळतील. मराठी ही आपली राज्यभाषा आहे.

त्याचा अभिमान आणि आदर जेवढा आपल्याला तेवढाच तो परप्रांतीयांना असेलच असेही नाही. कारण त्यांची नाळ त्यांच्या मातीशी जुळलेली असते. जशी आपली आपल्या महाराष्ट्राशी. मग परक्यांकडून इतक्या अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ आहे. ज्याप्रमाणे परराज्यात किंवा परदेशात आपली मुलं शिकण्यासाठी, नोकरीसाठी जरी गेलेली असली तरी त्यांची ओढ आणि माया मात्र असते ती आपल्या देशाकडेच. हा फरक जेव्हा आपल्याला खर्‍या अर्थाने कळेल त्या दिवशी हा भाषावादाचा धुरळा आपोआपच खाली बसेल.

Kavita Joshi - Lakhe
Kavita Joshi - Lakhe
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.