Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय ओपेड दोन ठाकरे आणि एक शिंदे यांच्या भांडणात मराठी माणूस रसातळाला?

दोन ठाकरे आणि एक शिंदे यांच्या भांडणात मराठी माणूस रसातळाला?

Subscribe

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ११ बाजार समित्यांमध्ये यश मिळाले आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ ७ ठिकाणी यश मिळाले आहे. युती आणि आघाडी या दोन्हींचा विचार करता त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दोघाही सेनांचा वाटा अल्प आहे हे कोणीही सांगू शकेल. महाराष्ट्रात तब्बल १४७ बाजार समित्यांच्या निवडणुका असताना मनसे यामध्ये कोठेही नव्हती, मात्र दोन ठाकरे आणि एक शिंदे यांच्या राजकीय भांडणामध्ये मराठी माणूस रसातळाला जात आहे, याकडे कुणी लक्ष द्यायचे?

३० जूनपासून महाराष्ट्राच्या राजकारणात तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी लढाई सुरू आहे त्याच्या निकालाचा ट्रेलर बघायचा झाला तर तो राज्यात नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणूक निकालावरून सहज लक्षात यावा. राज्यात एकूण १४७ बाजार समित्यांच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. या निवडणूक निकालांवर जर नजर फिरवली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ८१ बाजार समित्यांमध्ये यश मिळाले, तर भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीला ४७ बाजार समित्यांवर यश मिळवता आले आहे. भाजप-शिवसेना यांच्या युतीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला जवळपास दुप्पट बाजार समित्या मिळवता आल्या म्हणून जर महाआघाडीचे कार्यकर्ते आनंदात असतील तर त्यात नवल काही नाही.

कारण बाजार समित्यांमधील सर्वसामान्य जनतेचा कौल हा राज्यातील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना अनुकूल नसून तो महाविकास आघाडीला अधिक अनुकूल आहे असे या निकालावरून तरी स्पष्टपणे अधोरेखित होते, तथापि जर या निकालांचा खोलवर जाऊन आढावा घेतला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ११ बाजार समित्यांमध्ये यश मिळाले आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ ७ ठिकाणी यश मिळाले आहे. युती आणि आघाडी या दोन्हींचा विचार करता त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दोघाही सेनांचा वाटा अल्प आहे हे कोणीही सांगू शकेल. त्यामुळे खरी धोक्याची घंटा उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खर्‍या अर्थाने इथेच आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर त्यांचा सर्वाधिक भर हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेचे जे ४० आमदार आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला पाठिंबा देणारे १० अपक्ष आमदार असे जे ५० आमदार त्यांच्याबरोबर ठाकरे सरकारमधून बाहेर पडले या ५० आमदारांच्या राजकीय बळकटीकरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. या आमदारांच्या मतदारसंघांत निधीला कोठेही कात्री न लावता उलट भरघोस निधी या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सढळ हस्ते दिला आहे. राज्यातले सरकार जरी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना युतीचे असले तरी खर्‍या अर्थाने राज्याचा कारभार हा आजमितीला तरी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या नावाभोवती केंद्रित झाला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना थेट दिल्लीतील महाशक्तीचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांची डाळ एकनाथ शिंदेंसमोर शिजत नसल्याचे चित्र अधूनमधून प्रसारमाध्यमांमधून समोर येत असते.

अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात या कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहापैकी ३ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. एक मनसेचा आहे, एक राष्ट्रवादीचा, तर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडणूक लढवण्यास भक्कम पाठबळ मिळावे यासाठी या सहापैकी ज्या एका मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत अशा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ७५५ कोटींचा निधी विकासकामांकरिता उपलब्ध करून दिला. अंबरनाथ मतदारसंघाचा विकास नक्कीच झाला पाहिजे. त्याबाबत कोणाचेच दुमत नाही, मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात जे अन्य ५ विधानसभा मतदारसंघ आहेत या ५ मतदारसंघांतील आमदारांनी काय करायचे, हा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

- Advertisement -

बरं ही गोष्ट केवळ एकट्या अंबरनाथपुरती मर्यादित नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे ५० आमदार आले आहेत या ५० आमदारांच्या मतदारसंघांत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे ते पुन्हा निवडून यावेत यासाठी अक्षरश: जीवाचे रान करत आहेत, मात्र मुख्यमंत्री जे अफाट परिश्रम या ५० आमदारांच्या मतदारसंघांतील विकासकामांसाठी घेत आहेत ते पाहता राज्यात दोनच दिवसांपूर्वी झालेल्या बाजार समित्यांच्या निकालांवरून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र काय असू शकेल याचा एक अंदाज यानिमित्ताने निश्चितच राजकीय अभ्यासकांना काढता येऊ शकतो.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ बाजार समित्या मिळाल्या असताना भाजपला मात्र ४० बाजार समित्यांमध्ये यश मिळाले आहे. राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक बाजार समित्या जरी एकट्या भाजपने मिळवल्या असल्या तरीदेखील राज्यातील सत्तेच्या दृष्टीने विचार करावयाचा झाल्यास १४७ पैकी जर केवळ ४० बाजार समित्या भाजपला मिळत असतील तर भाजपसारख्या देशात क्रमांक एकच्या राष्ट्रीय पक्षानेदेखील या अधोगतीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असेच बाजार समित्यांच्या निवडणूक निकालातून सर्वसामान्य ग्रामीण मतदारांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे, असे म्हणण्यास वाव आहे.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने तब्बल ८१ बाजार समित्या जिंकत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे हे खरेच आहे, तथापि जर महाविकास आघाडीमधील या तीन घटक पक्षांचे पक्षीय बलाबल लक्षात घेतले तर राष्ट्रवादीने सर्वाधिक ३८ बाजार समित्या जिंकल्या आहेत. त्या खालोखाल काँग्रेसनेदेखील तब्बल ३१ बाजार समित्यांवर यश संपादन केले आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ ११ बाजार समित्यांवर यश मिळवता आले हे लक्षात घेण्याची गरज आहे.

अर्थात शिवसेनेला यामध्ये सर्वाधिक आनंद जर असेल तर तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले जे मंत्री आमदार होते अशा दिग्गज मंत्र्यांच्या मतदारसंघातील बाजार समित्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली हा नक्कीच आहे, तथापि राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने एकत्रित विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ११ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ अशा दोन्ही शिवसेनेला मिळून १४७ पैकी केवळ १८ बाजार समित्यांवर यश मिळवता आले ही महाराष्ट्राची आजची खरी वस्तुस्थिती आहे. केवळ सत्ता काळाची राजकीय गरज म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवू दिले आणि त्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर सूड उगवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले.

त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना जरी मुख्यमंत्रीपद भूषवल्याचे परमोच्च समाधान लाभले असले तरी दोघांच्या शिवसेनेचे वाटोळे झाले आहे हे बाजार समित्यांतून दिसले. आता उरली राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तर महाराष्ट्रात तब्बल १४७ बाजार समित्यांच्या निवडणुका असताना मनसे यामध्ये कोठेही नव्हती. त्यामुळे मनसेचा प्रश्नच मिटला. जाहीर सभांमधून भाषणे करायची, जाहीर मुलाखतींचे कार्यक्रम करायचे आणि वेळ उरलाच तर पत्रकार परिषद घेऊन वृत्तवाहिन्यांची जागा व्यापून ठेवायची एवढ्यापुरतेच मर्यादित राजकारण करायचे, मात्र दोन ठाकरे आणि एक शिंदे यांच्या या राजकीय भांडणामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणसाची पूर्णपणे बेअब्रू होत आहे याकडे कोणी लक्ष द्यायचे.

काँग्रेस, राष्ट्रवादी असो की भारतीय जनता पक्षासारखा देशातील अव्वल क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असो हे तीनही पक्ष उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना त्यांच्या सोयीने त्यांच्या राजकीय गरजेसाठी वापरून घेत एकूणच दोन्ही ठाकरेंचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रस्थ कसे संपुष्टात आणत आहेत हेच बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या निकालावरून कोणत्याही सर्वसामान्य मराठी माणसाच्या लक्षात येऊ शकेल, मात्र महाराष्ट्रातील मराठी माणसाचे दुर्दैव हे आहे की जे सामान्य मराठी माणसाला कळते ते त्याच्या श्रद्धा असलेल्या दोन्ही ठाकरे बंधूंना तसेच आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदे यांना कळूनही उमगत नाही, यासारखे दुसरे दुर्भाग्य महाराष्ट्राचे दुसरे कोणतेही असू शकत नाही.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -