Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय ओपेड किंगफिशर, जेट एअरवेजनंतर गो फर्स्टही क्रॅश होणार ?

किंगफिशर, जेट एअरवेजनंतर गो फर्स्टही क्रॅश होणार ?

Subscribe

प्रसिद्ध उद्योग समूह वाडिया ग्रुपद्वारा संचलित गो फर्स्ट ही विमान वाहतूक कंपनी दिवाळखोरीत गेल्याने भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. किंगफिशर, जेट एअरवेजनंतर आता गो फर्स्टचेही विमान वाहतूक क्षेत्रातून कायमचे लॅण्डिंग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून हजारो कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांवर गडांतर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास गेल्या दशकभराच्या कालावधीत भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील तिसर्‍या मोठ्या वाहतूक कंपनीला टाळे लागणार असून हा नक्कीच चिंतेचा विषय आहे...

जगभरात जवळपास १०९ वर्षांपूर्वी म्हणजेच १ जानेवारी १९१४ साली अमेरिकेत पहिल्यांदा विमानसेवा सुरू झाली. अमेरिकेतील पीटर्सबर्ग ते टाम्पा या २ शहरांदरम्यान पहिल्या प्रवासी विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर पाहता पाहता ही विमान सेवा जगभरात इतकी प्रचलित झाली की २ देशांमधील प्रवास करण्यासाठी बहुतांश नागरिक विमान सेवेलाच प्राधान्य देऊ लागले. भारतातही स्वातंत्र्यपूर्व काळातच विमान सेवा सुरू झाल्याचा इतिहास आहे. १९३२ साली सर्वात आधी व्यावसायिक विमान वाहतूक सेवेला सुरुवात झाली. भारतीय उद्योग क्षेत्राचे जनक मानले जाणारे जे.आर.डी. टाटा यांनी एअर इंडिया या कंपनीची स्थापना करत व्यावसायिक विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात पुढाकार घेतला होता.

कालांतराने भारतात प्रवासी विमान वाहतूक सेवेलाही सुरुवात झाली. ब्रिटिश राजवट संपल्यानंतर भारतातील तत्कालीन केंद्र सरकारने स्वातंत्र्यानंतर १९४८ साली जे.आर.डी. टाटा यांच्या एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचे ४९ टक्के समभाग विकत घेतले व त्याबदल्यात एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. ८ जून १९४८ रोजी एअर इंडियाची मुंबईहून कैरो व जिनिव्हामार्गे लंडन ही पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली गेली व १९५० साली नैरोबी सेवा सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रवासी विमान वाहतूक सेवेमध्ये अनेक सुधारणा झाल्या. १९९०च्या दशकात सरकारी विमान सेवेसोबतच काही खासगी प्रवासी विमान सेवांनीही भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आणि येथूनच खर्‍या स्पर्धेला सुरुवात झाली.

- Advertisement -

देश-विदेशातील अनेक खासगी प्रवासी आणि वाहतूक विमान सेवा कंपन्यांनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला. भारतात दिवसेंदिवस वाढणार्‍या प्रवासी संख्येमुळे अनेक खासगी कंपन्यांनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश करण्यात रस दाखवला आहे, परंतु आत्तापर्यंतचा इतिहास पाहिल्यास केवळ काही कंपन्याच भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात तग धरून राहण्यात यशस्वी झाल्या आहेत. भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल करण्यात आलेल्या कंपन्यांची यादी काही फार मोठी नाही. बोटांवर मोजण्याइतकीच त्यांची संख्या आहे, मात्र भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातून गाशा गुंडाळाव्या लागणार्‍या कंपन्यांची यादी मात्र मोठी असून हा आकडा पाहिला तर यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कारण भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील मागील तीन दशकांचा आढावा घेतला, तर असे दिसते की, सर्वसाधारणपणे दरवर्षी एक खासगी विमान कंपनी आर्थिक अडचणीत सापडून गाशा गुंडाळत आहे. आतापर्यंत भारतात छोट्या-मोठ्या तब्बल २७ विमान कंपन्यांनी गाशा गुंडाळल्याचा इतिहास आहे. १९९६ मध्ये ‘ईस्ट वेस्ट ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड ट्रेड लिंक लिमिटेड’ आणि ‘मोदीलुफ्त’ या कंपन्या बंद पडल्या. १९९७ मध्ये खेमका उद्योग समूहाची ‘एनईपीसी मायकॉन लिमिटिड’ आणि ‘दमानिया एअरवेज’ या कंपन्यांनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातून आपला गाशा गुंडाळला. त्यानंतर २००० साली ‘लुफ्तान्झा कार्गो इंडिया’ ही कंपनी बंद पडली. २००८ मध्ये ‘एअर डेक्कन’ ही कंपनी ‘किंगफिशर’ने विकत घेतली होती, परंतु ‘किंगफिशर’च बंद पडल्याने या कंपनीसह उपकंपन्यांचे वास्तव्यही संपुष्टात आले.

- Advertisement -

आतापर्यंत भारतात ‘जेट एअरवेज’सह ‘पॅरामान्टेड एअरवेज’, ‘आर्यन कार्गो एअरवेज’, ‘डेक्कन कार्गो अ‍ॅण्ड एक्स्प्रेस लॉजिस्टिक’, ‘एअर कार्निव्हल’, ‘एअर पेगॅसस’, ‘रेलिगेअर एव्हिएशन’, ‘एअर कोस्टा’, ‘क्विक जेट कार्गो एअरलाईन्स’ आदी विमान वाहतूक कंपन्यांचे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातून आव्हान संपुष्टात आले आहे. ‘गो फर्स्ट’ही सध्या याच वाटेवर असून कंपनी कधीही बंद पडण्याच्या मार्गावर असल्यानेच अनेक कर्मचारी या कंपनीतून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या ३० वर्षांचा भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचा इतिहास पाहिला तर जवळपास २७ कंपन्या बंद झाल्या असून यामागील कारणे जाणून घेत त्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची वेळ आली आहे, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

इतक्या मोठ्या प्रमाणात केवळ भारतातच विमान कंपन्या गाशा गुंडाळत आहेत असे नाही. जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या हीच परिस्थिती असून विविध कारणांमुळे परदेशातही अनेक बड्या विमान वाहतूक कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी आहे. देश आणि विदेशातील यामागची कारणे जरी वेगवेगळी असली तरी विमान वाहतूक क्षेत्रातील सध्याची परिस्थिती आणि भविष्याचा जर विचार करावयाचा झाल्यास याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी थेट मुळातच घाव घालणे योग्य राहील.

विमान वाहतूक कंपन्या बंद पडण्यासाठी कारणे जरी वेगवेगळी दिली जात असली तरी प्रत्येक बंद पडलेल्या विमान सेवेसाठी कारण एकच आहे, ते म्हणजे फसलेले व्यावहारिक नियोजन. परवडणार्‍या दरात विमान सेवा देण्याच्या बतावण्या करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न अनेक विमान कंपन्यांकडून सुरुवातीच्या काळात केला जातो, परंतु ते करताना दैनंदिन व आवश्यक असलेल्या रोजच्या खर्चाचे योग्य प्रकारे नियोजन न केल्याने नफा कमविण्यात कंपन्यांना अपयश येते आणि येथूनच दिवाळखोरीला निमंत्रण मिळते. हे झाले एक कारण, परंतु या कारणाशिवाय इतरही अनेक कारणे असून याचाही विचार होणे तितकेच महत्वाचे आहे.

विमान कंपन्या बंद पडण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे वाढते कर्ज हेदेखील एक आहे, असे म्हटल्यास ते कदाचित चुकीचे ठरणार नाही. योग्य प्रकारे व्यावहारिक नियोजन न केल्याने उत्पन्न कमी होते. परिणामी कर्जाचा बोजा वाढत जातो. एकदा का कर्जाच्या खाईत बुडाल्यानंतर कंपन्यांना यातून बाहेर पडणे अवघड होऊन बसते आणि मंग कंपन्या आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करण्यास सुरुवात करतात. याशिवाय अनेकदा विमान कंपन्यांना छोट्या छोट्या ठिकाणी किंवा फायदा नसलेल्या ठिकाणी विमान सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो.

दबावाखाली कंपन्या तेथे विमान वाहतूक सेवा सुरू तर करतात, परंतु अपेक्षेनुसार प्रवासी संख्या नसल्याने त्यांना नफा कमविण्यात मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे विमान कंपन्या आर्थिक दिवाळखोरीकडे जाण्यासाठी हेदेखील एक कारण मानले जाते, परंतु गो फर्स्टने कंपनी अडचणीत सापडण्याचे कारण आर्थिक गैरव्यवस्थापन नसून विमानांच्या इंजिनांमधील समस्या असल्याचे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, अमेरिकेतील प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी या विमानाच्या इंजिन निर्मात्या कंपनीने पुरवलेल्या सदोष इंजिनांमुळे अनेक विमाने आम्हाला यार्डातच ठेवावी लागली. कंपनीच्या ताफ्यात असलेल्या विमानांपैकी जवळपास निम्मी म्हणजेच २५ विमाने वापर न करता जमिनीवरच थांबवून ठेवावी लागली.

या विमानांच्या इंजिनामध्ये दोष असून दुरुस्तीसाठी अनेकांची उपकरणेही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे कंपनीचे म्हणणे असून आम्हाला तब्बल १.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी या विमान निर्मात्या कंपनीने लवादाने दिलेल्या आदेशाचे पालन केलेले नाही, असा आरोपही गो फर्स्टकडून करण्यात आला आहे. २७ एप्रिलपर्यंत किमान १० सेवायोग्य उपकरणे तसेच भाडेतत्त्वावरील इंजिनांचा पुरवठा करणे, असे आदेश लवादाकडून देण्यात आले होते, परंतु याची काही एक अंमलबजावणी न झाल्याचा गो फर्स्टचा आरोप आहे, तर गो फर्स्टच्या या आरोपांना प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी कंपनीनेदेखील प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, लवादाने दिलेल्या आदेशाचे पालन कंपनीकडून योग्यरित्या केले जात असून आमच्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. संबंधित कंपन्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर आमच्याकडे स्पष्टीकरण असून सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत अधिक भाष्य करणार नाही, परंतु आम्ही योग्य वेळी सर्व बाबींचा खुलासा करणार, असे स्पष्टीकरण प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी कंपनीने दिले आहे.

भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात सर्वात मोठा वाटा असलेल्या इंडिगो कंपनीलाही प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी कंपनीच्या इंजिनातील बिघाडामुळे एकेकाळी फटका बसला होता. विविध उपकरणांअभावी त्यांची ६० विमाने उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याने अनेक काळापर्यंत जमिनीवरच थांबून होती, मात्र त्यांच्याकडे २५० पेक्षा जास्त विमानांचा ताफा असल्याने इंडिगो एअरलाईन्सला कोणताही फटका बसला नाही. इंडिगो एअरलाईन्सकडे असलेल्या अनेक विमानांपैकी अनेक विमाने ही इतर कंपन्यांच्या इंजिनांवर चालतात. त्यामुळे त्यांना त्यातून मार्ग काढता आला, परंतु त्या तुलनेत केवळ प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी कंपनीवर अवलंबून असणार्‍या गो फर्स्टला यातून मार्ग काढणे डोईजड झाले आणि कंपनी दिवाळखोरीकडे निघाली.

एअर इंडियासह इतर आघाडीच्या विमान कंपन्या युरोपातील एअरबस तसेच अमेरिकास्थित बोईंगकडून विमानांची इंजिने आणि त्यांची उपकरणे विकत घेते. इंजिन आणि त्यांच्या उपकरणांसाठी त्यांच्याकडे पर्याय असल्यानेच या सर्व कंपन्यांना यातून मार्ग काढणे शक्य होत आहे, परंतु त्या तुलनेत गो फर्स्ट मात्र प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी कंपनीवरच अवलंबून राहिल्याने ऐनवेळी विमानांची उड्डाणे रद्द करावी लागण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. जो दुसर्‍यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला, असेच काहीसे याठिकाणी घडले असे म्हटल्यास ते कदाचित अतिशयोक्तीचे ठरू नये.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -