घरसंपादकीयओपेडखडाजंगीत लपणार का अदानींचे द हिडन ट्रूथ?

खडाजंगीत लपणार का अदानींचे द हिडन ट्रूथ?

Subscribe

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी बोलताना अदानी समूहाचे शेअर्स घेण्यात खूप धोका आहे, असा दावा केला होता. राहुल गांधी यांनी केलेली ही भविष्यवाणी सध्यातरी खरी ठरतानाच दिसत आहे. याआधीही राहुल गांधींनी अनेकदा केंद्रातील मोदी सरकार अदानींना झुकते माप देत असल्याचे आरोप संसदेत केले आहेत. यावेळीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदानी आणि केंद्राच्या संबंधांवरून जोरदार खडाजंगी होणे अपेक्षित आहे, मात्र या खडाजंगीत अदानींचे हिडन ट्रूथ लपण्याचीच शक्यता अधिक आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणारी वा कंपन्यांच्या आर्थिक उलाढालीचे ढोबळ ज्ञान असणारी व्यक्ती असो वा नसो सध्या शहरातील नाक्यानाक्यावर हिंडनबर्गचा अहवाल आणि त्याचा अदानी समूहाच्या कंपन्यांना बसलेला फटका यावर खुमासदार चर्चा झडत आहेत. या चर्चांमध्ये कधी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची अल्पावधीत वाढलेली श्रीमंती, तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या घनिष्ठ संबंधांविषयीची कथाकथने रंगत आणत आहेत. खरं तर हिंडनबर्गच्या अहवालामुळे केवळ अदानी समूहाच्या कंपन्यांनाच नाही, तर संपूर्ण शेअर बाजारालाच जोरदार तडाखा बसलेला आहे. या तडाख्याची जगभरातील अर्थव्यवस्थांनीही नोंद घेतली आहे. या तडाख्यामुळे मागील ४ दिवसांमध्ये अदानी समूहातील कंपन्यांसोबत प्रत्येक कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली.

हिंडनबर्गचा अहवाल आल्यापासून मुंबई शेअर बाजारा (बीएसई) चा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने १४०० अंकांहून अधिक अंकांनी आपटी खाल्ली आहे. बीएसईवरील नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्सची मार्केट कॅप केवळ तीनच सत्रांमध्ये घटून २६८.६ लाख कोटी रुपयांवर आली. या ३ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे अंदाजे ११.८ लाख कोटी रुपये कवडीमोल झालेत. एकट्या अदानी समूहाच्या कंपन्यांची मार्केट कॅप ५ लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूकदार जेवढा धक्क्यात आहे तेवढाच धक्का इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांनाही बसलेला आहे. यामुळे सारेच जण सध्या धास्तावलेल्या अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे अदानी समूहाकडून वारंवार याबाबत स्पष्टीकरण देण्यात येऊनही ही घसरण थांबलेली नाही. मंगळवारी बीएसई १५.७४ अंकांची घट नोंदवत ५९,४८४.६७ अंकांवर बंद झाला. सध्याच्या घडीला तरी भारतीय शेअर बाजार या अस्थिरतेतून लवकरच सावरेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदार व्यक्त करताहेत.

- Advertisement -

अमेरिकन फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी हिंडनबर्गने २४ जानेवारीला अदानी ग्रुपः हाऊ द वर्ल्ड्स थर्ड रिचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन इन कॉर्पोरेट हिस्ट्री’ नावाचा १०६ पानी अहवाल प्रकाशित केला. ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरते कारण यानंतर अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे २७ जानेवारीला अदानी समूहाचा सेकंडरी शेअर अर्थात आजपर्यंतचा सर्वात मोठा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ बाजारात येणार होता. या एफपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांमार्फत कंपनीसाठी मोठा निधी जमवला जाणार होता, पण त्याआधीच कंपनीला हिंडनबर्गने जोरदार तडाखा दिला. हिंडनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशन, मनी लाँड्रिंग आणि अकाऊंटिंग फ्रॉडमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. हिंडनबर्गने गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या कारभारासंदर्भात ८८ गंभीर प्रश्न उपस्थित करत अदानी समूहाकडून उत्तर मागितले.

जगात असे अनेक टॅक्स हेवन देश आहेत, ज्या देशांमध्ये व्यापारासाठी लागणारी गुंतवणूक कुठून जमवली याचा स्त्रोत सांगावा लागत नाही. मॉरिशस आणि कॅरेबियन बेटांवरील देशांचा यामध्ये समावेश आहे. अशा देशांमधील अनेक बनावट कंपन्यांमध्ये अदानीची भागीदारी असून त्यामाध्यमातून अदानी समूहातील कंपन्या करचोरी करतात, असा आरोप हिंडनबर्ग अहवालातून करण्यात आला आहे. ज्या कंपनीचे स्वत:चे संकेतस्थळही नाही, ज्या कंपनीत चार पार्टनर आणि केवळ ११ कर्मचारी आहेत आणि जी कंपनी केवळ एकच नोंदणीकृत कंपनीच्या ऑडिटींगचे काम करते अशा कंपनीला अदानी इंटरप्रायझेस आणि अदानी टोटल गॅससारख्या मोठ्या कंपन्यांचे ऑडिट करण्याचे काम देण्यात आले, यावरही हिंडनबर्गने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अदानी समूहात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी आपले उत्पन्न फुगवून दाखवले आहे, त्यासाठी कंपनीच्या बॅलन्सशीट अर्थात ताळेबंदात हेरफार केल्याचा आरोप अहवालतून करण्यात आला आहे. अदानी कंपनीच्या प्रमोटर्सनी कंपनीचे शेअर्स गहाण ठेवून मोठमोठे कर्ज घेतलेले आहे, त्यामुळे अदानी समूहावर कर्जाचा प्रचंड बोजा असल्याचा दावा हिंडनबर्गच्या अहवालातून करण्यात आला आहे.

- Advertisement -

अदानी समूहावर एसबीआयसह विविध भारतीय बँकांचे सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, जे समूहाच्या एकूण कर्जाच्या ३८ टक्के आहे. तेव्हापासून अदानीच्या कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळू लागले. गौतम अदानी यांच्या वैयक्तिक मालमत्तेतदेखील चांगलीच घट झाली. अवघ्या काही महिन्यांपूर्वी गौतम अदानी हे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसर्‍या स्थानावर होते. सर्वत्र त्यांचा नावलौकीक सुरू होता, परंतु क्षणाधार्थ ते पहिल्या १० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानींना एका दिवसात ८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. २९ जानेवारी रोजी त्यांची एकूण संपत्ती ९२.७ अब्ज डॉलर होती, जी सोमवारी घटून ८४.४ अब्ज डॉलरवर आली. यामुळे अदानी या क्रमवारीत ११व्या स्थानावर घसरले. अदानी ४ एप्रिल २०२२ रोजी सेंटबिलियनेअर्स क्लबमध्ये सामील झाले होते. १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंटबिलियनेअर्स म्हणतात. त्यापूर्वी, एप्रिल २०२१ मध्ये, अदानींची एकूण संपत्ती ५७ अब्ज डॉलर होती. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात अदानींची एकूण संपत्ती जगातील सर्वात वेगाने वाढली होती.

हिंडनबर्गने अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांची झोप काही एका रात्रीत उडवलेली नाही. तब्बल २ वर्षांच्या संशोधनानंतर, अदानी समूहात काम करणार्‍या माजी अधिकार्‍यांसह इतर अनेक कर्मचार्‍यांकडून माहिती घेत, अनेक कागदपत्रांचा आधार घेऊन हा अहवाल तयार केल्याचे हिंडनबर्गचे म्हणणे आहे. हिंडनबर्गचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता याआधीही अनेक कंपन्यांना आपल्या शोध अहवालाच्या माध्यमातून दणका दिलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे हिंडनबर्ग ही स्वत:देखील एक शॉर्ट सेलिंग क्षेत्रात काम करणारी कंपनीच आहे. एखाद्या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य घसरणार आहे, हे ठाऊक असूनदेखील ब्रोकरकडून त्या कंपनीचे शेअर्स उधार घ्यायचे आणि ते आहे त्याच किमतीला दुसर्‍या गुंतवणूकदारांना विकायचे.

(उदा. एखाद्या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य १ हजार रुपये आहे. हे मूल्य घसरणार असल्याचे ठाऊक असूनही ते शेअर्स ब्रोकरकरून उधार घ्यायचे. पुढे ते शेअर्स १ हजार रुपयांना इतर गुंतवणूकदारांना विकायचे. या शेअर्सचे मूल्य घसरून ४०० रुपयांवर आले की या ४०० रुपयांना हे गुंतवणूकदारांकडून खरेदी करायचे आणि ब्रोकरला परत करायचे. यातून जो ६०० रुपयांचा नफा होईल, तो कमवायचा ) यानंतर संबंधित शेअर्सचे मूल्य घसरले की पुन्हा तेच शेअर्स गुंतवणूकदाराकडून विकत घेऊन पुन्हा ब्रोकरला द्यायचे. यातून झालेला नफा कमवायचा. हे काम करत असतानाच शोध अहवालाच्या माध्यमातून एकामागोमाग एक करत कंपन्यांना तडाखा देण्याचा सपाटा लावायचा. हे या हिंडनबर्ग कंपनीचे काम.

अमेरिकेच्या कनेक्टिकट विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसायात पदवी पूर्ण केलेल्या तिशीतील नॅथन अँडरसनने २०१७ मध्ये हिंडनबर्ग कंपनी सुरू केली होती. एका डेटा रिसर्च कंपनीत नोकरी करताना अँडरसनला डेटा आणि शेअर बाजारातील बारकावे समजले. स्टॉक मार्केट हे जगातील भांडवलदारांचे सर्वात मोठे आर्थिक केंद्र आहे आणि येथेच सर्वाधिक घोटाळे केले जातात, याची त्याला जाणीव झाली. त्यातूनच हे घोटाळे सर्वसामान्यांसमोर उघड करण्यासाठी अँडरसनने १९३७ साली अपघातग्रस्त झालेल्या हिंडनबर्ग नावाच्या जर्मन एअर स्पेसशीपवरून कंपनीचे नाव ठेवले.

शेअर बाजारातील हेराफेरी, कंपन्यांच्या ताळेबंदातील घोटाळे, गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे प्रकार उघड करणे हे कंपनीचे प्रमुख ध्येय ठरले. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, हिंडनबर्गने २०२० सालापासून ३० कंपन्यांचे संशोधन अहवाल उघड केले आहेत आणि अहवाल सार्वजनिक केल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्या कंपन्यांचे शेअर्स सरासरी १५ टक्क्यांनी घसरले आहेत. एवढंच नाही, तर पुढील ६ महिन्यांत या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सरासरी २६ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. अदानी समूहाबद्दल म्हणायचे झाल्यास, अहवाल आल्यानंतर २ ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपन्यांचे शेअर्स २५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत.

हिंडनबर्गच्या अहवालानंतर पृष्ठभागी राष्ट्रध्वज लावून अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. यानंतर अदानी समूहाकडून हिंडनबर्गच्या आरोपांवर ४१३ पानांचे उत्तरही देण्यात आले. यात हिंडनबर्गचे आरोप खोटे आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. हिंडेनबर्गने अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सच्या मूल्यात फेरफार करण्यासाठी आणि त्यांचे मूल्य कमी करण्यासाठी शिवाय बाजारात अफवा पसरविण्यासाठी हा अहवाल प्रकाशित केला. त्यातून हिंडनबर्गला फायदा झाला असला, तरी आमच्या गुंतवणूकदारांचे नुकसान झाले, यावर आम्ही न्यायालयात दाद मागू, असे आव्हान दिले. सोबत हा अहवाल म्हणजे भारताच्या अस्मितेवरील हल्ला असल्याचे अदानींकडून म्हटले गेले. भारतीय उद्योग संस्थांचे स्वातंत्र्य, अखंडता आणि गुणवत्ता तसेच भारताच्या प्रगतीविरोधात रचलेले कटकारस्थान असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादाच्या नावाखाली जनतेची लूट लपवू नका. भारत एक उदयोन्मुख महासत्ता आहे. ज्याचे भवितव्य अदानी उद्योगसमूहाने रोखून धरले आहे, असे प्रत्युत्तर लागलीच हिंडनबर्गने दिले.

अदानी समूहाच्या कंपन्यांना फटका बसल्यामुळे अदानी समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी विमा कंपनी एलआयसी तसेच अदानीला कर्जपुरवठा करणारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गुंतवणूकदारांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. खासकरून या घसरणीमुळे एलआयसीचे १६,८५० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर सामान्य माणसांचे, विमाधारकांचे पैसे बुडाल्याचा आरोप सुरू झाला. त्यावर एलआयसी आणि एसबीआयकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले. अदानीला दिलेले कर्ज नियमानुसारच दिल्याचा दावा एसबीआयने केला, तर आतापर्यंत भारतीय आयुर्विमा कंपनीने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एकूण ३० हजार १२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. २७ जानेवारीला शेअर बाजार बंद होईपर्यंत एलआयसीच्या शेअर्सचे मूल्य ५६ हजार १४२ कोटी रुपये होते.

म्हणजेच अदानी समूहाच्या शेअर्समधील मोठ्या घसरणीनंतरही एलआयसीला २६ हजार कोटींचा फायदा झाल्याचा दावा करण्यात आला. हे दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप इतक्यात थांबतील, असे सध्या तरी दिसत नाही. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी बोलताना अदानी समूहाचे शेअर्स घेण्यात खूप धोका आहे, असा दावा केला होता. राहुल गांधी यांनी केलेली ही भविष्यवाणी सध्यातरी खरी ठरतानाच दिसत आहे. याआधीही राहुल गांधींनी अनेकदा केंद्रातील मोदी सरकार अदानींना झुकते माप देत असल्याचे आरोप संसदेत केले आहेत. यावेळीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदानी आणि केंद्राच्या संबंधांवरून जोरदार खडाजंगी होणे अपेक्षित आहे, मात्र या खडाजंगीत अदानींचे हिडन ट्रूथ लपण्याचीच शक्यता अधिक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -